मुंबई: मुंबई हे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आणि देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख केंद्र आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईचे रूपच बदलून जाते. अशावेळी विमानतळावर साकारलेला सांस्कृतिक सोहळा म्हणजे शहरात पाऊल ठेवताच मुंबईच्या उत्सवी वातावरणाची ओळख करून देणारा अनुभव ठरला. नेहमीच्या या धावपळीच्या वातावरणात मंगळवार, दि.२२ सप्टेंबर रोजी विमानतळावर अचानक ढोल-ताशांचा गजर घुमला. लेझीमच्या तालावर पावले थिरकली आणि वारकरी दिंडीच्या गजराने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) टर्मिनल-२ परिसर भक्तिमय झाला. (Mumbai Airport Ganeshotsav)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या पालखी सोहळ्यात तब्बल २३० कलाकारांनी सहभाग घेत महाराष्ट्राची लोककला, भक्ती आणि उत्सवी परंपरा प्रवाशांसमोर साकारली. त्यामुळे विमानतळाचा टर्मिनल परिसर काही काळ जणू महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रंगमंचातच बदलून गेला. (Mumbai Airport Ganeshotsav)
अदानी फाऊंडेशनच्या कल्याण येथील एनआरसी शाळेतील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी लेझीम आणि पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या उत्साहाने वातावरणात आणखी रंग भरला. त्यांच्यासोबत जवळपास ६० स्थानिक कलाकारांच्या ढोल-ताशा आणि लेझीम पथकांनी सादरीकरण करत गणेशोत्सवाचा पारंपरिक बाज जिवंत केला. या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरली ती वारकरी दिंडी. टाळ-मृदंगाच्या भक्तिमय वातावरणातून गणरायाच्या पालखीला आध्यात्मिक स्पर्श मिळाला. त्याचबरोबर दांडपट्ट्याचे थरारक सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या मर्दानी खेळांची परंपरा पाहण्याची संधी प्रवाशांना यानिमित्ताने मिळाली. (Mumbai Airport Ganeshotsav)
फेटा, मोदक अन् आठवणी
विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे पारंपरिक फेटा बांधून स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाचा गोडवा वाढविण्यासाठी प्रवासी, अतिथी, कर्मचारी आणि विमानतळाशी संबंधित विविध घटकांना मोदकाचा प्रसाद देण्यात आला. महाराष्ट्राबाहेरून किंवा परदेशातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच राज्याच्या उत्सवी संस्कृतीची पहिली झलक अनुभवता आली. गणरायाची पालखी, ढोल-ताशांचा निनाद, लेझीमचा ताल आणि मोदकाचा गोडवा यामुळे सीएसएमआयएच्या टर्मिनल-२मध्ये महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची छोटीशी झलक साकारली. प्रवासाच्या धावपळीत मिळालेला हा सांस्कृतिक विराम अनेक प्रवाशांच्या मुंबई प्रवासातील संस्मरणीय आठवण ठरला. (Mumbai Airport Ganeshotsav)
आज गणेशोत्सवानिमित्ताने आमच्या शाळेतील 150 मुलांच्या लेझीम पथकाने आज सादरीकरण केले. आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी यानिमित्ताने मिळते. महाराष्ट्राचा एक लढवय्या खेळ लेझीम जिवंत ठेवण्याचा एक प्रयत्न आम्ही यानिमित्ताने करतो. तीन महिने रोज जवळपास एक ते दीड तास सर्व करतात. आज आमच्या विद्यार्थ्यांना विमानतळावर येण्याची संधी तर मिळालीच पण परदेशी पर्यटकांकडून मिळालेली थाप आम्हाला जास्त मौल्यवान वाटते.
- शिरसाट सर, शिक्षक (Mumbai Airport Ganeshotsav)
माझी मुलगी अदानी फाउंडेशन मध्ये शिकते आहे. मी गणपती बाप्पाचे आभार मानतो. माझ्या मुलीचे सादरीकरण पाहताना मी भारावून गेलो. हा कार्यक्रम अंगावर काटा आणणारा होता. हा कार्यक्रम अत्यंत भव्य दिव्य झाला.
- नितीन इंगळे, पालक (Mumbai Airport Ganeshotsav)
मी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचे आभार मानतो. आमच्या 150 हुन अधिक विद्यार्थ्यांनी आज या सादरीकरणात सहभाग घेतला. आमचे अनेक विद्यार्थी आज पहिल्यांदाच विमानतळावर आले. त्यांच्यासाठी तर चंद्रावर आलो असल्याची भावना आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.