कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे दुसरे हॉटेल

५० खोल्यांचे ‘Tree of Life’ २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन; रोजगार, पर्यटनाला मिळणार चालना

    22-Sep-2026
 

 Kunkeshwar Taj Hotel
 
मुंबई : सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला आणखी एक मोठी चालना मिळणार आहे. देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर येथे ‘ताज’ हॉटेल्स समूहाच्या ‘Tree of Life’ ब्रँडचे ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भातील करारावर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मंत्रालयातील दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हॉटेलचे बांधकाम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. (Kunkeshwar Taj Hotel)
 
सिंधुदुर्गमध्ये शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथे ताज समूहाचे दुसरे हॉटेल साकारत असल्याने देवगडसह संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. जागतिक दर्जाच्या हॉटेल ब्रँडमुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच स्थानिक रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढणार आहेत. (Kunkeshwar Taj Hotel)
 
हॉटेल उद्योगासोबत वाहतूक, खाद्यपदार्थ, पर्यटन मार्गदर्शन, हस्तकला आणि अन्य सेवा क्षेत्रांनाही या प्रकल्पाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यटन आधारित अर्थव्यवस्थेला बळ मिळून जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागेल. कोकणच्या निसर्गसौंदर्याला दर्जेदार पर्यटन सुविधांची जोड देत सिंधुदुर्गला देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख पर्यटन केंद्र बनविण्याच्या प्रयत्नांमधील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ताज ग्रुपचे तन्वीर जाहीदी, दत्तात्रय हिरे आणि रोहन रानडे उपस्थित होते. (Kunkeshwar Taj Hotel)
 
‘फक्त एका ताजपर्यंत थांबायचे नाही’
 
“सिंधुदुर्गमध्ये फक्त एका ताजपर्यंत आपण थांबायचे नाही. आता देवगडमधील कुणकेश्वर येथे दुसरे ताज हॉटेल आणत आहोत. मोठे ब्रँड आणि दर्जेदार हॉटेल्स आल्याने दर्जेदार पर्यटक, चांगल्या रोजगाराच्या संधी आणि जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीला चालना मिळेल. मुंबई-पुण्यासह देश-विदेशात नोकरीसाठी गेलेल्या सिंधुदुर्गातील तरुणांनी आता परतण्याचा विचार करावा. आपल्या जिल्ह्यातच चांगल्या पगाराच्या दर्जेदार नोकऱ्या उपलब्ध होतील.” (Kunkeshwar Taj Hotel)
 
- नितेश राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री
 
 
 




संबंधित मजकूर