१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदीचे निर्णय मागेच काही देशांनी घेतले. पण, ‘आयआयटी मुंबई’मधील परवाच्या विद्यार्थी आत्महत्या प्रकरणानंतर शाळा-महाविद्यालयांतील ‘एआय’ वापराबाबतही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. न्यूयॉर्कने मागेच यासंबंधी ठोस निर्णय घेतला. त्याअनुषंगाने ‘एआय’च्या विद्यार्थ्यांवर होणार्या परिणामांचा ऊहापोह करणारा हा लेख...
एआय हे अण्वस्त्रांपेक्षाही अधिक धोकादायक आहे,” असे विधान दोन वर्षांपूर्वी केले होते, ते ‘टेस्ला’ आणि ‘एक्स’चा सर्वेसर्वा एलॉन मस्कने. त्यानंतर आजतागायत याच क्षेत्रातील कित्येक शास्त्रज्ञांनी ‘एआय’ कंपन्यांना ‘भविष्यातील धोका’ संबोधून रामराम ठोकला. यामध्ये जेकॉब कॉक्झॉन, जो बेंटन, झो हिटजिग यांसारख्या काही दिग्गज शास्त्रज्ञांचा समावेश आहे. ‘ओपन एआय’, ‘अॅन्थ्रोपिक’, ‘गुगल’ यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगारावर कार्यरत या शास्त्रज्ञांनी ‘एआय’संबंधी वेळोवेळी धोक्याची घंटा वाजवली. ‘एआय’ तंत्रज्ञान मानवी नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते, ‘सुपरइंटेलिजन्स’च्या नावाखाली ‘एआय’च्या प्रयोगशाळा मानवी जीवनाशीच खेळ करीत आहेत, यांसारखे गंभीर आरोपही या शास्त्रज्ञांनी केले.
एवढेच नाही, तर नुकतेच ‘गुगल’च्या ‘जेमिनी’ने तीन कंपन्यांची सुरक्षायंत्रणा भेदून हॅकिंग यशस्वी केल्याची धक्कादायक बातमीही येऊन धडकली. त्यामुळे सध्या सर्वत्र ‘एआय’च्या या दूरगामी धोक्यांची चर्चा रंगलेली दिसते. परंतु, ‘एआय’चा धोका हा सायबर सुरक्षेपुरता मर्यादित नसून, विशेषकरून मानवी मेंदूवर होणारे त्याचे विपरीत परिणाम कित्येक अहवालांतूनही सिद्ध झाले आहेत. विशेषकरून विद्यार्थ्यांच्या संदर्भात याची दाहकता अधिक प्रमाणात जाणवते. याचा अर्थ, ‘एआय’चा वापर कदापि करूच नये, असा मुळीच नसून, तो नेमका कशासाठी, किती प्रमाणात करावा, याचे तंत्र समजून घेण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
‘आयआयटी मुंबई’मध्ये साहिल वाकोडे या ‘बीटेक’च्या दुसर्या वर्षाला शिकणार्या विद्यार्थ्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. यामागचे कारण ठरले ते ‘चॅटजीपीटी’चा वापर करून कॉपी करण्याचा असफल प्रयत्न. साहिलने अख्खी प्रश्नपत्रिकाच ‘चॅटजीपीटी’वर अपलोड केली आणि त्याची उत्तरे मागितली. मुळात, परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांनी मोबाईल अथवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत बाळगणे, हेच नियमबाह्य. पण, तरीही साहिलकडे मोबाईल होता आणि त्याचा कॉपी करण्यासाठी त्याने वापरही केला. पण, साहिलची ही ‘एआय’चलाखी पकडली गेली. तरीही, त्याचे वर्ष वाया जाणार नाही, असे आश्वासित करीत त्याला प्राध्यापकांकडून समजही देण्यात आली. परंतु, प्रचंड तणावाखाली आलेल्या साहिलने आत्महत्येचा मार्ग निवडला. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांनी ‘एआय’चा वापर कसा, कुठे, किती प्रमाणात करावा, यांसारख्या काही प्रश्नांची कायमस्वरूपी उत्तरे समाज, शिक्षण व्यवस्था आणि सरकारलाही आज ना उद्या शोधावीच लागतील. कारण, आजच्या पिढीला ‘एआय’पासून वंचित ठेवणे, म्हणजे त्यांच्या भविष्यातील संधींचे पंख छाटण्यासारखेच. म्हणूनच, ‘एआय’चा सक्षम, सकारात्मक आणि संयमित वापर करणे, हाच त्यावरील शाश्वत उपाय आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
यासंदर्भात न्यूयॉर्कमधील शाळांनीही इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ वापरावर निर्बंध लादण्याची मागेच घोषणा केली. त्यानुसार, न्यूयॉर्क शहरातील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मर्यादित ‘एआय’ साधनांचा वापर करता येईल आणि त्यांना ‘एआय क्रिटिकल थिंकिंग’ अभ्यासक्रम उपलब्ध होतील. सर्व इयत्तांसाठी ‘कंपॅनियन चॅटबॉट्स’, तसेच ‘चॅटजीपीटी’ आणि ‘लॉड’ यांसारख्या मुख्य प्रवाहातील सेवा प्रतिबंधित केल्या जातील. न्यूयॉर्क जिल्हा प्रशासन इयत्तेनुसार विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक ‘स्क्रीनटाईम’वरही मर्यादा घालेल. या धोरणामध्ये दिव्यांग विद्यार्थी आणि इंग्रजी शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी काही अपवाद निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ‘एआय’ वापरावर मर्यादा असल्या, तरी शिक्षकांना ‘एआय’ वापरता येईल. परंतु, मूल्यांकन किंवा विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी शिक्षकांनाही ‘एआय’चा वापर करण्यास सक्त मनाई असेल. त्यामुळे शालेय वेळेत विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ वापरावर मर्यादा असल्या, तरी घरात मात्र मुले ‘एआय’चा वापर करतात का, याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही शेवटी पालकांचीच! कारण, गृहपाठासाठी, प्रोजेक्टसाठी मुले सरसकट ‘एआय’निर्भर असतील, तर त्यांच्या बौद्धिक विकासावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
शिवाय, ‘एआय’वरील अतिअवलंबित्वामुळे स्वत:हून विचार करण्याची, नव्या संकल्पना, प्रयोग राबविण्याची, मानवी संबंध, संवाद प्रस्थापित करण्याची क्षमताच मुळी संपुष्टात येऊ शकते. हेच धोके ओळखून, ‘एमआयटी’नेही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात, ‘एआय’समोर विद्यार्थ्यांना ‘बौद्धिक शरणागती’ पत्करावी लागेल, असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यामुळे या इशार्याकडे दुर्लक्ष न करता, त्यादृष्टीने वेगाने पाऊले उचलणे, हे क्रमप्राप्तच!
भारतातही ‘एआय’ क्षेत्राचा वेगवान विकास होत असून, साधारण ५२.४ कोटींहून अधिक नागरिक आज ‘एआय’चे वापरकर्ते आहेत. भारतातले ६५ टक्के नेटिझन्स हे ‘एआय’चा वापर करतात, तर १८ ते २४ वयोगटांतील ‘जेन-झी’ यांचे ‘एआय’ वापरकर्त्यांमधील प्रमाण हे जवळपास ५० टक्क्यांवर आहे.
याचाच अर्थ, भारतातील तरुणाई ही आपापल्या क्षेत्रात ‘एआय’चा सक्रिय वापर करताना दिसते. त्यामुळे सरकारने एकीकडे ‘एआय’ क्षेत्राच्या विस्तारीकरणाबरोबरच, ‘एआय’चे मूल्याधिष्ठित शिक्षण, सक्षम नियमन यासंबंधी उपाययोजना करणेही अत्यावश्यकच. तसे केल्यास नवतंत्रज्ञानाचा विकास आणि नवतंत्रज्ञानाचे नियमन यांचा एकाच वेळी मेळ घालणे शक्य होईल. तंत्रज्ञान हे दुधारी अस्त्र; त्याचा वापर नेमका कोण, कशासाठी करते, यावरच त्याची उपयुक्तता आणि यशस्विता अवलंबून असते. अगदी आदिमकाळापासून ते माहितीयुगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आजवरच्या प्रगतीवरून हे वेळोवेळी अधोरेखितही झाले आहे. म्हणूनच, ‘अणुबॉम्बचे जनक’ म्हणून ओळखल्या जाणार्या जे. ओपनहायमर यांचे यासंबंधीचे विधान आजही तितकेच सयुक्तिक ठरावे. जपानवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्यामुळे मुक्त झालेल्या प्रचंड विनाशकारी शक्तीचा विचार करताना उद्विग्नपणे ओपनहायमर म्हणाले होते, "आता मी ‘मृत्यू’ बनलो आहे - जगाचा विनाश करणारा!” आज दुर्दैवाने ‘एआय’ला मानवी मेंदूसमान विकसित करण्याचा ध्यास घेतलेल्या काही शास्त्रज्ञांनीही त्यांचा ‘ओपनहायमर’ होण्यापूर्वीच जगाला सावध केले आहे. तरीही, ‘एआय’ हे मानवजातीचे भविष्य आहे, हे कदापि न नाकारता, हे तंत्रज्ञान भावी पिढीसाठी सुरक्षित करण्याचे नैतिक दायित्व स्वीकारावेच लागेल आणि शिक्षण क्षेत्र ही त्याची पहिली पायरी ठरावी!
- विजय कुलकर्णी