३५ वर्षांनी काश्मीरमध्ये गणेश विसर्जनाची परंपरा पुन्हा सुरू

    21-Sep-2026   
    
Kashmir Ganesh Visarjan
 
 
मुंबई (Kashmir Ganesh Visarjan) : श्रीनगरमध्ये रविवारी काश्मिरी हिंदूंसाठी एक खास आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. तब्बल ३५ वर्षांनंतर गणेश विसर्जनाची जुनी परंपरा पुन्हा एकदा खोऱ्यात पाहायला मिळाली. देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेले अनेक काश्मिरी हिंदू आपल्या कुटुंबीयांसह श्रीनगरमध्ये दाखल झाले आणि झेलम नदीच्या तीरावर गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन केले.(Kashmir Ganesh Visarjan)
 
या आयोजनाची सुरुवात जुन्या शहरातील हब्बा कदल परिसरात असलेल्या प्राचीन श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरातून झाली. या मंदिराला ‘गणपत्यार’ या नावानेही ओळखले जाते. मंदिरात आठवडाभर धार्मिक कार्यक्रम तसेच विशेष हवनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी गणेशमूर्तीसह शोभायात्रा काढण्यात आली. जुन्या श्रीनगरमधील विविध भागांतून ही शोभायात्रा मार्गस्थ झाली. भाविक भजने म्हणत आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत पुढे जात होते. त्यानंतर ही यात्रा श्री गणेश घाट येथे पोहोचली, जिथे धार्मिक विधी आणि परंपरांचे पालन करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सोनवार येथील शिव मंदिरातूनही गणेशमूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. (Kashmir Ganesh Visarjan)
 
या आयोजनात देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेले अनेक काश्मिरी हिंदू कुटुंबीयांसह सहभागी झाले. अनेकांसाठी दीर्घ काळानंतर आपल्या जुन्या परंपरेशी पुन्हा जोडले जाण्याची ही संधी होती. मुलांसाठीही हा अनुभव विशेष ठरला. त्यापैकी अनेकांनी प्रथमच काश्मीरमध्ये गणेश विसर्जन पाहिले. काश्मिरी हिंदू नेते मोहित भान यांनी काश्मीरची सामायिक संस्कृती आणि सूफी परंपरा आजही लोकांना जोडण्याचे काम करत असल्याचे सांगितले. या आयोजनाला मिळालेले सहकार्य हे समाजासाठी सकारात्मक संदेश असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Kashmir Ganesh Visarjan)
 
गणेशमूर्ती नौकेतून झेलम नदीपर्यंत नेण्यात आली आणि त्यानंतर विधिवत विसर्जन करण्यात आले. भाविकांसाठी हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम राहिला नाही, तर आपल्या सांस्कृतिक मुळांशी आणि जुन्या आठवणींशी पुन्हा जोडणारा भावनिक क्षण ठरला. तब्बल ३५ वर्षांनंतर झालेली ही गणेश विसर्जनाची यात्रा काश्मिरी हिंदूंसाठी दीर्घकाळ स्मरणात राहणारा क्षण ठरली. (Kashmir Ganesh Visarjan)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर