श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात पुसटशी रेघ असते. अनेकदा अंधश्रद्धा देखील क्रीडा क्षेत्रामध्ये दिसते. मात्र, धार्मिक अंगाने होणारी प्रत्येक कृती ही जशी श्रद्धा नसू शकते, तशीच ती अंधश्रद्धा असेलच असे नाही. त्यामुळे श्रद्धा असल्यास त्याचा संघाला लाभच होतो. क्रीडाक्षेत्रातील याच श्रद्धा आणि अंधश्रद्धा आढावा काही उदाहरणांसहित घेणारा हा लेख...
आमच्या पराभवासाठी कोणतीही सबब देत नाही. आमचे प्रतिस्पर्धी खूप चांगले खेळले. मी कधीही माओरी ‘तापू’ आणि आफ्रिकन ‘वूडू’ व ‘जुजू’बद्दल कधीही ऐकले नव्हते. (माओरी संस्कृतीतील ‘तापू’ आणि आफ्रिकन संस्कृतीतील ‘वूडू’ व ‘जुजू’ या अत्यंत प्राचीन आणि आध्यात्मिक संकल्पना आहेत. या तिन्ही संकल्पनांचा संबंध निसर्ग, आत्मे आणि अलौकिक शक्तींवरच्या विश्वासाशी आहे.) मला आठवतंय, अलीकडेच मी एक बातमी वाचली की, एका फुटबॉल सामन्यात दक्षिण आफ्रिकेतील एका निग्रो गोलरक्षकाला, त्याच्या गोलपोस्टभोवती एक साप वेटोळे घालून बसलेला दिसला. त्यामुळे भीतीने त्याने घाईघाईने माघार घेतली. परिणामी, चेंडूला गोलपोस्टमध्ये जाण्यचा मार्ग मोकळा झाला. त्या गोलरक्षकाने, याचे कारण प्रतिस्पर्ध्यांचा जादूटोणा असल्याचे सांगितले. मला आता संशय येऊ लागला आहे की, आमच्या विजयाच्या या लांबलचक मालिकेत काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी, कोणत्यातरी जुन्या जाणत्या माओरी व्यक्तीने आमच्यावर ‘तापू’ लादला असावा.” हे मनोगत आहे, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे. हा वरचा परिच्छेद मेजर ध्यानचंद यांच्या ‘गोल’ या आत्मकथेतीलच एका प्रकरणाचा भाग आहे. ध्यानचंद यांनी या संकल्पनांचा उल्लेख अंधश्रद्धेपोटी केला नव्हता, तर उलट अंधश्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठीच आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व सांगण्यासाठी केला. या विधानाचा खरा संदर्भ आणि पार्श्वभूमी जाणून घेतल्यास, ध्यानचंदांचे विचार अधिक स्पष्ट होतील. यातूनच आपण क्रीडापटूंनी नास्तिक असावे की आस्तिक, यावर स्वतःच सारासार विचार करावा.
भारतीय हॉकी संघ १९३५ मध्ये जेव्हा न्यूझीलंडच्या दौर्यावर होता, तेव्हा त्यांना काही सामन्यांमध्ये अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. ध्यानचंद यांनी ‘गोल’मध्ये स्पष्ट लिहिले होते की, ’ते पराभवासाठी कोणतीही सबब सांगत नाहीत आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी खरोखरच उत्कृष्ट खेळ केला.’ माओरी संस्कृतीतील ‘तापू’ की ज्याचा अर्थ पवित्र किंवा प्रतिबंधित असा होतो. आफ्रिकन संस्कृतीतील ‘वूडू’ आणि ‘जुजू’ अर्थात जादूटोणासारख्या गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. ध्यानचंद यांनी दक्षिण आफ्रिकेतील ज्या गोलरक्षकाचा उल्लेख केला, तो केवळ खेळाडू कशा प्रकारे पराभवाचे खापर जादूटोण्यावर किंवा नशिबावर फोडतात हे दाखवण्यासाठीच. आमच्यावर कोणत्यातरी माओरी व्यक्तीने ‘तापू’ लादला असावा, हे ध्यानचंदांचे विधान पूर्णपणे उपरोधिकच आहे. जेव्हा एखादी गोष्ट ‘तापू’ म्हणून घोषित केली जाते, तेव्हा तिथे जवळ जाणे, तिला स्पर्श करणे किंवा ठरावीक गोष्टी करणे प्रतिबंधित असते. ध्यानचंद यांचा केवळ कठोर परिश्रम, सराव आणि मैदानावरील कौशल्यावरच विश्वास होता. एखादा सामना हरल्यावर प्रतिस्पर्ध्याच्या चांगल्या खेळाचे कौतुक करावे, त्याला जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचे नाव देऊन स्वतःची सुटका करून घेऊ नये, हाच संदेश त्यांनी यातून ‘तापू’चा संदर्भ देत दिला.
त्यामुळे, या विधानावरून ध्यानचंद हे अंधश्रद्धाळू होते, असा निष्कर्ष काढणेच चुकीचे ठरेल. उलट, ते अशा भ्रामक समजुतींच्याच पूर्णपणे विरोधात होते. मेजर ध्यानचंद हे अंधश्रद्धाळू तर अजिबातच नव्हते, तर ते प्रचंड कष्टाळू, शिस्तप्रिय आणि आपल्या खेळावर दृढ श्रद्धा ठेवणारे थोर खेळाडू होते. त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यास लक्षात की, त्यांनी मिळवलेले यश कोणत्याही चमत्कारावर किंवा अंधश्रद्धेवर आधारित नाही. तर यामागे त्यांच्या मेहनतीचे कारण आहे. ते लष्करात आपली दिवसाची ड्युटी संपवून, रात्री चंद्राच्या प्रकाशात तासन्तास हॉकीचा सराव करत, म्हणूनच त्यांच्या सहकार्यांनी त्यांना ‘चंद्र’ (चांद) हे नाव दिले होते. एकदा एका सामन्यात त्यांना गोल करता येत नव्हता. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धेचा आधार न घेता, गोलपोस्टच्या मोजमापावरच आक्षेप घेतला. तपासाअंती, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार गोलपोस्टची रुंदी खरोखरच कमी असल्याचे आढळले. हा त्यांच्या अचूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचाच पुरावा.
त्यांच्या अद्भुत खेळामुळे विरोधी संघांना वाटे की, त्यांच्या स्टिकमध्ये काहीतरी जादू किंवा चुंबक आहे. एकदा हॉलंडमध्ये त्यांची हॉकी स्टिक तोडूनही पाहण्यात आली; पण त्यात फक्त लाकूडच निघाले होते! ही घटना सर्वश्रुतच आहे. त्यामुळे, त्यांचा स्वतःच्या कष्टावर, कौशल्यावर आणि देशावर पूर्ण विश्वास होता. पण, अंधश्रद्धेला त्यांच्या आयुष्यात अजिबात स्थान नव्हते, हे स्पष्ट होते.
ध्यानचंद यांची श्रद्धा डोळस होती. त्यांचा विश्वास, श्रद्धा स्वतःच्याच सामर्थ्यावर होती. म्हणूनच ते सगळ्यांनाच प्रिय होते. ते फक्त हॉकीपटूंनाच प्रिय होते असे नाही, तर सगळ्या क्रीडाप्रकारांत ते आदरणीय होते. ध्यानचंद यांनी गोलपोस्टमधील सापाचे जे उदाहरण दिले, तशी अंधश्रद्धा कोणत्याच क्रीडापटूची नसावी. तथापि भारतीय खेळाडू किंवा व्यक्तींच्या मानसिकतेत अंधश्रद्धा किंवा काही विशिष्ट समजुती खूप खोलवर रुजलेल्या असतात, ही वस्तुस्थिती आहे. क्रीडाक्षेत्रात कामगिरी सुधारण्यासाठी प्रशिक्षण देताना या समजुतींना पूर्णपणे नकार न देता, त्यांचा सकारात्मक वापर कसा करून घेता येईल, यावर प्रशिक्षकांनी विचार करण्याची गरज आहे. थोडयात म्हणजे, एखाद्या खेळाडूची अंधश्रद्धा त्याला आत्मविश्वास देत असेल, तर प्रशिक्षकाने त्याच्या भावनेचा आदर करून खेळाडूची कामगिरी सुधारण्यासाठी त्याचा वापर करावा.
भारतीय क्रीडाक्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे खेळाडू विशिष्ट समजुतींमुळे जास्त चांगली कामगिरी करु शकतात. जसे की,
१. खेळाडूंचे ‘लकी’ कपडे किंवा वस्तू : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नेहमी डाव्या पायालाच आधी पॅड बांधत असे. सौरव गांगुलींच्या खिशात नेहमी, त्यांच्या गुरूंचा फोटो ठेवत. विरेंद्र सेहवाग काही काळ नंबर नसलेलीच जर्सी घालून खेळे. जर एखाद्या खेळाडूला वाटत असेल की, ‘लकी’ बॅट किंवा ग्लोव्हजमुळे तो चांगली कामगिरी करतो आहे, तर प्रशिक्षकांनी त्याला तीच वस्तू वापरू दिली पाहिजे. यामुळे खेळाडूचा आत्मविश्वास वाढतो, जो संघासाठी खूप गरजेचा असतो.
२. मैदानात येतानाचे विशिष्ट नियम : अनेक खेळाडू मैदानावर पाऊल ठेवण्यापूर्वी, जमिनीला स्पर्श करून नमस्कार करतात किंवा एखादी विशिष्ट कृती (उदा. उजवा पाय आधी टाकणे) करतात. प्रशिक्षक या कृतींकडे मनःशांतीची युक्ती म्हणून पाहू शकतात. यामुळे खेळाडूचा ताण कमी होतो आणि तो खेळावर लक्ष केंद्रित करू शकतो.
३. धार्मिक किंवा आध्यात्मिक विश्वास : महत्त्वाच्या सामन्यांच्या किंवा स्पर्धेपूर्वी देवळात जाणे, हातावर पवित्र धागा,ताईत बांधणे किंवा विशिष्ट मंत्र म्हणणे. जर एखाद्या खेळाडूला देवावरील विश्वासामुळे अंतर्गत शक्ती मिळत असेल, तर प्रशिक्षकाने त्याला त्यापासून रोखू नये. उलट, त्या मानसिक शांततेचा वापर करून, त्याला खेळाची रणनीती समजावावी.
भारतात कबड्डीसारखा पारंपरिक क्रीडाप्रकार असो किंवा हॉकीसारखा ऑलिम्पिक क्रीडाप्रकार; एवढेच नव्हे तर क्रिकेट असो, त्या त्या क्रीडापटूंच्या धार्मिक संकल्पना शतकानुशतके रूढ झालेल्या असतात. आपल्याकडची कबड्डी आपण जेव्हा खेळतो, तेव्हा संपूर्ण संघ धरित्रीला चरणस्पर्श करून मैदानात उतरतो. इराण असो वा युरोप, त्यांच्याकडे चरणस्पर्श ही श्रद्धा मानली जात नसली, तरी अनेक हिंदू संस्कृती जपणारे भारतीयांसारखे खेळाडू श्रद्धावान असल्याचे दिसून येते. आपल्याकडे शहरातले खेळाडू असोत अथवा वनवासी क्षेत्रातले खेळाडू, हे श्रद्धावानच असतात. त्यांना आपला खेळ अधिक चांगला करण्याची प्रेरणा त्यातूनच मिळत असते.
त्यांच्या प्रशिक्षकांपैकी कोणाचाही मुख्य उद्देश हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणे नसून, खेळाडूच्या मानसिकतेला समजून घेणे हाच असेल आणि जर एखादी समजूत कोणाचे नुकसान न करता त्याची कामगिरी सुधारत असेल, तर प्रशिक्षकाने त्याचा समावेश प्रशिक्षण पद्धतीत केलाच पाहिजे. या धार्मिक श्रद्धेचे एक उदाहरण म्हणून, बलबिरसिंग सिनियर यांचे आपण देऊ शकतो.
ध्यानचंद यांच्यानंतर तीन सुवर्णपदके भारताला मिळवून देणारे महान हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर (दोसांय) हे जेव्हा भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापक होते, तेव्हा १९७५च्या हॉकी विश्वचषकाची एक घटना प्रसिद्ध आहे. पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी, ते भारताचे माजी हॉकीपटू असलम शेर खान यांच्यासोबत मशिदीत गेले. तिथे त्यांनी भारताच्या विजयासाठी प्रार्थनाही केली. त्यावेळी मशिदीत उपस्थित असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनी आणि नमाजींनी "एक चांगला आणि सच्चा शीख (सरदार) मशिदीत प्रार्थना करायला आला आहे, देव त्यांची प्रार्थना नक्की ऐकेल,” असे म्हणून, त्यांचा आदरही केला होता. भारताने तो हॉकी विश्वचषक जिंकलाही. या घटनेत सर्वधर्मसमभाव जसा होता, तशीच त्यांची ती घटना अंधश्रद्धा पसरवणारी नव्हती, ती सच्ची श्रद्धा, मानवी मूल्ये आणि क्रीडाक्षेत्रातील सलोख्याचेच एक ज्वलंत उदाहरण होते. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे, खेळाडूंचा आत्मविश्वास आणि संघातील एकता वाढलेली त्यांना आढळ्वे. यामुळे भीती, दडपण नाहीसे होतात, असे ते मानत. प्रत्येक प्रशिक्षकाची किंवा व्यवस्थापकाची कार्यपद्धती वेगळी असू शकते. मात्र, बलबीर सिंग यांच्या उदाहरणातून काही गोष्टी, सर्वच प्रशिक्षकांनी शिकण्यासारख्या आहेत. आपल्या संघातील खेळाडूची मानसिक स्थिती ओळखून त्याला पाठिंबा देणे, हे एका चांगल्या नेत्याचे लक्षण आहे. खेळात जात-पात किंवा धर्म नसतो. मशिदीत जाऊन प्रार्थना केल्याने, पाकिस्तानी खेळाडूंच्या मनातही भारतीय व्यवस्थापकाबद्दल आदर निर्माण झाला. याने खेळातील शत्रुत्व संपून, मैत्रीची भावना वाढली. मैदानाबाहेरील अशा कृती संघाला एकत्र आणतात आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
थोडयात सांगायचे तर, बलबीर सिंग सिनियर यांची ही कृती, कर्म आणि सर्वधर्मसमभावाची श्रद्धा एकत्र आणणारी एक ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे खेळाडूंनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक जाणून, आपला सर्वोत्तम खेळ करून दाखवला पाहिजे. ध्यानचंद यांचे तिसरे पुत्र आणि पूर्व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू राजकुमार सिंह यांचे, दि. १३ सप्टेंबर रोजी झांसी येथे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाल्याची दुःखद वार्ता हा लेख लिहीत असताना वाचनात आली. राजकुमार सिंह हा त्याच्या वडिलांएवढा, काकांएवढा किंवा त्याच्या भावाएवढा म्हणजेच अशोककुमार एवढा प्रसिद्ध नव्हता, तरी राजकुमार हादेखील एक उत्तम हॉकीपटू होता. भारतीय रेल्वे हॉकीतील तो एक महत्त्वाचा खेळाडू व पदाधिकारीही होता. आपण सारेच क्रीडाप्रेमी या लेखाचा समारोप करताना, राजकुमार सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या खेळावर श्रद्धा ठेवत राहू.
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४