मुंबई (Dattatreya Hosabale on Youth) : प्रश्न विचारणे ही भारतीय परंपरेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. तरुणांच्या प्रश्नांना ऐकून, समजून संवादातून त्यांची उत्तरे देण्याची गरज आहे. कोणत्याही युवकाकडे त्याच्या बाह्य स्वरूपावर किंवा विचारांवरून पाहण्याऐवजी त्याच्यातील संवेदनशीलता आणि सकारात्मक ऊर्जा समजून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.(Dattatreya Hosabale on Youth)
समाज सेवा न्यासतर्फे आयोजित राष्ट्रीय संस्थान विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह मध्यभारत प्रांत संघचालक अशोक पांडेय आणि भोपाळ विभाग संघचालक सोमकांत उमालकर उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी आंदोलनावरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय, तांत्रिक आणि राष्ट्रीय विषयांशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले.(Dattatreya Hosabale on Youth)
सोशल मीडिया आणि वैचारिक इको चेंबरच्या युगात युवकांशी संवाद कसा साधावा यावर भाष्य करताना सरकार्यवाह म्हणाले, आजच्या पिढीला जेन झेड आणि जेन अल्फा अशा नावांनी ओळखले जाते; मात्र स्वामी विवेकानंद यांनी युवकांना युवा भारत असे संबोधले होते. नरेंद्र या नावाने ओळखले जाणारे स्वामी विवेकानंद यांनीही प्रश्न विचारले होते आणि नचिकेताची प्रश्न विचारण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे नवीन पिढी सत्ता, समाज किंवा कोणत्याही संस्थेला प्रश्न विचारत असेल, तर त्याला चुकीचे मानू नये. युवकांचे प्रश्न ऐकले पाहिजेत आणि त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. केवळ प्रश्न विचारतो म्हणून कोणालाही नाकारण्याऐवजी त्याची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.(Dattatreya Hosabale on Youth)
भारताला औपनिवेशिक मानसिकतेतून मुक्त करण्याच्या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला तरी डिकोलोनायझेशन ऑफ माइंडची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. भारतीय सभ्यतेची मूल्ये, दृष्टी आणि शब्दसंपदा यांवर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धर्म या संकल्पनेचे उदाहरण देत त्यांनी भारतीय दृष्टीकोन समजून घेण्यासाठी इतिहास, पुरातत्त्व, भाषाविज्ञान आणि समाजशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.(Dattatreya Hosabale on Youth)
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वैचारिक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वाध्याय मंडळ, समूहचर्चा आणि राष्ट्रहिताशी संबंधित रचनात्मक उपक्रम सुरू करण्याचा सल्ला दिला. बंगळुरूतील विद्यार्थ्यांच्या नमो भारती उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, छोट्या-छोट्या उपक्रमांतूनही सकारात्मक वातावरण निर्माण करता येते.(Dattatreya Hosabale on Youth)
तंत्रज्ञान साधन असावे; नियंत्रण माणसाच्या हाती राहिले पाहिजे
डिजिटल युगातील संघकार्य आणि तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नावर सरकार्यवाह म्हणाले की, मूलभूत विचार आणि मूल्ये कायमस्वरूपी असतात; मात्र काळानुसार उपलब्ध साधनांचा उपयोग केला पाहिजे. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर आवश्यक आहे; परंतु त्यावर काय आणि कोणत्या उद्देशाने प्रसारित केले जाते, हे व्यक्तीच्या संस्कारांवर आणि विवेकावर अवलंबून असते. तंत्रज्ञान मानवता, राष्ट्र, पर्यावरण आणि इतिहासाच्या हितासाठी उपयुक्त ठरले पाहिजे. माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम न होता त्याचे नियंत्रण स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे नमूद केले. तंत्रज्ञानावरील मानवी नियंत्रण कमी झाले तर ते साधन न राहता नियंत्रण करणारी शक्ती बनू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.(Dattatreya Hosabale on Youth)
वैचारिक संघर्षासाठी अभ्यासपूर्ण मांडणी आवश्यक
वैचारिक संघर्षाच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, जर त्याला 'विमर्श युद्ध' म्हटले जात असेल, तर त्यासाठी प्रभावी साधनांचीही गरज आहे. त्यासाठी तर्क सत्य आणि अभ्यासावर आधारित असावेत, स्वतःची भूमिका स्पष्ट असावी, प्रभावी माध्यमांचा वापर व्हावा आणि त्यासाठी प्रशिक्षणही आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्थेत भारतीय दृष्टीकोनाच्या समावेशाबाबत त्यांनी सांगितले की, इतिहास, पुरातत्त्व, भाषाविज्ञान आणि समाजशास्त्रातील अनेक क्षेत्रांकडे दीर्घकाळ पाश्चात्त्य दृष्टिकोनातून पाहिले गेले. समाजातील कुरीती मान्य करत त्यांचे सुधार आवश्यक आहेत; मात्र समाजाच्या सकारात्मक उपलब्धी आणि परंपरांचाही वस्तुनिष्ठ अभ्यास झाला पाहिजे.(Dattatreya Hosabale on Youth)
शिक्षणाला समाजऋणाशी जोडण्याचे आवाहन
आपल्या समारोपपर भाषणात सरकार्यवाहंनी सांगितले की, विद्यार्थी आणि प्राध्यापक हे समाजातील सुशिक्षित घटक असल्याने त्यांची जबाबदारी अधिक आहे. व्यक्तीच्या शिक्षणात समाजाचे योगदान असते; त्यामुळे शिक्षणाकडे केवळ वैयक्तिक यशाचे साधन म्हणून न पाहता समाजाप्रती असलेल्या कर्तव्याशी जोडले पाहिजे. वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि समाजाप्रतीचे दायित्व यांच्यातील समन्वय हेच धर्माचे एक महत्त्वाचे स्वरूप आहे. समाज आत्मविश्वासपूर्ण आणि सामर्थ्यवान झाला पाहिजे; मात्र ही शक्ती मानवता आणि राष्ट्रहितासाठी वापरली गेली पाहिजे. समाजाप्रती आपल्या मनात किती खोल संवेदना आहे आणि त्या संवेदनांचे कृतीत रूपांतर करण्याची आपली काय योजना आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा.(Dattatreya Hosabale on Youth)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक