भारत अविनाशी आणि मृत्युंजयी राष्ट्र आहे! : दत्तात्रेय होसबाळे

भोपाळमध्ये सुमारे ३० हजार स्वयंसेवकांचे विराट एकत्रीकरण

    21-Sep-2026   

 Dattatreya Hosabale Bhopal  
मुंबई (Dattatreya Hosabale Bhopal) : भारत एक अविनाशी आणि मृत्युंजयी राष्ट्र आहे. एखाद्या समाजाची खरी ताकद त्याच्यासमोर समस्या येतात की नाही, यात नसते; तर त्या समस्यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य त्या समाजात किती आहे, यात असते. भारताच्या इतिहासात आक्रमणे झाली, संघर्ष झाले, सामाजिक शिथिलता आली आणि अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली. तरीही समाजाने आपले अस्तित्व आणि सांस्कृतिक सातत्य कायम राखले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रविवारी भोपाळ येथील लाल परेड मैदानावर स्वयंसेवकांचे विराट एकत्रीकरण आयोजित करण्यात आले. शिस्त, संघटन आणि राष्ट्रभावनेने ओतप्रोत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ३० हजार स्वयंसेवकांसह समाजातील ५ हजार मातृशक्ती आणि मान्यवर सहभागी झाले. कार्यक्रमात संघाच्या शताब्दी प्रवासाचा, समाजसंपर्काचा आणि सेवा कार्यांचा आढावा सादर करण्यात आला. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून एम्स भोपाळचे संचालक लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल उपस्थित होते. त्याचबरोबर मध्यभारत प्रांत संघचालक अशोक पांडेय आणि भोपाळ विभाग संघचालक सोमकांत उमाळकर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वयंसेवकांच्या सांघिक योगप्रदर्शनाने झाली. पुढे संघाच्या घोषवादकांनी विविध रचनांचे सादरीकरण केले. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
उपस्थितांना संबोधित करताना सरकार्यवाह म्हणाले, भारत वेगाने प्रगती करत असून ती अनेक क्षेत्रांत स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताचा विकास केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण विश्वमानवतेसाठीही आवश्यक आहे. आज विज्ञान, अंतराळ संशोधन आणि विविध क्षेत्रांतील भारतीयांच्या कामगिरीमुळे जगभर भारताचा सन्मान वाढला आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारताविषयी उत्सुकता, आदर आणि अभिमानाची भावना दिसून येते. प्रत्येक नागरिकाने दररोज स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की, मी राष्ट्रासाठी आज काय करू शकतो?, हाच विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया अधिक भक्कम करतो. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
पुढे ते म्हणाले, भारताच्या सुमारे पाच हजार वर्षांच्या सभ्यतागत प्रवासात एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते की, संकट कितीही मोठे असले तरी भारत प्रत्येक वेळी त्यातून सावरत पुढे गेला आहे. विविध कालखंडांत भारताने आक्रमणे, संघर्ष आणि संकटांचा सामना केला; मात्र समाजाची जीवनशक्ती कधीही संपुष्टात आली नाही. जगात अनेक अशा सभ्यता आणि राष्ट्रे झाली, जी एकेकाळी अत्यंत सामर्थ्यवान होती; परंतु आज त्यांचा उल्लेख केवळ इतिहासात आढळतो किंवा त्यांचे अवशेष संग्रहालयांत पाहायला मिळतात. याउलट भारत आजही एक चैतन्यशील समाज म्हणून उभा आहे. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
अंतिम घटकापर्यंत विकास पोहोचणे हीच खरी प्रगती
 
लेफ्टनंट जनरल डॉ. नरेंद्र कोतवाल म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास हा समाजनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाकडे जाणारा प्रवास आहे. अशा कार्यक्रमात उपस्थित राहणे त्यांच्यासाठी गौरवाची बाब आहे. संघाचे कार्य व्यक्तीपासून सुरू होऊन कुटुंब, समाज आणि राष्ट्रापर्यंत पोहोचते. कोणत्याही राष्ट्राची ताकद केवळ भौतिक प्रगतीवर ठरत नाही; तर नागरिकांचे चारित्र्य, सामाजिक एकात्मता, कर्तव्यभावना आणि परस्पर सहकार्य यांवरही ती अवलंबून असते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचल्या आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःला राष्ट्रनिर्मितीचा सक्रिय सहभागी मानले, तरच राष्ट्राची प्रगती अर्थपूर्ण ठरेल. भारताचा प्रवास अखंड सुरू राहणारा आहे. संकटे येतील, परिस्थिती बदलतील आणि नवी आव्हाने उभी राहतील; मात्र समाजाने आपल्या संघटित शक्ती, चारित्र्य आणि सामर्थ्याच्या बळावर त्यांचा सामना करण्याची क्षमता कायम ठेवली पाहिजे. हीच भारताच्या चिरंतन सभ्यतेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
राष्ट्रभावनेच्या विस्मृतीतून समाज कमकुवत झाला
 
दत्तात्रेय होसबाले म्हणाले की, दीर्घकाळ चाललेल्या पराधीनतेच्या काळात भारतीय समाजाला स्वतःच्या स्वरूपाची आणि सामर्थ्याची विस्मृती झाली. समाजाची अंतर्गत शक्ती, राष्ट्रभावना आणि आपल्या दायित्वाविषयी जी जागरूकता असायला हवी होती, ती कमकुवत झाली. परस्परांतील राग-द्वेष, संघर्ष आणि सामाजिक कुप्रथांमुळे समाजाची एकताही बाधित झाली. जेव्हा समाज आपला इतिहास, संस्कृती आणि सामूहिक दायित्व विसरतो, तेव्हा त्याची शक्ती क्षीण होते, असे त्यांनी सांगितले. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
ही श्रीराम, बुद्ध आणि महावीरांची भूमी
 
सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे म्हणाले की, भारताची ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमांमुळे होत नाही. भारत म्हणजे केवळ भूमीचा एक तुकडा किंवा एखादी राज्यव्यवस्था नाही. ही अशी सभ्यता आहे, जिने जीवनाला केवळ भौतिक सुख आणि उपभोगापुरते मर्यादित मानले नाही. ही प्रभू श्रीराम, बुद्ध आणि महावीरांची भूमी आहे. याचा अर्थ ही शील आणि चारित्र्याची भूमी आहे. भारतीय चिंतनात व्यक्तीच्या चारित्र्यनिर्माणाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच संघाच्या शाखेच्या माध्यमातून व्यक्तीचे चारित्र्य घडविण्यासोबतच समाजात संघटनभाव जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो. शाखा हे केवळ शारीरिक व्यायामाचे ठिकाण नाही. तेथे व्यक्ती स्वतःपुरता विचार करण्यापलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्राचा विचार करायला शिकते, असे त्यांनी सांगितले. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
पंच परिवर्तन हे समाजातील सकारात्मक बदलाचे आधार
 
गेल्या वर्षभरात देशभरात विविध लहान-मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजासोबत मिळून कोणती सकारात्मक कामे करता येतील, यावर विचार करण्यात आला. या चिंतनातून पंच परिवर्तनाचा विचार समाजासमोर मांडण्यात आला. पंच परिवर्तनामध्ये सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य, स्वबोध, पर्यावरण संरक्षण आणि कुटुंब प्रबोधन या विषयांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे. हे पाचही विषय समाजजीवनाशी निगडित असून, त्यांच्यामाध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तनाची दिशा निर्माण करता येऊ शकते, असे सरकार्यवाहंनी सांगितले. (Dattatreya Hosabale Bhopal)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर