नायावरील कामगारांपासून ते ‘डम्पिंग ग्राऊंड’वरील मुलांच्या अंधारमय आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पसरवणार्या विशाल जाधव यांच्याविषयी...
विशाल जाधव यांचा जन्म कल्याणमधला. बालपणही कल्याणमध्येच गेले. बालपण म्हणजे आपण आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा गोड आठवणी. पण, विशालचे बालपण हे संघर्षमय होते. विशालची आई विमल या गृहिणी असून, वडील लडकू हे टपाल विभागात कार्यरत होते. यातूनच त्यांना तुटपुंजे उत्पन्न मिळे. त्यातूनच चार भावंडं आणि घरखर्च चाले. विशाल यांचे घर कुडाचे, दोन खोल्यांचे होते. विशालच्या जीवनात परिस्थितीने जरी संघर्ष लिहिला, तरी त्याच्याशी दोन हात करत, शिक्षण घेण्याचा त्यांचा निर्धार मात्र पक्का होता. त्यामुळे विशाल लहानपणापासूनच, छोटी-मोठी कामे करत असे. उन्हाळ्याच्या सुटीत, काकडी, करवंद, जांभळे फेरीवर विकण्याचे काम तो करे. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असतानाही, कॅटरिंग कामालाही तो जाई. काही अर्थाजन होऊन, त्यातून शिक्षण घेता येईल, असा विशालचा त्यामगचा विचार.
विशालचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण, जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पाचवी ते दहावीचे शिक्षण, ‘छत्रपती शिक्षण मंडळ नूतन विद्यालय’ येथे घेतले. त्यानंतर ‘अग्रवाल महाविद्यालया’तून ‘इतिहास’ विषयात पदवीही त्याने संपादन केली. याशिवाय, विशालने ‘एमएसडब्ल्यू’चेही शिक्षण घेतले. ‘मास्टर इन जर्नालिझम’ही त्याने पूर्ण केले.
महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच प्रा. मीनल सोहोनी यांच्यामुळे सामाजिक कामाशी त्याची ओळख झाली. आदिवासी पाड्यावर जाऊन, त्यांचे प्रश्न समजून घेणे, अशी कामे तो करु लागला. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर, सामाजिक काम करण्याचाच निश्चय विशालने केला. त्यानुसार सुरुवातीला ‘नाका कामगार संघटने’त कल्याण ते ठाणे विभागात विविध नायावर सकाळी जाऊन, नाका कामगारांचे संघटन व विविध योजनांचा लाभ देण्यासाठी काम केले. विशालला सामाजिक कार्याची आवड असल्याने, त्याने ‘मास्टर ऑफ सोशलवर्क’ अर्थात ’एमएसडबल्यू’ करण्याचा निर्णय घेतला. हे करताना, एकीकडे सामाजिक कामही सुरू होते. विशाल कल्याणच्या ‘अनुबंध’ संस्थेसोबत सुरुवातीपासूनच जोडला गेला होता. नाका कामगारांचे प्रश्न सोडवताना, कामातून वेळ मिळाल्यावर तो ‘डम्पिंग ग्राऊंड’वरील मुलांच्या शिक्षणासाठीही काम करे. या कामातही त्याने सातत्य ठेवले.
कल्याण ग्रामीण भागातील आदिवासी समूहाशी २०१२ पासून संपर्क आल्याने, त्यांचे प्रश्न समजून घेत पुढील काळात या विभागात काम करण्याचे त्याने ठरवले. यानुसार विशालने विविध वाड्या-वस्त्यांवर नियमित जाणे सुरू ठेवले, त्यामध्ये आदिवासी समूहाच्या रोजच्या जगण्याचे बरेच प्रश्न समोर आले. रेशनवरील धान्याचे प्रश्न, राहत्या घरांचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, रोजगार, हिंसाचार अशा अनेक समस्यांना घेऊन, विविध पाड्यावर त्याने काम सुरू केले. ते आजही सुरु आहे. २०२६मध्ये अजूनही, काही पाड्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. तर, काही ठिकाणी वाडीत जाण्यासाठीच रस्ता नाही. ज्या रस्त्यांना किंवा कामांना मंजुरी दिली जात नाही, अशा मुद्द्यांवर संघटित होऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे काम विशालच्या माध्यमातून होत आहे. विशेष म्हणजे, या कामातील लोकसहभागाचे महत्त्वही, विशाल अधोरेखित करतो.
‘कोविड’ काळात ‘रेशनिंग कृती समिती’च्या माध्यमातून, टोल-फ्री नंबर सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये विशालचा सहभाग मोठाच. दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रातून, धान्याबाबत तक्रारी येत होत्या. त्या तक्रारी ऐकूण घेणे, संबंधित जिल्ह्यात अधिकारी यांना संपर्क साधून त्यांचे निरसन करणे, असे कार्य अव्याहतपणे सुरू होते. त्याकाळात अंदाजे दिवसाला १०० फोन येत. याच काळात इतर जिल्ह्यांतील, राज्यांतील विविध कुटुंबांना, कल्याणमधील संस्थांच्या व वैयक्तिक व्यक्तींच्या सहभागातून पाच हजार लोकांना किराणा वाटप करण्यात विशालचा वाटा सिंहाचा.
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून, ग्रामीण भागातील आदिवासी महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला. नियमित निराधार महिलांना, निःशुल्क सेवाही देण्यात आली आहे. ही योजना सुरू करण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागले. मात्र, त्यानंतर त्यांच्या चेहर्यावरील आनंद महत्त्वाचा असल्याचे विशाल सांगतो. शासन स्तरावर आदिवासी बांधवांना फारच वाईट अनुभव आलेले असतात. अशा वेळेस त्यांच्यासोबत उभे राहून, त्यांना सहकार्य करण्याचे विशालचे काम सातत्याने सुरू आहे. आजपर्यंत असंख्य कातकरी व ठाकूर समूहांचे शिधापत्रिका, फक्त शासकीय शुल्कात मिळवून दिले आहेत. यामुळे त्या कुटुंबांचा अन्नाचा प्रश्न सुटला आणि अन्नासाठीची भटकंती काही प्रमाणात थांबली. मुलांचा शैक्षणिक क्रमही चढता राहावा, त्यासाठी कल्याण ग्रामीणमधील काही जिल्हा परिषद शाळेमध्ये नियमित उपक्रम राबविण्यात येतात. यातही विशालचे मोलाचे योगदान आहे. त्याला ‘अग्रज’, ‘प्राईड ऑफ कल्याणकर’, ‘कॉ. अशोक मनोहर युवा ऊर्जा पुरस्कार’, ‘अनसङ्ग हिरोज’ सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!