चित्रपटसृष्टीत काही चेहरे लोकप्रिय होतात, काही भूमिका गाजतात आणि काही कलाकार मात्र आपली स्वतंत्र खूण उमटवतात. अनंत नाग यांचे स्थान या तिसर्या प्रकारातले. त्यांनी रंगभूमीपासून चित्रपट आणि दूरदर्शनपर्यंतचा आपला प्रवास घडवला. म्हणूनच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४’ त्यांना जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारा हा लेख...
२०१८ साली आलेला ‘केजीएफ भाग १’ आठवतोय. चित्रपटाची सुरुवातच होते, एका वरिष्ठ पत्रकाराच्या मुलाखतीने. रॉकी भाईच्या साम्राज्याची गोष्ट त्याच्या तोंडून ऐकवली जाते. ज्या पद्धतीने ती कथा तो ऐकवतो, त्यातच आपण नकळत गुंततो. यातील वरिष्ठ पत्रकार आनंद इंगलागी यांची भूमिका साकारली होती, ज्येष्ठ कन्नड अभिनेता अनंत नाग यांनी. भूमिका जरी छोटी असली तरी अनंत यांनी अशी काही छाप सोडली की, प्रेक्षक रॉकी भाईसारखेच या पात्राच्याही प्रेमात पडले. त्यांचा भारदस्त आवाज, उत्कृष्ट अभिनय आणि कथाकथन शैलीने पहिल्या भागाचा एक भक्कम पाया घातला. या भूमिकेतील त्यांच्या आवाजाने आणि पडद्यावरील उपस्थितीने, प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले. शिवाय, ‘केजीएफ भाग १’च्या यशात महत्त्वाची भूमिकाही बजावली. ही आठवण करून देण्याचं कारण म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४’ने सन्मानित केले जाणार आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया येथे होणार्या ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
पाच दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत, त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. हिंदीसह अनेक भाषांमधील चित्रपटसृष्टीतही त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘अंकुर’ आणि ‘मालगुडी डेज’सारख्या प्रसिद्ध प्रकल्पांमध्ये भूमिका साकारलेल्या अनंत नाग यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४’साठी निवड होणे, हा सगळ्यांसाठीच अभिमानाचा क्षण. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगतीमधील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. २०२५ मध्ये, भारत सरकारने अनंत नाग यांना चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल, भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ प्रदान केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी आतापर्यंत, पाचवेळा कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कारही जिंकला आहे. तसेच त्यांनी कारकिर्दीत सहा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले.
अनंत नाग हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी आहेत. कन्नड चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी ते ओळखले जातात. अनंत नाग यांचा जन्म दि. ४ सप्टेंबर १९४८ रोजी झाला असून, त्यांचे पूर्ण नाव अनंत नागरकट्टे. ते प्रामुख्याने कन्नड चित्रपटांतील अभिनेते असूनही त्यांनी हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळी, मराठी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयाव्यतिरिक्त, अनंत नाग यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गंभीर भूमिकांपासून ते सहज-सोप्या भूमिका करताना, त्यांनी अभिनयाचे सामर्थ्य सिद्ध केले.
अनंत नाग यांनी प्रा. पी. व्ही नंजराज उर्स दिग्दर्शित ‘संकल्प’ या चित्रपटाद्वारे, कन्नड चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीत, ‘अंकुर’, ‘भूमिका’, ‘कालीचरण’ आणि ‘जुर्म’सारख्या चित्रपटांमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. ‘गौरी गणेश’, ‘मिंचना ओटा’, ‘बेलाडिंगला बढे’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचेही कौतुक झाले. ‘अंकुर’द्वारे त्यांनी हिंदी चित्रपट पदार्पण करत, सगळ्यांचेच लक्ष वेधले. शबाना आझमी आणि प्रिया तेंडुलकरांसारख्या दिग्गज अभिनेत्री असूनही, नाग यांची भूमिकाच सगळ्यांच्या लक्षात राहिली. अनंत नाग यांनी टेलिव्हिजनवरही काम केले आहे. शिवाय आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित दूरदर्शनच्या ‘मालगुडी डेज’ या लोकप्रिय मालिकेद्वारे, अनंत नाग यांना घरोघरी ओळख मिळाली. त्यांनी साकारलेले ‘स्वामी’ हे पात्र घराघरात पोहोचले. या मालिकेचे दिग्दर्शन त्यांचा भाऊ शंकरनेच केले होते. कन्नड चित्रपटसृष्टीत एक विश्वासार्ह आणि आदरणीय कलाकार म्हणून, त्यांची ओळख आहे. ‘केजीएफ’मधील त्यांच्या दमदार अभिनयाने, त्यांना नव्या पिढीशी जोडले.
अनंत नाग यांचे सुरुवातीचे शिक्षण अज्जरकाड, उडुपी येथील कॅथलिक शाळेत, दक्षिण कन्नडमधील आनंद आश्रमात आणि तत्कालीन म्हैसूर संस्थानातील (आता कर्नाटक) उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या चित्रपूर मठात झाले. नववीमध्ये, अवघ्या १२ वर्षांचे असतानाच, त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईस यावे लागले. त्यावेळी त्यांनी सशस्त्र दलात सामील होण्याचाही प्रयत्न केला. परंतु, कमी वजनामुळे सैन्याने आणि कमी दृष्टीमुळे हवाई दलाने त्यांना नाकारले. त्याचदरम्यान ते मुंबईतील नाट्य चळवळीकडे आकर्षित झाले. कोकणी, कन्नड, मराठी भाषेतील नाटकांमधील अभिनयासाठी, त्यांची निवडही झाली. त्यांनी महाविद्यालयात शिकत असतानाच बँकेतही काम केले. वयाच्या १८व्या वर्षी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केल्यावर, पाच वर्षे ते रंगभूमीशीच जोडलेले राहिले. यामुळे त्यांना संधीही सतत मिळत राहिल्या. त्यांनी सत्यदेव दुबे, गिरीश कर्नाड आणि अमोल पालेकरसारख्या दिग्गजांच्या नाटकांमध्येही अभिनय केला.
मुंबईतील नाट्य कारकिर्दीनंतर, नाग यांनी १९७३ मध्ये ‘संकल्प’ या कन्नड चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ते समांतर चित्रपट चळवळीचा एक अविभाज्य भाग झाले, जी १९७० आणि १९८०च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर होती. नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनीच, नाग यांची ओळख दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याशी करून दिली. त्यानंतर त्यांनी बेनेगल यांच्या सहा चित्रपटांमध्ये काम केले. ‘अंकुर’, ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘कोंडुरा’ आणि ‘कलयुग’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाने, सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. नाग यांनी जी. व्ही. अय्यर यांच्या ‘हम्सगिथे’ या चित्रपटात, कर्नाटकी गायकाच्या शिष्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला, कन्नडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला.त्यांच्या काही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कन्नड चित्रपटांमध्ये ‘बयालू दारी’, ‘कन्नेश्वर रामा’, ‘ना निन्ना बिदालारे’, ‘चंदनदा गोम्बे’, ‘बेंकिया बाले’, ‘हेंडथिगे हेलाबेडी’, गणेश मदुवे’, ’गौरी गणेश’, ‘राजकुमारा’, ‘कासरगोडू’, ‘कोडुगे : रामण्णा राय’, ‘अडुवा गोम्बे’ आणि ‘गालीपाटा २’ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
गोधी बन्ना साधारण ‘मायकट्टू’ या चित्रपटात अल्झायमरच्या रुग्णाच्या भूमिकेतील नाग यांच्या अभिनयाचे तर, समीक्षकांनी विशेष कौतुक केले. प्रायोगिक चित्रपटाच्या व्यावसायिक यशातही त्यांनी योगदान दिले. त्यांनी कॉमेडी-ड्रामा ‘गालीपाटा २’मध्ये, ‘किशोर’ नावाच्या एका कन्नड भाषेच्या प्राध्यापकाची भूमिका साकारली. त्यांच्या या पात्राचेही विशेष कौतुक झाले. नाग यांना कन्नड चित्रपटसृष्टीत खूप संधी मिळाल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ते याच क्षेत्रात अधिक काम करू शकतील. जेव्हा कन्नड चित्रपटसृष्टीत जास्त संधी मिळू लागल्या, तेव्हा त्यांनी बंगळुरुमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकातील चाहत्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे ते नेहमीच सांगतात.
‘केजीएफ भाग १’च्या यशात अनंत नाग यांचा मोलाचा वाटा होता. पण पुढे ‘केजीएफ भाग २’मध्ये मात्र अनंत नाग दिसले नाहीत. दिग्दर्शक प्रशांत नीलने अनंत नाग यांनी साकारलेल्या पात्रात काही बदल केले, ज्यामुळे नाग असमाधानी होते. त्यामुळे, त्यांनी या बहुभाषिक चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यावेळी प्रकाश राज यांना नाग यांच्या भूमिकेत घेण्यात आल्याच्या चर्चेने, चाहत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी चित्रपटाचा दिग्दर्शक प्रशांत नील याने "प्रकाश राज यांनी अनंत नाग यांची जागा घेतलेली नसून, तर ते चित्रपटात एक पूर्णपणे वेगळी भूमिका साकारत आहेत,” असे स्पष्टीकरण दिलं होतं. अनंत नाग यांचे जीवन केवळ सार्वजनिक क्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते. चित्रपटाबरोबरच, त्यांनी राजकीय मैदानातही आपले नशीब आजमावले होते. त्यांनी १९८८ ते १९९४ पर्यंत, कर्नाटक विधान परिषदेत आणि १९९४ ते १९९९ पर्यंत विधानसभेत काम केले. विधानसभेतील त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी बंगळुरु शहर विकास राज्यमंत्रीही म्हणून काम पाहिले आहे.
‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’साठी निवड झाल्यावर लगेचच अनंत नाग यांनी, अभिनयातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्यामुळे अनेकांना वाईट वाटले. आजच्या चित्रपटांमध्ये चांगल्या कथा आणि लेखनाची वानवाच आहे. सिनेमाचे संपूर्ण लक्ष आता फक्त ‘बॉक्स ऑफीस कलेशन’ आणि पैसे कमावण्यावरच केंद्रित झाल्याचे सांगत, नाग यांनी आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्यांचे शेवटचे पाच चित्रपट ‘बॉक्स ऑफीस’वर अयशस्वी ठरले. त्यामुळेच कदाचित त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त काळ रसिकांचे मनोरंजन करणार्या अशा या हरहुन्नरी, अष्टपैलू अभिनेत्याला एवढ्या मोठ्या पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन!
- कपिल देशपांडे