ठाणे: नशामुक्त भारत अभियान सुरू असतानाच ठाणे शहरात ड्रग्जविरोधी कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात काही ठिकाणी हुक्का पार्लर लपूनछपून सुरू असल्याच्या तक्रारींसोबतच मोकळ्या जागेत अथवा रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रक-टेम्पोच्या आडून ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट आमदार संजय केळकर यांनी केला आहे... याबाबतची सर्व माहिती पोलिसांना देण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ठोस कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. (Thane Drugs Sanjay Kelkar)
आमदार केळकर यांच्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या १२९व्या कार्यक्रमात जागरूक नागरिकांनी हुक्का पार्लर आणि अमली पदार्थांच्या व्यवसायाबाबत तक्रारी मांडल्या. ठाणे शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी काही वर्षांपासून लोकसहभागातून चळवळ सुरू आहे. या चळवळीमुळे अनेक ठिकाणी कारवाई झाली असली, तरी काही भागांत अजूनही छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. (Thane Drugs Sanjay Kelkar)
विशेष म्हणजे, हुक्का पार्लरपुरता हा प्रकार मर्यादित नसून ट्रक आणि टेम्पोच्या आडून ड्रग्जची विक्री होत असल्याची माहितीही मिळाली आहे. संबंधित ठिकाणांची माहिती पोलिसांना देण्यात आली असल्याचे केळकर यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी तातडीने तपास करून कारवाई करावी, अशी मागणी केली जाणार आहे. (Thane Drugs Sanjay Kelkar)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अमली पदार्थांविरोधात विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर ठाणे शहरात हुक्का पार्लरमुक्त ठाणे ही चळवळ लोकसहभागातून पुढे नेण्यात येत आहे. पोलिसांचे सहकार्य आणि नागरिकांचा सहभाग यामुळे ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले. (Thane Drugs Sanjay Kelkar)
लढा तीव्र करण्याची गरज
“ठाण्यातील नवीन पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडून उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी हुक्का पार्लर आणि ड्रग्जविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे. काही ठिकाणी अजूनही हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्याचबरोबर ट्रक-टेम्पोच्या आडून ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याची माहितीही पोलिसांना दिली आहे. येत्या दोन दिवसांत पोलीस आयुक्तांशी चर्चा करून या प्रकारांवर तातडीने आणि ठोस कारवाई करण्याची मागणी करणार आहे,” (Thane Drugs Sanjay Kelkar)