हजार वर्षांची गोष्ट - हत्तरसंग कुडल

भीमा-सीनेच्या काठावर दडलेले स्थापत्य, शिल्प आणि मराठी भाषेचे विलक्षण संचित

    20-Sep-2026
 
Hattarsang Kudal

सोलापूर शहरापासून साधारण ४० किमी दूर गेल्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमाभागात भीमा आणि सीना या दोन नद्या एकमेकींना मिळतात. या संगमाच्या काठावर वसले आहे, एक छोटेसे गाव हत्तरसंग कुडल. ‘कुडल’ या कानडी शब्दाचा अर्थच मुळात ‘संगम.’ नावातच या गावाचे भूगोलाशी असलेले नाते दडलेले आहे. तेव्हा आज हत्तरसंग कुडलच्या संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिराच्या स्थापत्य, शिल्प आणि मराठी भाषेच्या विलक्षण संचिताविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...

आज या संगमाकडे पाहताना हा परिसर शांत वाटतो. पण, नदीकाठच्या दगडांमध्ये डोकावू लागलो की, जवळपास हजार वर्षांपूर्वीचा एक वेगळाच महाराष्ट्र आपल्यासमोर उभा राहू लागतो. येथे एक नाही, तर दोन विलक्षण प्राचीन मंदिरे आहेत, संगमेश्वर आणि हरिहरेश्वर. एक मंदिर आपल्याला थेट इ.स. १०१८ पर्यंत घेऊन जाते; दुसरे काही दशकांपूर्वीपर्यंत चक्क मातीच्या ढिगार्‍याखाली दडलेले होते. त्यात भर म्हणजे, एका प्रचंड शिवलिंगावर कोरलेल्या शेकडो शिवप्रतिमा!
 
हत्तरसंगची गोष्ट म्हणूनच केवळ एका प्राचीन मंदिराची गोष्ट राहत नाही; ती आहे संगमांची गोष्ट.
सर्वप्रथम येते, ते संगमेश्वर मंदिर.
चालुयकालीन स्थापत्यपरंपरेशी जोडले जाणारे हे त्रिकूट मंदिर आहे. म्हणजे मंदिराला तीन गर्भगृहे आहेत. काळाच्या ओघात मंदिराचे अनेकदा जीर्णोद्धार झाले असले, तरी त्याच्या प्राचीन स्थापत्याची साक्ष आजही अनेक ठिकाणी वाचता येते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा प्रवास करत आत जाताना चौकोन, षट्कोन, अष्टकोन आणि वर्तुळ अशा वेगवेगळ्या भौमितिक आकारांत घडवलेले स्तंभ लक्ष वेधून घेतात. वितानावरील चक्राकार नक्षी, द्वारशाखांवरील पुष्पवल्ली, कीर्तिमुख, नंदी आणि गणेश यांच्या प्रतिमा या वास्तूला केवळ उपासनेची जागा न ठेवता, दगडात घडवलेल्या कलाकृतीचे स्वरूप देतात.पण, संगमेश्वराच्या सभामंडपात एक अशी गोष्ट आहे, जिच्यामुळे हे मंदिर महाराष्ट्राच्या भाषिक इतिहासातही अत्यंत महत्त्वाचे ठरते.
एका दगडी तुळईवर अवघ्या अडीच ओळींचा एक शिलालेख कोरलेला आहे. त्यात शके ९४०, म्हणजे इ.स. १०१८ असा स्पष्ट कालोल्लेख येतो. शिलालेख अभ्यासक आनंद ना. कुंभार यांनी त्याचे वाचन करून १९७५ मध्ये त्यावर सविस्तर लेख प्रसिद्ध केला. संपूर्ण लेख मराठीत नसला, तरी त्याच्या शेवटी येणारे ‘वाछितो विजेयां होइवा’ हे शब्द विशेष महत्त्वाचे आहेत. साधारण अर्थ, ‘वाचेल तो विजयी होवो!’
 
ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या २५० वर्षांहून अधिक आधी या दगडी तुळईवर मराठी भाषेची अशी अभिव्यक्ती सापडते, ही कल्पनाच रोमांचक आहे! म्हणून या लेखाला कालोल्लेख असलेल्या मराठीच्या अत्यंत प्रारंभिक शिलालेखांपैकी एक म्हणून विशेष महत्त्व आहे.
पण, हत्तरसंगचा खरा आश्चर्याचा धक्का अजून पुढे आहे. संगमेश्वराच्या जवळच आहे हरिहरेश्वर मंदिर. २०व्या शतकाच्या अखेरीपर्यंत या मंदिराचा मोठा भाग मातीमध्ये गाडला गेला होता. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातील प्रा. गजानन भिडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नांतून १९९०च्या दशकात हे मंदिर पुन्हा प्रकाशात आले. माती दूर होत गेली आणि जवळपास विस्मृतीत गेलेले एक सुंदर देवालय पुन्हा सूर्यप्रकाशात आले!
या मंदिराची रचनाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुखमंडप, सभामंडप, खुले स्वर्गमंडप, अंतराळ आणि त्यापुढे शेजारी-शेजारी असलेली दोन गर्भगृहे. एका गर्भगृहात शिवलिंग, तर दुसर्‍यात मुरलीधर कृष्णाची प्रतिमा! इथेच ‘हरिहरेश्वर’ या नावाचा अर्थ ‘दगडात साकार’ होतो. हर आणि हरि, शिव आणि विष्णू, एकाच वास्तूमध्ये समान स्थानावर!
 
भारतीय मंदिरपरंपरेचा हा एक सुंदर स्वभाव आहे. आपण आज शैव, वैष्णव, शाक्त अशा परंपरांकडे वेगवेगळ्या चौकटींतून पाहतो; पण प्रत्यक्ष प्राचीन-मध्ययुगीन मंदिरांकडे गेल्यावर या सीमारेषा अनेकदा विरघळताना दिसतात. हत्तरसंगमध्ये हा संवाद तर स्थापत्याच्या आराखड्यातच उतरला आहे.
हरिहरेश्वराच्या आत गेल्यावर ही कथा आणखी रंगत जाते. सभामंडप आणि रंगमंडपाच्या वरच्या भागात कृष्णाच्या विविध लीला कोरलेल्या आहेत. गोपींसोबत रासक्रीडा करणारा कृष्ण, मित्रांसोबत खेळणारा कृष्ण, बासरी वाजवणारा कृष्ण! दगडातल्या या प्रतिमा मंदिरात अचानक चैतन्य निर्माण करतात. दुसरीकडे भव्य कालभैरव, यक्ष, किन्नर, सुरसुंदरी, गजराज अशा अनेक प्रतिमा दिसतात. एका मंदिरात कृष्णाच्या माधुर्यापासून भैरवाच्या उग्रतेपर्यंत भारतीय देवकल्पनेचा किती मोठा पट सामावू शकतो, याची अनुभूती येथे येते.
आणि मग येते हत्तरसंगमधील सर्वांत गूढ शिल्प! संवर्धन आणि उत्खननाच्या कामात येथे एक प्रचंड शिवलिंग सापडले. साधारण चार मीटर परिघाचे, एक मीटरपेक्षा अधिक उंच आणि जवळपास चार टन वजनाचे हे शिवलिंग सामान्य नाही. त्याच्या पृष्ठभागावर बसलेल्या आणि उभ्या शिवप्रतिमा, तसेच असंख्य शिवमुखे कोरलेली आहेत. त्यांची एकूण संख्या ३५९ असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे.
लोकप्रिय वर्णनात त्याला ‘३५९ मुखी शिवलिंग’ म्हटले जाते; मात्र त्याकडे थोडे काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. सर्व ३५९ आकृती केवळ मुखे नाहीत. त्यामध्ये शिवाची पूर्णाकृती रूपेही आहेत. त्यामुळे काही अभ्यासकांनी या विलक्षण प्रतिमेचा संबंध ‘महासदाशिव’ या बहुरूपी शिवसंकल्पनेशी जोडण्याची शयता मांडली आहे.
 
यामुळे या शिवलिंगाचे महत्त्व आणखी वाढते. शिव म्हणजे केवळ एका रूपात बंदिस्त करता येणारी देवता नाही. नटराज, भैरव, दक्षिणामूर्ती, अर्धनारीश्वर, लिंग, सदाशिव अशा असंख्य रूपांत तो व्यक्त होतो. हत्तरसंगचे हे विशाल लिंग जणू याच कल्पनेला एका पाषाणात सामावून घेण्याचा प्रयत्न करते, एकात अनेक आणि अनेकांत पुन्हा एक! आणि मग लक्षात येते की, हत्तरसंगची संपूर्ण भूमीच आपल्याला हीच गोष्ट सांगत आहे! इथे भीमा आणि सीना एकत्र येतात. हरिहरेश्वरात हर आणि हरि एकत्र येतात. शिल्पांमध्ये शैव आणि वैष्णव कल्पना एकत्र येतात. स्थापत्यामध्ये महाराष्ट्र आणि दख्खनच्या व्यापक कलापरंपरांचा संवाद दिसतो. आणि संगमेश्वराच्या दगडी तुळईवर संस्कृतप्रधान लेखनाच्या वातावरणातून मराठीची प्रारंभिक अभिव्यक्ती आपल्याशी बोलू लागते.
म्हणून हत्तरसंग कुडलला गेल्यावर केवळ ‘३५९ मुखी शिवलिंग’ पाहून परत येऊ नका. संगमावर काही वेळ शांत बसा. संगमेश्वराच्या सभामंडपातील ती हजार वर्षांपूर्वीची अक्षरे शोधा. हरिहरेश्वराच्या स्वर्गमंडपात उभे राहून वरच्या शिल्पांकडे पाहा. एका गर्भगृहातील शिव आणि शेजारच्या गर्भगृहातील मुरलीधर कृष्णाकडे पाहा. आणि मग त्या प्रचंड बहुरूपी शिवलिंगासमोर उभे राहा.
कारण, हत्तरसंग आपल्याला केवळ एक प्राचीन मंदिर दाखवत नाही, ते आपल्याला भारतीय संस्कृतीचे एक सुंदर सूत्र समजावते, वेगवेगळे प्रवाह एकमेकांना मिळाले, म्हणून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपत नाही; उलट त्यांच्या संगमातून एक नवीन सांस्कृतिक वैभव जन्माला येते! भीमा आणि सीना गेली हजारो वर्षे हेच करत आहेत. आणि त्यांच्या काठावरची ही मंदिरे गेली हजार वर्षे त्याचीच साक्ष देत उभी आहेत.
 
लेखक - इंद्रनील बंकापुरे




संबंधित मजकूर