पाकिस्तानात अल्पसंख्याक, विशेषतः हिंदू समुदाय आणि त्यांच्या धार्मिक प्रतीकांवर होणारे अत्याचार ही काही आता नवीन गोष्ट उरलेली नाही. नुकताच पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात असलेल्या सिराज गावातील सुमारे १०० ते १२५ वर्षे जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिराचा झालेला विध्वंस हा तिथल्या प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कट्टरतावाद्यांच्या वाढत्या दहशतीचा जिवंत पुरावा आहे. ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (टीएलपी)सारख्या कट्टरपंथी संघटनेशी संबंधित तत्त्वांनी हे ऐतिहासिक मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्याच्या जमिनीवर कब्जा करून ती जवळच्या मदरशाला जोडण्याचा प्रयत्न केला, असा स्थानिकांचा दावा. हे कृत्य केवळ एका इमारतीवर झालेला हल्ला नसून, तो पाकिस्तानात उरलेल्या अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आणि अस्तित्वावर झालेला थेट आघात आहे.
पाकिस्तानातील हिंदूंची घरे, त्यांचे व्यवसाय आणि त्यांची मंदिरे सुरक्षित उरलेली नाहीत. या घटनेत मंदिराची तोडफोड केल्यानंतर त्याचा ढिगारा, विटा आणि शिखरावरील मौल्यवान धातूही पळवून नेण्यात आला. यातून तिथल्या कट्टरपंथीयांची लुटारू आणि असहिष्णू मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. जेव्हा जेव्हा अल्पसंख्याकांच्या धार्मिकस्थळांवर हल्ले होतात, तेव्हा पाकिस्तानी प्रशासन गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याऐवजी सत्य लपवण्याचा प्रयत्न करते. नारोवालच्या घटनेतही सरकारने ‘पावसामुळे इमारत कोसळली’ असा नेहमीचा व बनावट दावा ठोकून देऊन स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. जर इमारत पावसामुळे कोसळली होती, तर तिथला मलबा आणि धातू रातोरात कुणी आणि का गायब केला?
२००६च्या दरम्यान लाहोरमध्ये हिंदू मंदिराची जागा व्यावसायिक इमारतीसाठी नष्ट केल्याची नोंद आहे. २०१४ मध्ये लारकाना (सिंध) येथे हिंदू मंदिर आणि धर्मशाळेवर कट्टरपंथीयांच्या जमावाने हल्ला केला. २०१९ मध्ये घोटकी (सिंध) येथे ईशनिंदा आरोपानंतर जमावाने हिंदू मंदिरांची तोडफोड केली; हिंदूंची घरे आणि दुकानेही लक्ष्य करण्यात आली. पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्रालयाच्या तपासात दंगल पूर्वनियोजित असल्याचे नमूद झाले होते. २०२० मध्ये कट्टरपंथी जमावाने एका मंदिराची तोडफोड करून मूर्ती आणि धार्मिक ग्रंथांची विटंबना केल्याची घटना थारपारकर (सिंध) येथे घडली होती, तर याच वर्षी खैबर पख्तूनख्वा येथील परमहंसजी महाराज यांचे ऐतिहासिक मंदिर जाळून पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. करक येथील २०२०चा प्रकार विशेष महत्त्वाचा आहे. मंदिरावर मोठ्या जमावाने हल्ला करून ते पेटवून दिले आणि उद्ध्वस्त केले. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर अटक झाली आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे आदेश दिले होते.
सिंध प्रांतातील कराची, रहीम यार खान आणि बादिन या भागांत वेळोवेळी हिंदू मंदिरांची तोडफोड, मूर्तींची विटंबना आणि मालमत्तेवर कब्जा करण्याचे प्रकार घडले आहेत. केवळ हिंदूच नाही, तर ‘ननकाना साहिब’सारख्या पवित्र शीख गुरुद्वारांवर दगडफेक करणे असो किंवा ख्रिश्चन वस्त्यांवर आणि चर्चवर हल्ले करून ते जाळणे असो, पाकिस्तानात अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याची एक ठरवून दिलेली पद्धत बनली आहे.
अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आणि मानवाधिकार संरक्षणाचा डोलारा पाकिस्तानात केव्हाच कोलमडून पडला आहे. ‘पावसामुळे इमारत कोसळली’ असल्या बालिश व बनावट सबबी सांगून तिथले लाचार प्रशासन स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालू शकत नाही. ऐतिहासिक मंदिरांचा विध्वंस करून, जमिनी हडपून आणि पवित्र स्थळांची लूट करून पाकिस्तानने स्वतःची असहिष्णू आणि लुटारू मानसिकता जगासमोर पुन्हा एकदा उघडी पाडली आहे. सभ्य लोकशाहीचा बुरखा पांघरून आंतरराष्ट्रीय मंचांवर गळा काढणार्या पाकिस्तानचा खरा चेहरा म्हणजे, अल्पसंख्याकांसाठी बनलेला हा नरकच. जर तिथली सरकारे आणि संस्था कट्टरपंथीयांपुढे असेच गुडघे टेकणार असतील आणि गुन्हेगारांना मोकाट सोडणार असतील; तर पाकिस्तान हे एक कायद्याचे राज्य नसून, धार्मिक उन्मादाच्या आणि रानटी मानसिकतेच्या दावणीला बांधलेला एक लाचार देश आहे, हेच जगाने आता मान्य करायला हवे!