
मुंबई - (Hruta Durgule sarang sathaye)लहानपणी ‘कधी एकदा मोठे होतो’ असं वाटणं स्वाभाविकच आहे! मात्र एखाद्या चिमुकलीने आपली ही इच्छा चक्क गणपती बाप्पाकडे व्यक्त केली आणि ती इच्छा पूर्णही झाली तर? अशीच एक गोड, मजेशीर आणि रंजक कल्पना घेऊन ‘आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमधून समोर आलेल्या या अनोख्या प्रसंगामुळे चित्रपटाच्या पुढच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
‘मला मोठं व्हायचंय’, अशी इच्छा मनात असलेली एक चिमुकली गणपती बाप्पासमोर आपली इच्छा व्यक्त करते. आपण मोठं झाल्यावर आपल्याला हवं ते करता येईल, अशी तिची निरागस समजूत असते. त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी ती बाप्पाकडे गोड साकडं घालते. सोबतच हृता दुर्गुळेही मनमुराद आयुष्य जगताना दिसत आहे. त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे, याची उत्सुकता वाढते. खरंच या चिमुकलीची इच्छा पूर्ण झाली आहे का? बाप्पाच्या या चमत्कारानंतर तिच्या आयुष्यात नेमकं काय घडणार? हे प्रश्न टीझर पाहिल्यानंतर नक्कीच पडतात. टीझरमध्ये हृता दुर्गुळेसोबत सारंग साठ्येही दिसत आहे. या दोघांची नेमकी भूमिका काय असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या दोघांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून एक हलकीफुलकी, मनोरंजक आणि वेगळी गोष्ट पाहायला मिळणार असल्याचे टीझरमधून जाणवते.( Hruta Durgule sarang sathaye)
लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची कल्पना ही अगदी साध्या आणि निरागस इच्छेतून पुढे जाते. लहानपणी मोठं व्हावंसं वाटतं आणि एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून देवाकडे मागणं मागतो, या भावनेत एक वेगळीच गंमत आहे. त्यातून पुढे काय घडतं आणि त्या इच्छेचे काय परिणाम होतात, हे या चित्रपटातून मनोरंजक पद्धतीने मांडलं आहे.''( Hruta Durgule sarang sathaye)
निर्मात्या ईशा मुठे आणि श्रुती साठे यांच्या म्हणतात, “‘आली मोठी शहाणी’ची गोष्ट ऐकतानाच तिच्यातला गोडवा आणि गंमत आम्हाला भावली. एका छोट्या मुलीची इच्छा जर खरंच पूर्ण झाली तर त्यानंतर काय काय घडू शकते, ही कल्पनाच खूप मजेशीर आहे. टीझरमध्ये आम्ही कथेचा एक छोटासा भाग दाखवला आहे. हृता - सारंगच्या व्यक्तिरेखांमधून ही गोष्ट आणखी रंगतदार होते. या कथेत पुढे काय होतं, हे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर ठरेल.”( Hruta Durgule sarang sathaye)
फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क प्रस्तुत ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
( Hruta Durgule sarang sathaye)