मुंबई (UWA Mumbai Campus): मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (UWA Mumbai Campus)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूडब्ल्यूए इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन झाले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. (UWA Mumbai Campus)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील म्हणाले की, "यूडब्ल्यूएसारख्या ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठाने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘ग्रुप ऑफ एट’मधील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा निर्णय आजच्या मुंबईची क्षमता आणि जागतिक स्तरावरील तिच्या वाढत्या महत्वाची साक्ष देणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी पुढील पिढीसाठी ती जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी मुंबईलगत विकसित होत असलेल्या ‘मुंबई 3.0’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इकोसिस्टम तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात आहेत." (UWA Mumbai Campus)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल
"राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यास नवे दालन खुले झाले आहे. पूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागत होते. आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत असून त्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यूडब्ल्यूए, मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक वातावरणाबरोबरच देशातील प्रमुख वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान उद्योग, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांच्या परिसंस्थेशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि शैक्षणिक सहकार्य वाढावे," अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. (UWA Mumbai Campus)
"वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट क्षमता आणि महाराष्ट्राकडे व्यापक प्रमाणात प्रतिभा व संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील ज्ञानाधिष्ठित भागीदारी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा एक मजबूत स्तंभ ठरू शकते. यूडब्ल्यूए हे महाराष्ट्राच्या भविष्यदृष्टीतील विकासप्रवासाचे भागीदार बनले असून या भागीदारीच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल," अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (UWA Mumbai Campus)