
मुंबई - Prapti Redkar Zee Marathi Konkanगणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि प्रत्येकाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. बाप्पाला घराची आरास, मोदकांचा गोडवा, आरती-भजनांचा आनंद आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले क्षण यामुळे हा सण प्रत्येकासाठी खास असतो. प्रत्येक घरात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली, तरी बाप्पाशी जोडलेली भावना मात्र तितकीच जिव्हाळ्याची असते. झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली’मधील सावली अर्थात प्राप्ती रेडकरने पण गणेशोत्सवाच्या परंपरा, बाप्पाशी जोडलेल्या आठवणी आणि या सणाविषयीच्या भावना सांगितल्या आहेत.
कोकणातील मालवणच्या वैंगणी गावाशी जोडलेल्या प्राप्ती रेडकरसाठी गणेशोत्सव म्हणजे कुटुंबासोबतचा आनंद, भजनाची मैफल आणि गावच्या परंपरांचा अनुभव. बाप्पाच्या पूजेपासून मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनापर्यंतच्या तिच्या आठवणी तिने सांगितल्या. प्राप्ती म्हणाली, “मी कोकणातली आहे. माझं गाव मालवणमधलं वैंगणी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवासाठी मी गावी जाणार आहे. आमच्याकडे ११ दिवसांचा गणेशोत्सव असतो. मला सगळे दिवस गावी राहणं शक्य होत नाही, त्यामुळे मी गणेशोत्सवासाठी साधारण ५-६ दिवस गावी असते. यावर्षी मी आमच्या बाप्पासाठी ‘रेडकरांचा बाप्पा’ अशी नेमप्लेट बनवायला दिली आहे. ती बाप्पासाठी माझ्याकडून खास असेल. गावी गणपतीला खूप मजा असते. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र भजन करतो. माझे काका सचिन रेडकर भजनी बुवा असल्यामुळे आमच्याकडे भरपूर धमाल असते. माझे बाबा सुद्धा गायक आहेत. त्यामुळे सगळं कुटुंब, भावंडं मिळून भजनाचं भन्नाट जॅमिंग करतो. गणेशोत्सव म्हटलं की माझ्या मनात सुंदर बाप्पा आणि गोड गोड मोदक येतात. गावी गणपतीला गेल्यावर आमच्याकडे एक पद्धत आहे. आंघोळ झाल्यानंतर बाप्पासाठी अंगणातून किंवा रानातून ताज्या दुर्वा आणायच्या असतात. आम्ही त्याला ‘परडा’ म्हणतो. त्यात दुर्वांसोबत शमीची पानंही आणतो. त्यानंतर बाप्पाच्या पूजेची तयारी करतो. आरती करणं मला खूप आवडतं. मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठीही मी आतुर असते, असं प्राप्ती म्हणाली.Prapti Redkar Zee Marathi Konkan
प्राप्तीने पुढे सांगितले कि, गावावरून आल्यावर सगळ्यात आधी डोंगरीचा राजा आणि उमरखाडीचा राजा यांचं दर्शन घेते. त्यानंतर चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, परळचा राजा आणि अजून बऱ्याच मोठ्या गणपतींचं दर्शन घेणार आहे. बाप्पाच्या दर्शनाने मला खूप सकारात्मक वाटतं. बाप्पा नेहमीच आपल्या सगळ्यांना कठीण प्रसंगातून बाहेर काढतो, कारण तो विघ्नहर्ता आहे. माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात आणि सगळ्यांच्याच आयुष्यात आलेल्या संकटांतून बाप्पाने बाहेर काढलं आहे, असं मी मानते. बाप्पा माझ्या आयुष्यात खूपच स्पेशल आहे. एवढं की ते शब्दांत सांगणं कठीण असल्याचं प्राप्ती म्हणाली.Prapti Redkar Zee Marathi Konkan