मुंबई - Parshuram Rohit Zee Marathi Dagdusheth Ganpati गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि प्रत्येकाच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. बाप्पाला घराची आरास, मोदकांचा गोडवा, आरती-भजनांचा आनंद आणि कुटुंबीयांसोबत घालवलेले क्षण यामुळे हा सण प्रत्येकासाठी खास असतो. प्रत्येक घरात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगळी असली, तरी बाप्पाशी जोडलेली भावना मात्र तितकीच जिव्हाळ्याची असते. झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेतील शंकर अर्थात रोहित परशुराम यानेही गणेशोत्सवाच्या परंपरा, बाप्पाशी जोडलेल्या आठवणी आणि या सणाविषयीच्या भावना सांगितल्या आहेत.
रोहित परशुराम यांच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या तीन वर्षांच्या मुलगी रुईमुळे आणखी खास आहे. रोहित म्हणाला, बाप्पाच्या आगमनाची तयारी रुईने स्वतःहून सुरू केली असून, बाप्पाशी तिची ओळख होऊ लागल्याचा आनंद रोहितने व्यक्त केला. त्याचबरोबर दगडूशेठ गणपतीशी जोडलेला एक खास अनुभवही त्याने सांगितला. “माझी मुलगी रुई आता तीन वर्षांची झाली आहे आणि तिला सगळं कळायला लागलंय. त्यामुळे यावर्षी तिने घरी एका कार्डबोर्डवर क्ले, फुलं आणि वेगवेगळ्या गोष्टी चिकटवून बाप्पाचं डेकोरेशन १५ दिवस आधीच तयार केलं आहे. बाप्पा येणार आहेत आणि त्यांच्यासमोर मला डेकोरेशन ठेवायचं आहे, हे तिनेच ठरवलंय. यावर्षीपासून तिला बाप्पा कळायला लागले आहेत, त्यामुळे हे आमच्यासाठी खूप खास आहे. काही महिन्यांपूर्वी माझे सख्खे काका वारले. त्यामुळे यावेळी बाप्पाचा उत्सव फार मोठा नसेल, पण छान आणि मनापासून साजरा करणार आहे. आमचा गणपती वर्षानुवर्षे भोरला येतो. तिथे माझे आई-वडील असतात. मी, माझं कुटुंब आणि माझ्या दादाचं कुटुंब असे सगळे मिळून तिथे गणेशोत्सव साजरा करतो.Parshuram Rohit Zee Marathi Dagdusheth Ganpati
दगडूशेठ गणपती आणि माझं खूप खास नातं आहे, असं मी म्हणेन; कारण मला त्याचा तसा अनुभवही आला आहे. २०१९ च्या मार्चमध्ये मी पुण्यातली माझी जिम बंद करून पूर्ण लक्ष अभिनयाकडे द्यायचं ठरवलं. त्यावेळी मला जिमची जागा एका आठवड्यात रिकामी करून द्यायची होती. जिममध्ये जवळपास ५-६ लाख रुपयांचं साहित्य होतं. ते मला विकून टाकायचं होतं, कारण ते तिथून काढून दुसरीकडे ठेवणं शक्य नव्हतं. भोरला पाठवायचं म्हटलं असतं, तरी खूप खर्च झाला असता. मी त्यासाठी जाहिरातही टाकली होती आणि माझं ॲग्रीमेंटही संपलेलं होतं. जागेच्या मालकाशी माझं चांगलं नातं होतं, तेही मला सांभाळायचं होतं. सगळं एकदम अडचणीचं झालं होतं. त्या वेळी मला मुंबईला शिफ्ट व्हायचं होतं आणि अभिनय क्षेत्रासाठी ते मी आधीच ठरवलं होतं. मला काहीच मार्ग सुचत नव्हता. पुण्यात असताना मी दर मंगळवारी किंवा जमेल तसं चतुर्थीला पूजा आणि मी दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला जायचो. त्यावेळी पूजाने मला सुचवलं की, ‘एकदा फक्त बाप्पाला सांगून बघ. फक्त दर्शन घेऊन ये.’ मी तिचं ऐकलं. दर्शन घेतलं आणि चौकात बसलो. बाप्पाकडे बघताना अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी बाप्पाकडे एकच गोष्ट मागितली, ‘मला यातून बाहेर काढ.’ त्यानंतर चक्क चौथ्या दिवशी माझं जिमचं सगळं साहित्य विकलं गेलं. त्या तीन-चार दिवसांत जणू चमत्कारच झाला, असं मी म्हणेन. माझ्याच जिमचा एक विद्यार्थी होता. तो सासवडला जिम सुरू करणार होता आणि त्यानेच माझ्याकडून सगळं साहित्य विकत घेतलं. त्यानंतरच्या मंगळवारी मी पुन्हा बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाचे खूप खूप आभार मानले, अशी आठवण रोहितने यावेळी सांगितली.Parshuram Rohit Zee Marathi Dagdusheth Ganpati