आईच्या हातच्या मोदकांची आजही आठवण येते - नवीन प्रभाकर

    19-Sep-2026
 
navin
 
 
 
 
मुंबई - Navin Prabhakar Modak Ganpati Bappa गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या मनात बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. अभिनेता आणि विनोदी कलाकार नवीन प्रभाकर यांच्यासाठी गणपती बाप्पा म्हणजे केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर घर, कुटुंब, बालपण आणि कलेच्या प्रवासाशी जोडलेली एक भावनिक आठवण आहे.
 
आईसोबत मोदक बनवणे, घरच्या गणपतीची सजावट करणे आणि कुटुंबातील सगळ्यांनी मिळून गणेशोत्सव साजरा करणे, या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. त्यांच्या काकांच्या घरात वर्षानुवर्षे गणपती विराजमान होतोय. लहानपणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्या घरी येणं, थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होणं आणि घरातला उत्साह अनुभवणं हा त्यांच्या बालपणाचा खास भाग होता.पुढे कुटुंब गोरेगावला शिफ्ट झाल्यानंतर मूळ घरी येणं कमी झालं. मात्र घरचा गणपती आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणींचं नातं आजही तितकंच घट्ट आहे.Navin Prabhakar Modak Ganpati Bappa
 
नवीन आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना म्हणले कि, मी आईसोबत मोदक बनवायचो. घरच्या गणपतीची तयारी आणि सजावट सगळे मिळून करायचो. त्या दिवसांचा उत्साहच वेगळा होता. याच काळात नाक्यावरचा गणपतीही त्यांच्या बालपणातील एक खास आकर्षण होता. नाक्यावरच्या गणपतीच्या उत्सवात विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. ऑर्केस्ट्रा, रेकॉर्ड डान्स, पार्टी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमधून लहान वयातच त्यांना कलेच्या विविध पैलूंची ओळख झाली.Navin Prabhakar Modak Ganpati Bappa
 
अगदी शिकण्याच्या वयात या सगळ्या कार्यक्रमांमधून बरंच काही अंगवळणी पडत गेलं, शिकत गेलो. मला वाटतं, त्यामुळेच लहानपणापासून कलेचे आणि कलागुणांचे संस्कार झाले. गणपती बाप्पामुळे नकलांच्या कलेचेही संस्कार माझ्यावर झाल्याचं नवीन प्रभाकरांनी सांगितलं. त्यांच्या कलेच्या प्रवासात गणपती बाप्पाचं स्थान त्यामुळेच विशेष आहे. “बाप्पा इकडचा काय आणि गोरेगावचा काय. कलेची, बुद्धीची ती शक्ती आणि प्रवाही चेतना तुमच्या बुद्धीशी जिथे जाल तिथे बाप्पाच्या दर्शनामुळे कनेक्ट होत असते, असं मला वाटतं,” अशी त्यांची भावना आहे. आज आयुष्य पुढे गेलं, ठिकाणं बदलली, कामाचा व्याप वाढला, तरी बाप्पासमोर हात जोडताना बालपणीच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. घरचा गणपती, आईच्या हातचे मोदक, कुटुंबासोबतची गणेशोत्सवाची तयारी आणि नाक्यावरच्या कार्यक्रमांतून मिळालेले कलेचे संस्कार हा त्यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणींचा सुंदर ठेवा आहे. यंदाही लाडक्या बाप्पाच्या चरणी नवीन प्रभाकर यांची एकच प्रार्थना आहे कि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान आणि आनंद असू दे. हा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात कायम राहू दे आणि तो कधीच संपू नये.
Navin Prabhakar Modak Ganpati Bappa




संबंधित मजकूर