यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. परंतु, त्यावरुन या पुरस्कारांचे वितरण दिल्लीऐवजी गुजरातमध्ये का, असा नवा वाद महाराष्ट्रात मुद्दाम निर्माण करुन विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदा दिल्लीच्या बाहेर नेला जात आहे, अशी दिशाभूल करणारी खोटी माहितीसुद्धा प्रस्तुत केली गेली. परंतु, वास्तविक पाहता, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यापूर्वी १९७१ साली तामिळनाडूत चेन्नईमध्ये संपन्न झाला होता. परंतु, ‘नाराज फुफा’ प्रवृत्तीचे राजकीय पक्ष आणि नेते सत्य न स्वीकारता निव्वळ खोटा कांगावा करीत आहेत. त्याचीच पोलखोल करणारा हा लेख...
आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही चांगले काम केले किंवा काहीही केले, तरी देशातील ‘नाराज फुफा’ प्रवृत्तीचे विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका-टिप्पणी करतात किंवा प्रश्न उपस्थित करण्यातच धन्यता मानतात. वास्तविक पाहता, सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते; परंतु विरोधी पक्ष सरकारवर अंकुश ठेवण्याऐवजी केवळ टिंगलटवाळी, टीका-टिप्पणी करण्याचे किंवा धादांत खोटे आणि दिशाभूल करण्याचेच काम प्रामुख्याने करीत आहेत. नुकतीच केंद्र सरकारने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याची घोषणा केली असून, दि. २२ सप्टेंबर रोजी ७२वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीच्या ‘विज्ञान भवन’ऐवजी गुजरात येथील केवडिया-एकता नगर, जि. नर्मदा येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये होणार आहे, असे जाहीर होताच, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बुडाला आग लागल्याचे चित्र निर्माण झाले असून, त्यांनी फालतू आणि निरर्थक मुद्दे उपस्थित करणारी बडबड सुरू केली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे संपूर्ण देशाची संपत्ती आणि राष्ट्रीय अभियान एकाच राज्याकडे, म्हणजे गुजरातकडे घेऊन जात आहेत. पंतप्रधान स्वतःला देशाचे की फक्त गुजरातचे पंतप्रधान समजतात का,’ अशी आगपाखड संजय राऊतांनी केली. यापूर्वीसुद्धा या ‘नाराज फुफा’ प्रवृत्तीच्या नेत्यांनी ‘बुलेट ट्रेन ते परदेशी पाहुणे गुजरातमध्ये का,’ अशी बाष्कळ टीका-टिप्पणी केली होतीच. वास्तविक पाहता, भारतीय संविधानानुसार भारत म्हणजे राज्याचा संघ आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रम गुजरातमध्ये होत असेल, तर आक्षेप घेण्याचे मुळी कारणच नाही. कारण, गुजरात काय हिंदुस्थानच्या बाहेर अमेरिकेत किंवा स्वतंत्र निजामाचे संस्थान आहे का, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिकांत चर्चिला जात आहे.
चेन्नईमध्येही संपन्न झाला होता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा
भारतीय चित्रपटसृष्टीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदा दिल्लीबाहेर होत आहे, असा धादांत खोटा दावा विरोधकांकडून प्रस्तुत केला जात असून, पूर्वीप्रमाणे खोटेनाटे कथानक केले जात आहे. परंतु, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा मागोवा घेतल्यास, हा सोहळा पहिल्यांदा दिल्लीबाहेर होत नसून, यापूर्वी हा सोहळा चेन्नई येथे झालेला आहे. त्यामुळे चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदा दिल्लीच्या बाहेर होणार, हा विरोधकांचा दावाच धादांत खोटा आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचा मानला जाणारा ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा वर्ष १९७० आणि १९७१ मध्ये अनुक्रमे १७वा आणि १८वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मद्रास, म्हणजे आताचे चेन्नई येथे संपन्न झाला होता. दि २१ नोव्हेंबर १९७० रोजी १७वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मद्रास येथील ‘युनिव्हर्सिटी सेंटेनरी ऑडिटोरियम’मध्ये आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या काळात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात दिल्लीच्या ‘विज्ञान भवन’मधील परंपरा मोडून तो सोहळा तामिळनाडू राज्यातील चेन्नईमध्ये नेण्याची ती पहिलीच ऐतिहासिक घटना होती. त्यामुळे आता विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने जी बोंबाबोंब करीत आहेत, ती बोंबाबोंब किती मोठे असत्य कथानक किंवा कांगावा आहे, हे सहज लक्षात येते.
केवडिया म्हणजे एकता नगरची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी निवड का?
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दि. २२ सप्टेंबर रोजी गुजरात येथील केवडिया अर्थात आताचे एकता नगर जि. नर्मदा येथे संपन्न होणार असून, सोहळ्याला देश-विदेशांतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमध्येच का, हा जो संकुचित प्रश्न उपस्थित केला जात आहे, त्याचे उत्तर असे आहे की, गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर हे शहर जागतिक स्तरावर सरदार सरोवर धरण आणि नंतर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे प्रसिद्ध आहे. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने देश-विदेशांतील कलाकार एकता नगरमध्ये येणार आहेत. कलाकारांना एकता नगरमध्ये राष्ट्रीय एकता आणि एकतेचे दर्शन व्हावे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे दर्शन व्हावे, म्हणून चित्रपट सोहळा गुजरातमधील केवडिया येथे होत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
केवडिया अमेरिकेत आहे का?
गुजरातमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम असून, राष्ट्रपती महोदया सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. परंतु, सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय पक्षाकडून प्रचंड टीका-टिप्पणी होत आहे. आदित्य ठाकरे यांनी तर ‘केंद्रातील सरकार फक्त गुजरातचे केंद्र सरकार आहे का,’ असा सवाल उपस्थित करून ‘आता फक्त राष्ट्रपती भवन गुजरातला नेणे बाकी आहे,’ अशी जहरी टीका केली. तसेच, खासदार सुप्रिया सुळेंपासून खासदार संजय राऊत यांनीसुद्धा तुफान आगपाखड केली. गुजरातमध्ये होत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होत असलेली टीका-टिप्पणी कितपत योग्य आहे? गुजरात हिंदुस्थानच्या बाहेर अमेरिकेत किंवा स्वतंत्र निजामाचे संस्थान आहे का, असा संतप्त सवाल सामान्य माणूस व्यक्त करीत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा जगात दबदबा आणि विश्वास वाढत असताना ‘नाराज फुफां’ची बाष्कळ गरळ बंद व्हावी, हीच अपेक्षा!
- अशोक राणे
९४२३६५८३८५