मुंबई (Sangh Anubhavshala) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम आणि संपर्क-संवादाच्या माध्यमातून संघाच्या शंभर वर्षांच्या तपःयात्रेशी समाजातील मोठा वर्ग परिचित झाला आहे. याच भावनेतून इंदूर येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या सुदर्शन भवनात ‘संघ अनुभवशाळा’ उभारण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते १८ सप्टेंबर रोजी संघ अनुभवशाळेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी समाजातील प्रबुद्ध नागरिक तसेच स्वयंसेवक उपस्थित होते. सरसंघचालकांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर प्रदर्शनाची पाहणी केली. लोकार्पण कार्यक्रमात ‘संघ अनुभवशाळे’च्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.(Sangh Anubhavshala)
उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले की, ‘अनुभवशाळा’ हे नाव या उपक्रमाला पूर्णतः सार्थ ठरते. संघाला कोणतेही प्रदर्शन करायचे नाही. संघ ही एक वैशिष्ट्यपूर्ण संघटना असून तिच्यासारखी दुसरी संघटना नाही. त्यामुळे संघाला जाणून घेण्यासाठी ‘अनुभवशाळा’ हा एक अभिनव प्रयोग आहे. जगाच्या इतिहासात आणि अलीकडच्या काळातही संघासारखी संघटना किंवा अशा प्रकारचे कार्य आढळत नाही.(Sangh Anubhavshala)
पुढे ते म्हणाले, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता संघामध्ये आहे, मात्र संघातील काही मूलभूत बाबी अपरिवर्तनीय आहेत. हे जाणून घेण्यासाठीही अनुभवाची आवश्यकता आहे. संघाचा अनुभव त्याच्या एखाद्या कार्यक्रमात तीन-चार दिवस एकत्र राहून घेता येतो. संघाला जाणून घेण्यास आणि समजून घेण्यासारखे बरेच काही आहे, हे अनुभवशाळेतून जाणवते असे डॉ. भागवत यांनी सांगितले.(Sangh Anubhavshala)
ते म्हणाले की, संघाला समजून घेण्यासाठी कार्यालयात येणाऱ्यांना तेथील कार्याचे वातावरण प्रत्यक्ष अनुभवता येते. त्याचप्रमाणे ‘गागर में सागर’प्रमाणे संघाची शताब्दी यात्रा आणि कार्याचा व्यापक पट उलगडून दाखविणारी ही अनुभवशाळा आहे. संघाचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याचे कार्य ती करते.(Sangh Anubhavshala)
मोहित जैन यांनी सांगितले की, ‘एक विचार, एक यात्रा — राष्ट्र प्रथम’ या भावनेवर आधारित ही अनुभवशाळा संघाची शंभर वर्षांची यात्रा, संघाचा विचार, कार्यपद्धती आणि समाजजीवनातील योगदान हे सर्व सोप्या व रंजक पद्धतीने मांडते. अनुभवशाळेत येणाऱ्या अभ्यागतांना , ‘संघ काय आहे?’, ‘संघाची स्थापना का झाली?’ आणि ‘संघाचे कार्य कसे चालते?’ या तीन मूलभूत प्रश्नांची उत्तरे विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून मिळतात. भारताच्या प्राचीन सभ्यता आणि ज्ञानपरंपरेपासून सुरू होणारा या प्रदर्शनाचा प्रवास संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा परिचय करून देत संघाच्या शताब्दी यात्रेपर्यंत येऊन पोहोचतो असेही मोहित जैन यांनी नमूद केले.(Sangh Anubhavshala)
सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्य या ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेतील पाच आयामांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंधही या माध्यमातून समजावून सांगण्यात आला आहे असे ते म्हणाले.(Sangh Anubhavshala)
नव्या पिढीला भारताच्या संस्कृतीची ओळख करून देणे, सेवा व सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणे आणि ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी प्रेरणा देणे, हा संघ अनुभवशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे मोहित जैन यांनी सांगितले.(Sangh Anubhavshala)
कार्यक्रमाचे संचालन डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे उमेश वर्मा यांनी केले, तर समितीचे सचिव राकेश यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिक आणि स्वयंसेवकांनी प्रदर्शनाला भेट दिली. उच्च तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्कृष्ट कलात्मक मांडणी हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ गॅलरी, छायाचित्रे आणि लेखांच्या माध्यमातून संघाच्या स्थापनेची पार्श्वभूमी, शंभर वर्षांचा क्रमिक विस्तार आणि विविध क्षेत्रांतील समाजकार्याची वाटचाल याचा प्रत्यक्ष अनुभव या प्रदर्शनातून घेता येतो.(Sangh Anubhavshala)
हे प्रदर्शन २७ सप्टेंबरपासून दररोज सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहील. प्रदर्शनस्थळी अभ्यागतांना संघाचे साहित्य तसेच भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.(Sangh Anubhavshala)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक