बचतीतून स्वावलंबनाची वाट...

    19-Sep-2026   
 
Mangala Naikawadi Women Empowerment
 
तळागाळातील महिलांना आर्थिक आधार मिळावा, बचतीची सवय लागावी, गरजेच्या वेळी कर्ज मिळावे आणि स्वकौशल्यातून उत्पन्नाचा मार्ग उभा करता यावा, यासाठी कार्यरत मंगला शिवाजी नायकवडी यांच्याविषयी...
 
महिलांसाठी काम करताना त्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घेणे महत्त्वाचे असते. घरखर्च, मुलांचे शिक्षण किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अशा विविध कारणांसाठी महिलांना आर्थिक आधाराची गरज भासते. मंगला नायकवडी यांच्या कार्याची दिशा याच अनुभवातून ठरली. ‘कुर्ला महिला विकास संस्थे’च्या माध्यमातून सुरू असलेले त्यांचे काम कुर्ल्यापुरते मर्यादित न राहता, विविध भागांतील महिलांशी जोडले गेले आहे. गेल्या १९ वर्षांपासून महिलांची आर्थिक बचत जमा करणे, कर्जाची गरज असलेल्या महिलांशी चर्चा करणे, सुलभ पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्याची परतफेड करून घेणे, या कामात त्यांनी राखलेले सातत्य कौतुकास्पद आहे.
 
बचतगटातील एखाद्या महिलेला घरखर्चासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी पैशांची गरज भासली, तर उपलब्ध बचतीच्या आधारावर तिला कर्ज मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळी बाहेरून कर्ज शोधण्याची वेळ येत नाही. कर्जवसुलीच्या वेळीही परिस्थिती समजून घेऊन संवाद साधावा लागतो. काही महिलांना आर्थिक अडचणी असतात, तर काहींच्या घरात वेगळे प्रश्न असतात. अशा वेळी बचतगटाची शिस्त आणि महिलांशी असलेले संबंध दोन्ही सांभाळण्याचे काम त्यांनी केले. महिन्याच्या दहाव्या तारखेची बैठक चुकू नये, याची त्या काळजी घेतात. अडचण असल्यास बैठक पुढे-मागे होऊ शकते; मात्र ती झालीच पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे महिलांना गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येते.
आर्थिक मदतीबरोबर महिलांना कौशल्य शिकता यावे, यासाठी विविध प्रशिक्षणवर्ग विनामूल्य आयोजित करण्यात आले. डिटर्जंट पावडर, कागदी पिशव्या, टूथपेस्ट व दंतमंजन, चॉकलेट बनविणे अशा प्रशिक्षणांसह ‘एमआयटीकॉन’च्या माध्यमातून एक महिन्याचा विनामूल्य बेकरी अभ्यासक्रमही आयोजित करण्यात आला. प्रशिक्षण घेऊन पुढे काही करता यावे, असा विश्वास निर्माण करणे हा त्यामागचा प्रयत्न असतो. एखाद्या महिलेला चॉकलेट बनवता येत असले, तरी त्याची विक्री कुठे करायची याची माहिती नसेल, तर प्रशिक्षण अपुरे ठरते. बेकरीचे काम शिकलेल्या महिलेलाही भांडवल, ग्राहक आणि बाजारपेठेची गरज असते. त्यामुळे महिलांच्या कौशल्याला पुढील संधी कशी मिळेल, यावरही त्यांचा भर असतो. काही महिलांनी घरातून काम करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी छोट्या व्यवसायासाठी बचत आणि कर्जाचा आधार घेतला. बचतगटाच्या माध्यमातून ‘आवर्त ठेव’ यांसारख्या योजनांची माहितीही महिलांना देण्यात आली. नियमित बचत ही पुढील आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे, असा त्यांचा अनुभव आहे.
 
महिलांसाठी काम करताना प्रश्न नेहमी पैशांचाच असेलच, असे नाही. घरातील अडचणी, व्यवसायाची इच्छा, मुलांच्या शिक्षणाची चिंता किंवा स्वतःच्या कौशल्याला संधी मिळत नसल्याची खंत घेऊनही महिला मंगलाताईंकडे येतात. "ताई, काहीतरी मार्ग काढा,” असं विश्वासाने बोलतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देता येतेच असे नाही; पण प्रश्न ऐकून घेणे, योग्य व्यक्तीशी संपर्क करून देणे किंवा उपलब्ध पर्याय समजावून सांगणे, हे काम त्या करत राहतात. अनेक वर्षांच्या संपर्कातून तयार झालेला हा विश्वास त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
 
मंगला नायकवडी यांच्या कामाची आणखी एक ओळख म्हणजे, त्यांचा शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभार. बचतगट असो किंवा सहकार क्षेत्रातील काम, व्यवहारात स्पष्टता ठेवण्यावर त्यांचा भर राहिला आहे. त्यांच्या सामाजिक आणि संवेदनशील भूमिकेची जाणीव असलेल्या अनेकांना त्या आपल्या घरातील एक सदस्य असल्यासारख्या वाटतात. याच विश्वासातून विविध सहकार, सामाजिक आणि राजकीय संस्थांमध्ये त्या मुख्य सल्लागार, तसेच निमंत्रित सदस्य म्हणून सक्रिय आहेत. सर्व समाजातील महिलांना आणि तळागाळांतील विविध घटकांना व्यासपीठ मिळवून देताना त्यांचा सहभाग औपचारिक राहत नाही. महिलांच्या प्रश्नांशी जोडून घेत त्यांना पुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
 
सामाजिक कार्यासोबतच हिंदुत्ववादी उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे. विविध हिंदू सण-उत्सवांमध्ये सहभागी होताना त्यांच्यासोबत काम करणार्‍या महिलांनाही त्या जोडून घेतात. उत्सवांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणणे, समाजप्रबोधनाच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे आणि सामाजिक विषयांवर संवाद साधणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे.
 
राजमाता जिजाऊ भोसले यांना आदर्श मानणार्‍या मंगला नायकवडी यांच्या सामाजिक कार्यामागे पती शिवाजी नायकवडी आणि मुलगा अमित नायकवडी यांची प्रेरणा व साथ आहे. महिलांसोबतच्या सातत्यपूर्ण कामातून मिळालेला अनुभव आणि कुटुंबाच्या सहकार्याचा समतोल साधत त्यांची कार्यवाटचाल सुरू आहे. पुढील काळात महिलांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या महिलांना मार्गदर्शन, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि नव्या महिलांना संधी मिळावी, यासाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
 
मंगला नायकवडी यांच्या कार्यातून अनेक महिलांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची संधी मिळाली आहे. आपल्या अनुभवातून इतर महिलांनीही प्रेरणा घेऊन समाजकार्यात सक्रिय व्हावे, महिलांनी आपली कुवत ओळखून पुढे यावे आणि उपलब्ध संधींचा उपयोग करून स्वतःची वाट निर्माण करावी, अशी त्यांची इच्छा आहे. ही कार्यशील वाटचाल पुढेही सुरू राहावी, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मंगला शिवाजी नायकवडी यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
९९६७०२०३६४




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर