‘एआय’ची ‘चिप’क्रांती

    19-Sep-2026
 
AI Semiconductor Chip Revolution
 
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (एआय) झपाट्याने वाढणार्‍या वापरामुळे जागतिक सेमीकंडक्टर उद्योग एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. ‘एआय’च्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक चिप्सची मागणी वाढत असल्याने २०२६ मध्ये जागतिक सेमीकंडक्टर विक्री सुमारे ९७५ अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र, या वाढीबरोबरच ‘एआय’वरील वाढते अवलंबित्व, ऊर्जा उपलब्धता आणि जागतिक पुरवठा साखळीतील अस्थिरता ही आव्हानेही समोर येत आहेत.
 
सेमीकंडक्टर चिप्स आता केवळ संगणक किंवा मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोटार उद्योग, दूरसंचार, डेटा सेंटर, संरक्षण, ऊर्जा आणि इलेट्रॉनिस यांसारख्या क्षेत्रांचे भवितव्य चिप उद्योगाशी जोडले गेले आहे. त्यामुळे चिप्सच्या उत्पादनातील किंवा पुरवठ्यातील कोणताही मोठा बदल जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापारावर परिणाम करू शकतो.
 
‘एआय’च्या विस्तारामुळे या उद्योगाचे आर्थिक केंद्रही बदलत आहे. २०२६ मध्ये जनरेटिव्ह ‘एआय’ चिप्समधून सुमारे ५०० अब्ज अमेरिकी डॉलर महसूल मिळण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, या चिप्सचे प्रमाण एकूण चिप उत्पादनाच्या तुलनेत अत्यल्प आहे. उच्च-मूल्याच्या ‘एआय’ चिप्समुळे उद्योगाचा महसूल वेगाने वाढत असताना पारंपरिक पीसी, स्मार्टफोन आणि वाहन क्षेत्रातील चिप्सची मागणी तुलनेने संथ आहे. या बदलाचा परिणाम मेमरी बाजारावरही झाला आहे. ‘एआय प्रशिक्षण आणि डेटा सेंटर’साठी ’कइच३’ व ’कइच४’ सारख्या उच्च क्षमतेच्या मेमरीची मागणी वाढल्याने ग्राहकांसाठी वापरल्या जाणार्‍या मेमरीच्या उपलब्धतेवर दबाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी ‘एआय डेटा सेंटर’च्या वाढत्या संख्येमुळे ऊर्जेची गरजही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. २०२७ पर्यंत ‘एआय डेटा सेंटर’साठी अतिरिक्त ९२ गिगावॅट विजेची गरज भासू शकते.
 
याच पार्श्वभूमीवर जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीचे भौगोलिक समीकरण बदलत आहे. महामारी आणि भूराजकीय तणावामुळे काही मोजक्या देशांवर असलेले उत्पादनाचे केंद्रीकरण किती जोखमीचे ठरू शकते, हे स्पष्ट झाले. परिणामी, विविध देश आणि तंत्रज्ञान कंपन्या पर्यायी उत्पादन केंद्रे आणि अधिक लवचिक पुरवठा साखळी उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
 
या बदलत्या परिस्थितीत भारताचे महत्त्व वाढत आहे. ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’च्या माध्यमातून भारताने चिप डिझाईन, उत्पादन, असेंब्ली, टेस्टिंग आणि पॅकेजिंग यांसह संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था उभारण्यावर भर दिला आहे. १२ मोठ्या सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून काही प्रकल्पांनी व्यावसायिक उत्पादनाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यामुळे भारताचा प्रवास केवळ धोरणे आणि घोषणांपासून प्रत्यक्ष उत्पादनाकडे सरकत असल्याचे चित्र दिसते.
 
भारताची ताकद केवळ उत्पादन क्षमतेत नाही, तर कुशल मनुष्यबळ आणि चिप डिझाईनमध्येही आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातील कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यातील स्पर्धेत डिझाईन, संशोधन, प्रगत पॅकेजिंग, उत्पादन आणि कुशल अभियंते यांची सांगड महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, भारतासमोरील आव्हानेही कमी नाहीत. जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण गुणवत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञान, मजबूत पुरवठा साखळी, ऊर्जा उपलब्धता आणि संशोधन-विकासाची क्षमता आवश्यक आहे. केवळ चिप तयार करणे पुरेसे ठरणार नाही. चिपपासून संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्था उभारणे ही पुढची गरज असेल. ‘एआय’ने जागतिक चिप उद्योगाला नवी गती दिली असली, तरी भविष्यातील यश विविध बाजारपेठांमध्ये संतुलन राखण्यावर अवलंबून असेल. जागतिक पुरवठा साखळी नव्याने आकार घेत असताना, भारतासमोर निर्माण झालेली संधी मोठी आहे. चिपनिर्मितीच्या जागतिक नकाशावर भारताचे स्थान आता केवळ ‘पर्यायी केंद्र’ म्हणून नव्हे, तर ‘डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान परिसंस्थेतील महत्त्वाचा भाग’ म्हणून घडवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.




संबंधित मजकूर