मुंबई (Yuva Dharma Sansad 2026) : धर्म हा जीवनाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत मनुष्याच्या आचरणाला आणि निर्णयांना दिशा देणारा घटक आहे. सुख-दुःख येत-जात असतात; पण धर्म हा नित्य असतो. तोच मनुष्याच्या कर्तव्यांचे, आचरणाचे आणि उत्तरदायित्वाचे मार्गदर्शन करतो, त्यामुळे धर्माचा विचार युवा अवस्थेपासूनच सुरू व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. (Yuva Dharma Sansad 2026)
सेवाज्ञ संस्थानम् यांच्या राष्ट्रीय उपक्रम 'युवा धर्म संसद-२०२६ अवंतिका' या तीन दिवसीय अधिवेशनाचा उज्जैन येथील गीता भवनमध्ये सरसंघचालकांच्या हस्ते शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी विधिवत शुभारंभ झाला. या प्रसंगी सेवाज्ञ संस्थानम् चे संरक्षक पूज्य आचार्य मिथिलेशनंदिनीशरणजी महाराज, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशीष कुमार आशू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वामी विवेकानंद आणि भारतमाता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने उद्घाटन सत्रास प्रारंभ झाला. (Yuva Dharma Sansad 2026)
सरसंघचालकांनी 'धर्म' आणि 'रिलिजन' यांतील फरक स्पष्ट करताना धर्माला केवळ 'रिलिजन' या अर्थाने समजणे योग्य नसल्याचे सांगितले. 'धृ' या संस्कृत धातूपासून धर्म हा शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ धारण करणे असा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. धर्म व्यक्ती आणि समाजाला एकत्र बांधतो, विखुरण्यापासून वाचवतो आणि सातत्याने प्रगतीकडे नेतो, असे ते म्हणाले. धर्म म्हणजे संसारापासून दूर जाणे किंवा सर्व काही त्यागणे नव्हे; तर भौतिक जीवन, आध्यात्मिक उन्नती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समतोल साधण्याची जीवनदृष्टी आहे, असे त्यांनी सांगितले. (Yuva Dharma Sansad 2026)
व्यक्तीचे यश तेव्हाच सार्थक ठरते, जेव्हा त्यात इतरांच्याही यशाचा सहभाग असतो, असे सांगत सरसंघचालकांनी युवकांना ज्ञान, दान आणि दुर्बलांच्या संरक्षणाच्या भावनेने पुढे जाण्याचे आवाहन केले. स्वतःच्या उपासना आणि परंपरेप्रती निष्ठावान राहतानाच इतरांच्या उपासना पद्धतींचा आदर राखणे ही भारतीय जीवनदृष्टीची वैशिष्ट्यपूर्ण बाजू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वागतपर भाषणात पूज्य आचार्य मिथिलेशनंदिनीशरणजी महाराज यांनी युवकांना आत्मनिर्माण आणि भारतबोधाचा संदेश दिला. "स्वतःपेक्षा खालच्या स्तरावरील व्यक्तीवर विजय मिळवण्यात खरा विजय नसतो; स्वतःपेक्षा श्रेष्ठ ध्येय साध्य करण्यातच खरी जिंक असते," असे ते म्हणाले. भारतीय युवकांनी केवळ युवक म्हणून न राहता स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवताना भारताला समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. युवकांच्या प्रश्नांवर बाजारपेठ, राजकारण किंवा बाह्य प्रभावांचा परिणाम होऊ न देता आत्मचेतना आणि जीवनमूल्यांच्या आधारे विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. (Yuva Dharma Sansad 2026)
केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी भारताच्या ज्ञानपरंपरेशी आणि आत्मबोधाशी युवकांना जोडण्याचे आवाहन केले. "इंडियाकडून भारताकडे नेणारी चेतना युवकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आत्मविश्वास, ज्ञान आणि भारतीय दृष्टिकोन यांचा विकास ही समाज आणि राष्ट्रासाठी महत्त्वाची उपलब्धी ठरेल," असे ते म्हणाले. (Yuva Dharma Sansad 2026)
देशातील २५ राज्यांमधून सुमारे १,६०० युवा प्रतिनिधी तसेच ३०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, संशोधक, विद्वान आणि धर्माचार्य या अधिवेशनात सहभागी झाले असून धर्म, संस्कृती, शिक्षण, तंत्रज्ञान, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्माण या विषयांवर विविध सत्रांमध्ये संवाद आणि चिंतन होत आहे. (Yuva Dharma Sansad 2026)
दैनंदिन जीवनातील आचरणही धर्माचाच भाग
मनुष्य निसर्गदृष्ट्या मर्यादित क्षमतांचा प्राणी असला, तरी बुद्धीच्या बळावर त्याने सृष्टीत महत्त्वाचे स्थान मिळवले असून त्यामुळे सृष्टीप्रती त्याची जबाबदारीही वाढते, असे सरसंघचालक म्हणाले. युवकांनी परिश्रम आणि आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहन करत त्यांनी सत्य, करुणा, शुचिता आणि तप यांना मानवी धर्माचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हटले. धर्म हा केवळ मोठमोठ्या तत्त्वज्ञानापुरता मर्यादित नसून जेवणानंतर कचरा न टाकणे, वाहतुकीचे नियम पाळणे, इतरांना त्रास न देणे, स्वतःची कर्तव्ये पार पाडणे आणि समाजाप्रती जबाबदारी निभावणे हे देखील धर्माच्याच आचरणाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Yuva Dharma Sansad 2026)
तीन दिवस विविध विषयांवर मंथन
सेवाज्ञ संस्थानम् तर्फे आयोजित 'युवा धर्म संसद'चे हे सहावे पर्व असून यापूर्वी काशी, अयोध्या, मथुरा, हरिद्वार आणि कांचीपुरम येथे या अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय अधिवेशनात धर्माची अस्तित्वपरक संकल्पना आणि चारित्र्याधिष्ठित उत्तरदायित्व, भारतीय संस्कृती, शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान, माहिती व विचारांचा संघर्ष, सामाजिक उत्तरदायित्व, मानवी मूल्ये आणि राष्ट्रनिर्माणात युवकांची भूमिका या समकालीन विषयांवर विविध सत्रांमध्ये संवाद आणि मंथन सुरू आहे. (Yuva Dharma Sansad 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक