संपर्काला संघविचारांचा व्यापक संदर्भ देणारे प्रा. वसंतराव जोशी सर

    19-Sep-2026
 
Vasant Parshuram Joshi
 
रा. स्व. संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रहितासाठी आयुष्य समर्पित करणारे, प्रसिध्दीपासून अलिप्त राहून योगदान देणारे आणि नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वाने असंख्य कार्यकर्त्यांना घडविणारे अविचल निष्ठेचे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजे वसंतराव परशुराम जोशी. ज्येष्ठ स्वयंसेवक, जनजाती कल्याण आश्रमाचे क्षेत्रीय नगरीय कार्यप्रमुख, ‘स्वदेशी जागरण मंचा’चे कार्यकर्ते तसेच ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे माजी कार्यकर्ते राहिलेले प्रा. वसंत जोशी यांचे वयाच्या ७२व्या वर्षी रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रवादी विचारांच्या क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. त्यानिमित्ताने जोशी सरांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करणारा हा लेख...
 
मनमाड शहरातून नाशिकच्या पंचवटी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाल्यामुळे स्थानांतरित झालेले जोशी सर यांनी मूळच्या संघ विचारांच्या घरातले. संघ संस्कारांतून नाशिकला आल्यावर विद्यार्थी परिषदेच्या कामाला १९७८ साली त्यांनी सुरुवात केली आणि पुढे प्रदीर्घ काळ त्यांनी विद्यार्थी परिषदेचे काम केले. विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये ‘जोशी सर’, तर सहकारी आणि संघ कार्यकर्त्यांमध्ये ‘मास्तर’ म्हणून प्रसिद्ध होते.
 
सहज संवादातून नवीन कार्यकर्त्याला आपलेसे करणारे जोशी सर विद्यार्थी कार्यकर्त्याच्या योग-क्षेमाची सर्व काळजी करीत असत. त्यांचा कार्यकर्त्याच्या घराशी थेट संपर्क असे आणि नुसताच घराशी नाही, तर थेट स्वयंपाकघराशी. म्हणजे कार्यकर्त्याची आई, मावशी, ताई, वडील, दादा या सगळ्यांशी ते अगदी उत्तम संवाद साधायचे. एखाद्या वेळी सहजपणे ‘मी जेवायला नक्की येईन,’ असे सांगून विश्वास संपादन करणारे जोशी सर कार्यकर्ता घरी नसतानाही त्याच्या घरी जाऊन गप्पा मारायचे. सामान्य घरातील कार्यकर्त्यांना आणि त्याच्या घरच्यांनाही एवढे मोठे सर-प्राध्यापक आपल्या घरी येतात, याचे अप्रूप वाटे. आपल्या मुलाची किंवा मुलीची काळजी घेणारे कोणीतरी आहे, याचा विश्वास सरांच्या मोकळ्या आणि पारदर्शी स्वभावातून निर्माण होत असे आणि सारे कुटुंबच संघटनेशी जोडले जात असे. त्यामुळे त्यांच्या गुण-दोषांचा नीट परिचय होई आणि मग त्यांच्या गुणांची बेरीज आणि दोषांची वजाबाकी करण्याचे काम जोशी सर त्याच्या नकळत आणि अतिशय विनयशीलतेने करीत असत.
 
हे करताना ‘मी काहीतरी विशेष करतोय, असा त्यांचा कधीच अविर्भाव नसायचा. जणू काही विद्यार्थी परिषदेची कार्यपद्धती आणि ‘कार्यकर्ता’ संकल्पना ते कोळून प्यायले होते. त्यामुळे त्यांच्या नित्याच्या वागण्यात तो भाव, ती शिस्त सहजपणे उतरलेली होती. ‘आधी केले मग सांगितले,’ अशा भूमिकेतून ते काम करीत असत.
 
संस्कार, संदर्भ आणि पार्श्वभूमी
 
त्यांचे वडील दादा तथा परशुराम जोशी हे संघाचे अतिशय शिस्तप्रिय, कठोर, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते स्वयंसेवक होते. त्यामुळे त्याचे बाळकडू सरांना घरातूनच मिळालेले होते. त्या काळातसुद्धा रेल्वेतील आपली नोकरी सांभाळून ते संघाचे काम अतिशय निष्ठेने करीत असत. तोच आदर्श जोशी सरांमध्येही प्रतिबिंबित झालेला दिसतो. त्यामुळे महाविद्यालयातही जोशी सर अत्यंत शिस्तप्रिय, परंतु अतिशय प्रेमळ आणि आपल्या शिकवण्याच्या विषयावर अतिशय कमांड असलेले प्राध्यापक, प्रसंगी अतिशय स्नेहशील आणि विद्यार्थ्यांना अडचणीत मदत करणारे, विद्यार्थ्यांना वेळ देऊन त्यांच्या अडचणी सोडवणारे, विद्यार्थ्यांना जाणून घेणारे, त्यांच्या घरी संपर्क असणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी अनेक विद्यार्थी परिषदेच्या कामात जोडले गेले. त्यातील अनेक विद्यार्थी कार्यकर्ते आजही संघ, संघ उपयोजित अनेक संस्था-संघटनांमध्ये प्रभावीपणे काम करताना दिसतात.

संपर्क हाच जोशी सरांच्या कामाचा आत्मा
 
सातत्यपूर्ण संपर्क - मग तो कार्यकर्त्यांशी वैयक्तिक आणि परिवाराशीपण उत्तम, सहज, स्वाभाविक संपर्क होता. त्यामुळे जोशी सर शेकडो कार्यकर्त्यांच्या परिवाराचा सुख-दुःखाचा एक अविभाज्य भाग बनले होते. विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारची आदरयुक्त भीती होती, त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचा धाक होता. अनेक कार्यकर्त्यांना ते ‘अकाऊंटन्सी’ हा विषय समजावून सांगण्यासाठी व त्यातील समस्या सोडवण्यासाठी कार्यालयात दुपारी घेऊन बसत असत. कार्यकर्त्याने भरपूर काम केले पाहिजे, तसा तो उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला पाहिजे, याबद्दल त्यांचा दंडक होता. त्याकरिता अभ्यास किंवा आर्थिक कोणतीही मदत त्याला करण्याची त्यांची तयारी होती.
 
सतत कामासाठी माणसं जोडण्याचा ध्यास
 
प्रत्येक कार्यकर्ता हा परिषद कामातून नैसर्गिकरीत्या बाहेर पडल्यानंतर त्याच्या व्यक्तिगत जीवनातील यशस्वितेबरोबरच तो कोणकोणत्या सामाजिक कामाशी जोडला गेला पाहिजे, असा त्यांचा सतत प्रयत्न होता. त्यासाठी नवीन आणि जुन्या व्यवसायी कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी ठेवला. म्हणूनच त्यांना ‘कार्यकर्त्यांचा विश्वकोश’ असे म्हटले जाते.
 
कामाला सुरुवात केल्यानंतर प्रथम भेटलेल्या कार्यकर्त्यापासून कामात असेपर्यंत भेटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची अद्ययावत माहिती सरांकडे होती. त्याचा उपयोग करून त्यांनी संपर्कातील अनेक कार्यकर्ते ‘स्वदेशी जागरण मंच’ व त्यानंतर ‘जनजाती कल्याण आश्रमा’साठी जोडले. जिथे त्यांनी काम सुरू केले, तिथे एक टीम - टोळी बनवली आणि सांघिक कामातून कामाचा प्रभाव आणि परिणामकारकता वाढवली.
 
याव्यतिरिक्त या कामाची आवड नसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांना आवडणार्‍या आणि त्यांना योग्य अशा कामात जोडायचे काम सरांनी केले. कार्यकर्त्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत थेट संपर्क असल्याने कोणता कार्यकर्ता कोणत्या कामात बसू शकेल, याचा अचूक अंदाज सरांना होता. अनेक ठिकाणी तर कार्यकर्त्यांना सपत्निक कामात जोडण्याचे काम त्यांनी केले. ते म्हणायचे, "काम करण्याचे स्फुल्लिंग प्रत्येक कार्यकर्त्यात असतेच; आपण त्या विस्तवावरची राख फुंकून फक्त बाजूला करायची असते. ते आपोआप कामाला लागतात. आपली एक आपुलकीची आणि कामाची गरज सांगणारी एक फुंकर पुरेशी असते. आपण तेवढेच निमित्त असतो. बस्स!”
 
प्रत्येक कार्यकर्त्याचे ‘अकाऊंट’
 
‘अकाऊंटन्सी’ हा सरांचा शिकवण्याचा मुख्य विषय असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांचे डेबिट, क्रेडिट आणि बॅलन्स शीट त्यांच्याकडे तयार असायचे. गप्पा मारताना, सेट ठरलेल्या कार्यकर्त्यांचे ते भरभरून कौतुक करीत असत आणि कुटुंबाला आणि समाजाला ‘लायबिलिटी’ ठरलेल्या कार्यकर्त्यांबद्दल ते सतत खंत व्यक्त करीत असत. ते मला म्हणायचे, "दिल्या (दिलीप), यार आपण कमी पडलो.” व्यक्तिगत भेटीत प्रेमाने मला ‘दिल्या’, किशोर वैद्यला ‘किश्या’ म्हणणारे जोशी सर चारचौघांत किंवा सार्वजनिक ठिकाणी चुकूनही ‘दिल्या’ किंवा ‘किश्या’ म्हणत नसत. भेटलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अकाऊंट त्यांच्याकडे होते आणि विशेष म्हणजे, अनेक कार्यकर्त्यांच्या मुला-मुलींशीसुद्धा त्यांचा उत्तम संपर्क होता. त्यांच्याशी थेट फोनवर ते बोलत असत. प्रवासात त्यांना भेटत असत. त्यामुळे माझ्यासारख्याच अनेक कार्यकर्त्यांच्या मुला-मुलींनीही जोशी सरांचे निधन झाल्याचे कळल्यावर ‘वाईट झाले,’ अशी खंत आणि हळहळ नक्की व्यक्त केली असणार, यात शंका नाही. इतका त्यांचा संपर्क सखोल रुजलेला होता.
 
व्यक्तिमत्त्व हाच विचार
 
साधी राहणी, हसतमुख चेहरा आणि कोणत्याही कार्यकर्त्यांशी बोलताना बंधू आणि विद्यार्थिनी किंवा महिला कार्यकर्तीशी बोलताना, ‘भगिनी’ म्हणून सुरुवात करणारे जोशी सर परिषद कार्यपद्धती आणि संघ विचार जगत होते.
 
विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही सरांचे घर हे पूर्णवेळ कार्यकर्ता, प्रांतातील प्रवासी कार्यकर्ता, प्राध्यापक कार्यकर्ते यांच्या निवासासाठी हक्काचे घर होते; पण माहेरी संघाच्या कामाची पार्श्वभूमी नसलेल्या आणि उच्च विद्याविभूषित विनया वहिनींनी कधीही तक्रार केली नाही आणि आपल्या सासरचा वारसा पुढे चालवला.

निरपेक्ष भावनेतून काम
 
संघविचारांशी एकनिष्ठ असणारा हा माणूस संघाने दिलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारून निष्ठेने पार पाडत असत, विद्यार्थी परिषदेच्या कामानंतर आलेली ‘स्वदेशी जागरण मंचा’ची असलेली जबाबदारी असो की, त्यानंतर संघाने दिलेली ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची जबाबदारी असो, सर्व काम त्यांनी मनापासून, जीव लावून केले आणि सर्वच कामांत संपर्क हा त्यांच्या कामाचा आत्मा राहिला. संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काम आणि प्रत्येक कामासाठी व्यक्ती जोडणे, हे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.
 
प्राध्यापकाच्या परीक्षेचा काळ
 
जोशी सरांना आपल्या कौटुंबिक जीवनातही अनेक दुःखद, लेशकारक समस्यांना सामोरे जावे लागले. नाशिक येथे आल्यानंतर त्यांचा सर्वांत धाकटा भाऊ आनंद याचा आगदी तरुण वयात अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा क्रमांक दोनचा भाऊ शिशिर, आई आणि दादा सर्व कुटुंबीय नाशिकला स्थायिक झाले. त्यानंतर मुलगा सुहृद याला अपघात झाला; त्यात त्याचा पुनर्जन्मच झाला. त्यातून बाहेर पडतात न पडतात, तोच विवाहानंतर मुलगी गायत्री हिला कर्करोग झाला. त्यातून ती उत्तमपणे बरी होऊन बाहेर पडली. या सर्व परिस्थितीत सरांमधील लढवय्या कार्यकर्ता डगमगला नाही. विनया वाहिनींची ही भरभक्कम साथ त्यांना लाभली. पण, अशा बिकट परिस्थितीचे कधीही त्यांनी भांडवल केले नाही की त्यांचे कामही कधी थांबले नाही. ते स्वल्पविराम घेत असत आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करीत असत.
 
कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...
 
जीवन संघर्ष आणि कामाचा झपाटा यांतून उसंत नाही. आताशा कुठे सर्व स्थिरस्थावर आणि छान चाललं होतं; धाकटा मुलगा प्रसाद याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि सर थोडे निवांत झाले होते आणि पुन्हा काळाची नजर लागली आणि सरांना कर्करोगाने खिंडीत गाठले. सर काळाशी झगडत होते. "माझे संपर्काचे काम थांबले आहे. बरे वाटले की पुन्हा प्रवास सुरू करीन,” असे नुकतेच फोनवर बोलताना म्हणाले होते. वयाच्या ७६व्या वर्षीसुद्धा संपर्क आणि प्रवासाचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता म्हणजे जोशी सर. परंतु अखेर काळाने विजय मिळवलाच. जोशी सरांच्या निधनाची वार्ता सर्व कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावणारी एक दुःखद घटना होती.
 
आणि ‘संपर्क हा संघकामाचा आत्मा आहे,’ म्हणून स्वतःचा आत्मा मानून काम (संपर्क) करणारे आमचे मितवा मित्र, तत्त्वनिष्ठ आणि वाटाडे (मार्गदर्शक) जोशी सर कालवश झाले. त्यांनी केलेल्या उचित, उत्तम कर्मामुळे त्यांना सद्गती मिळणार, यात संदेह नाही.
 
सदाशिवराव देवधर अजूनही नेहमी सांगतात की, व्यक्तिनिर्माणाचे काम, कार्यकर्ता घडविण्याचे काम आपले सर्वांत महत्त्वाचे काम आहे. त्यावरील आपले लक्ष ढळता कामा नये. जोशी सरांच्या कामातूनही आपल्याला हेच लक्षात येते.
 
शुद्ध सात्त्विक भावना ही कार्य का आधार हैं|
या पंक्ती आपल्या व्यवहारातून जगणार्‍या प्रा. वसंत परशुराम जोशी यांना शत शत नमन...
 
- प्रो. डॉ. दिलीप बेलगावकर




संबंधित मजकूर