नवी दिल्ली (SEMICON India 2026) : भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असतानाच जागतिक स्तरावर भारतावरील विश्वासही वाढत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील यशोभूमी येथे ‘सेमीकॉन इंडिया 2026’च्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि. 17 सप्टेंबर रोजी झाले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवस दिनीच या कार्यक्रमाला सुरुवात झाली. (SEMICON India 2026)
भारत सेमीकंडक्टर क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून, देशात तयार झालेल्या सेमीकंडक्टर चिप्स आता जागतिक बाजारपेठेत पोहोचत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सेमीकंडक्टर क्षेत्रातील तांत्रिक क्षमता निर्माण करण्यासाठी अनेक दशके लागतात मात्र, भारताने चिप डिझाइन, उत्पादन, उपकरण निर्मिती तसेच चाचणी क्षमता या सर्वच क्षेत्रांवर एकाच वेळी लक्ष केंद्रित केले. विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून या क्षेत्राला सातत्याने चालना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी मोदी यांनी सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या जीडीपी आकडेवारीचाही उल्लेख केला. जागतिक स्तरावर आव्हानात्मक परिस्थिती असतानाही, भारताने 7.8 टक्के आर्थिक वाढ नोंदवल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अर्थव्यवस्थेच्या वाढीसोबतच तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील भारताची क्षमता विस्तारत असल्याचे त्यांनी नमूद केले. (SEMICON India 2026)
‘सेमीकॉन इंडिया 2026’मध्ये 600हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असून, त्यापैकी सुमारे 300 कंपन्या आंतरराष्ट्रीय आहेत. 40हून अधिक देशांच्या शिष्टमंडळांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. एएसएमएल, एप्लाइड मटेरियल्स, टेराडाइन, इन्फिनियन, एनएक्सपी, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रॉन, लॅम रिसर्च, सीजी पॉवर, डव्हान्टेस्ट आणि टोकियो इलेक्ट्रॉन यांसारख्या प्रमुख कंपन्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्थेत नवीन गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे. (SEMICON India 2026)
केंद्र सरकारचे सेमीकंडक्टर क्षेत्राला पाठबळ!
देशातील सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 12 प्रकल्पांना मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात मंजूरी मिळालेल्या तीन युनिट्समध्ये व्यावसायिक उत्पादनही सुरू झाले आहे. सेमीकंडक्टर मिशनचा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला असून, त्यासाठी 1.18 लाख कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्याचे मूल्य सुमारे 70 हजार 400 कोटी रुपये होते. याशिवाय विविध योजनांच्या माध्यमातून 24 स्टार्टअप्सना मंजुरी देण्यात आली असून, त्यांचा भर चिप डिझाइनवर आहे. (SEMICON India 2026)