एक उत्तम खेळाडू, संघटक आणि समाजधुरीण...

    18-Sep-2026
 
Sahebrao Patil Nashik
 
नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा संघचालक साहेबराव पंढरीनाथ पाटील यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. साहेबराव हे केवळ कुशल संघटकच नव्हते, तर उत्तम खेळाडू म्हणूनही त्यांनी नावलौकिक कमावले आणि खेळाडूही घडवले. साहेबराव पाटील यांच्या निधनाने एक समर्पित आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या कार्यस्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
 
आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की, त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर समाजाची, संस्थेची आणि एका संपूर्ण कार्यक्षेत्राची मोठी हानी होते. त्यांच्या कार्याचा ठसा अनेकांच्या जीवनावर उमटलेला असतो. त्यांच्या आठवणी केवळ स्मृती बनून राहत नाहीत, तर पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतात. नाशिक ग्रामीणचे संघचालक स्वर्गीय साहेबराव पाटील हे अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. अल्पशा आजाराने वयाच्या अवघ्या ७२व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राने एक तळमळीचा कार्यकर्ता, सामाजिक क्षेत्राने एक निष्ठावंत सेवक आणि संघकार्याने एक समर्पित संघटक गमावला आहे.
त्यांच्या कार्याचा प्रवास म्हणजे ग्रामीण संस्कारांतून घडलेले व्यक्तिमत्त्व, क्रीडाक्षेत्रातील अथक परिश्रम, अपयशावर मात करण्याची जिद्द आणि समाजकार्याच्या व्यापक क्षेत्रात केलेली अविस्मरणीय कामगिरी होय.
 
ग्रामीण संस्कारांतून घडलेले व्यक्तिमत्व
 
दिंडोरी तालुयातील जोपूळ या गावच्या मातीत साहेबराव पाटील यांचे बालपण आणि शिक्षण घडले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. शिक्षक आणि शेतकरी कुटुंबातील संस्कार त्यांना लाभले. ग्रामीण भागात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘आयटीआय’चे शिक्षण घेतले. शिक्षण, कष्ट, शिस्त आणि समाजाशी असलेली नाळ या गुणांचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. पुढे नोकरीनिमित्ताने ते नाशिकला आले. ‘मायको’ कंपनीत नोकरीला लागल्यानंतरही त्यांनी स्वतःला केवळ नोकरीपुरते मर्यादित ठेवले नाही. सामाजिक कार्य, क्रीडा आणि समाजातील तरुणांच्या घडणीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. वडील शिक्षक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. साहेबराव पाटील यांनीही आपल्या परीने शिकवण्याचे आणि घडवण्याचे कार्य पुढे चालू ठेवले. मात्र, त्यांचे कार्यक्षेत्र होते, क्रीडांगण आणि खेळाडूंचे जीवन!
 
नोकरीसोबत क्रीडाक्षेत्राची अखंड साधना
 
सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत नोकरी. त्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी साहेबराव पाटील थेट मैदानावर जात असत! खेळ हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. ते उत्कृष्ट खेळाडू होते. विविध खेळांचे नियम त्यांना अवगत होते. कोणताही खेळ असो, त्याची माहिती, त्यातील बारकावे आणि खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेला हा माणूस पुढे उत्तम संघटक बनला. खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता, त्यातून शिस्त, संघभावना, नेतृत्व आणि जीवनमूल्ये घडतात, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. याच तळमळीतून त्यांनी ‘पायोनियर लब’ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी खेळाडूंना घडवण्याचे काम सुरू केले. नाशिकच्या क्रीडाक्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
 
अपयशातून उभारी घेणारा कार्यकर्ता
 
सामाजिक कार्यातून त्यांनी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपयश आले. अपयशाने ते काही काळ खचले. आपण इतके काम करतो, समाजासाठी धडपडतो, तरीही अपयश का आले; आता हे सगळे बंद करावे का, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. अशा वेळी नाशिक जिल्ह्याचे संघचालक बाळासाहेब आहेर यांची भेट त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा देणारी ठरली. साहेबरावांनी आपली मनःस्थिती बाळासाहेबांना सांगितली. त्यावर बाळासाहेबांनी त्यांना मार्गदर्शन केले. "तू रोज मैदानावर जातोस. तू ‘क्रीडा भारती’चे काम सुरू कर. आपल्या प्रदेशाचे राज चौधरी यांना भेट.” या मार्गदर्शनाने साहेबराव पाटील यांच्या कार्याला नवा आयाम मिळाला. त्यांनी राज चौधरी यांची भेट घेतली आणि ‘क्रीडा भारती’च्या कार्याला सुरुवात केली. अपयशाने थांबवले नाही; उलट त्याच अपयशाने त्यांच्या जीवनाला मोठे कार्यक्षेत्र मिळवून दिले.
 
‘क्रीडा भारती’ म्हणजे साहेबराव पाटील
 
नाशिक शहरात ‘क्रीडा भारती’ची पहिली शाखा सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहेबराव पाटील यांनी केले. पुढे हे कार्य नाशिक शहरापुरते मर्यादित राहिले नाही. नाशिक जिल्हा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी ‘क्रीडा भारती’चे काम व्यापक केले. ‘क्रीडा भारती’च्या कार्याशी ते इतके एकरूप झाले की, लोकांच्या मनात एक समीकरण निर्माण झाले. ‘क्रीडा भारती म्हणजे साहेबराव पाटील’ आणि ‘साहेबराव पाटील म्हणजे क्रीडा भारती!’ ही केवळ लोकप्रियता नव्हती. त्यामागे होती, वर्षानुवर्षांची मेहनत, मैदानावर घालवलेला वेळ, खेळाडूंशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठीची अखंड धडपड!

हॅण्डबॉलमध्ये नाशिकचा झेंडा फडकावणारा जिद्दी संघटक
 
साहेबराव पाटील यांच्या क्रीडाकार्यातील हॅण्डबॉलचा प्रवास विशेष उल्लेखनीय आहे. त्या काळात हॅण्डबॉलमध्ये नागपूरचे वर्चस्व होते. नाशिकची टीम घेऊन साहेबराव पाटील नागपूरला गेले. तेथे नाशिकच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, पराभवाने साहेबराव खचले नाहीत. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना धीर दिला. "अपयश आले म्हणून निराश होऊ नका, अधिक मेहनत करा,” असा संदेश त्यांनी दिला. त्यानंतर त्यांनी वर्षभर हॅण्डबॉलचा सराव करून घेतला. खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, त्यांच्याकडून कठोर परिश्रम करून घेतले. आणि पुढच्या वर्षी, महाराष्ट्राचा हॅण्डबॉल चषक नाशिकने जिंकला! नागपूरचे असलेले वर्चस्व नाशिकने आपल्या मेहनतीने मिळवले. या यशामागे खेळाडूंचे कौशल्य होतेच; पण त्या कौशल्याला दिशा देणारे, पराभवानंतरही खंबीर उभे राहणारे आणि वर्षभर संघाला घडवणारे साहेबराव पाटील होते. हा प्रसंग त्यांच्या जीवनातील एक मोठा संदेश देऊन जातो. पराभव हा शेवट नसतो; ती नव्या विजयाची तयारी असते.
 
खेळाडूंसाठी जगणारा माणूस
 
साहेबराव पाटील यांचे खेळाडूंवर अपार प्रेम होते. खेळाडू हा त्यांचा जीव की प्राण होता. खेळाडूंची व्यवस्था होत नसेल, आर्थिक अडचणी असतील किंवा प्रशिक्षणासाठी मदतीची गरज असेल, तर ते शक्य तेवढी मदत करत असत. खेळाडू घडवणे, हे त्यांचे ध्येय होते. नागपूरच्या प्रवासातील एक प्रसंग त्यांच्या त्यागाची आणि तळमळीची जाणीव करून देतो. प्रवासात पैसा कमी असायचा. नागपूरला गेल्यावर विद्यार्थ्यांसोबत स्टेडियमच्या बाहेर झोपण्याची वेळ आली, तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. आपली शाल विद्यार्थ्यांना देऊन ते स्वतः फरशीवर झोपत असत. क्रीडाक्षेत्रातील मोठेपणा केवळ पुरस्कारांनी ठरत नाही, तर खेळाडूंच्या अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात तो दिसतो. साहेबराव पाटील यांनी हे आपल्या आचरणातून दाखवून दिले.
 
‘मायको’ कंपनीतील कामगारांचा आदर मिळवणारे व्यक्तिमत्व
 
‘मायको’ कंपनीत काम करत असताना साहेबराव पाटील यांनी तेथेही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ते कामगारांना ‘आयटीआय’चे प्रशिक्षण देत असत. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांचा शिकवण्याचा वारसा साहेबरावांनी वेगळ्या प्रकारे पुढे चालवला. सकाळची नोकरी, त्यानंतर मैदान, खेळाडूंचे प्रशिक्षण आणि सामाजिक कार्य या सर्वांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. कंपनीतील कामगार त्यांना मोठा आदर देत असत. हा आदर पदामुळे नव्हता, तर त्यांच्या वागणुकीमुळे होता. माणसाशी माणुसकीने वागणे, प्रत्येकाला सन्मान देणे आणि आपलेपणाने जोडून घेणे, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
 
‘शिवछत्रपती पुरस्कारा’ने सन्मानित कार्य
 
साहेबराव पाटील यांनी क्रीडा आणि खेळाडू घडवण्याच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ संघटक म्हणून प्राप्त झाला. हा पुरस्कार त्यांच्या वैयक्तिक यशाचा सन्मान नव्हता; तो त्यांच्या मागे उभ्या असलेल्या असंख्य खेळाडूंच्या, विद्यार्थ्यांच्या आणि क्रीडा कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचा गौरव होता. त्यांनी निर्माण केलेले अनेक खेळाडू आज शाळा, महाविद्यालये आणि विविध क्षेत्रांत शिक्षक व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती. एका पिढीला खेळ शिकवून थांबले नाहीत, तर त्या पिढीला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी घडवलेले विद्यार्थी पुढे इतरांना घडवत राहिले. ही ज्ञानाची आणि संस्कारांची अखंड परंपरा आहे.

संघचालक म्हणून नवी जबाबदारी
 
‘क्रीडा भारती’च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना, नाशिक ग्रामीणचे संघचालकपद त्यांच्याकडे चालून आले. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. संघचालकपदाचा मान, त्याची प्रतिष्ठा आणि त्यामागची जबाबदारी त्यांनी जपली. नाशिक ग्रामीण जिल्हा त्यांनी पिंजून काढला. संघाचे काम अधिकाधिक वाढावे, समाजातील विविध घटकांपर्यंत संघकार्य पोहोचावे आणि कार्यकर्त्यांची संघटनशक्ती वाढावी, यासाठी ते प्रयत्नशील राहिले. उत्तम खेळाडू, उत्तम संघटक आणि उत्तम सामाजिक कार्यकर्ता या सर्व गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता.
 
‘क्रीडांगणावर खेळाडूंना घडवणारे साहेबराव’, ‘कंपनीत कामगारांना प्रशिक्षण देणारे साहेबराव’ आणि ‘संघचालक म्हणून संघकार्याला दिशा देणारे साहेबराव’ ही त्यांच्या जीवनाची तीन महत्त्वाची रूपे होती!
 
अवघ्या ७२व्या वर्षी साहेबराव पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. जाण्याचे हे वय नव्हते. अजून खूप काम करायचे होते. अजून अनेक खेळाडू घडवायचे होते. अजून अनेक कार्यकर्त्यांना दिशा द्यायची होती. अजून संघकार्याचा विस्तार करायचा होता. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यांच्या निधनाने क्रीडाक्षेत्रातील एक तळमळीचा मार्गदर्शक, सामाजिक क्षेत्रातील एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि संघकार्याला समर्पित असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण आदरांजली!

-शरद जाधव
९४२२७६१६९९




संबंधित मजकूर