‘महालक्ष्म्या’ पूजनाचे अनुपम रहस्य!

    18-Sep-2026
 
Mahalaxmi Puja Maharashtra
 
काल ज्येष्ठागौरींचे भक्तिभावाने आगमन झाले, आज त्यांचे मनोभावे पूजन होईल आणि उद्या निरोपाचा क्षण... त्यानिमित्ताने या ‘महालक्ष्म्या’ पूजनाचे अनुपम रहस्य उलगडणारा हा लेख...
 
भाद्रपदातील ‘अनुराधा’ नक्षत्र उजाडते आणि महाराष्ट्रातील असंख्य घरांची लगबग अचानक वाढते. घर स्वच्छ होते, दारापासून आतपर्यंत पावले उमटतात, मखर सजते, फुले येतात, मुखवटे चढतात आणि घरातील स्त्रियांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसू लागतो, आज महालक्ष्म्या येणार! गंमत अशी की, आपण ‘महालक्ष्मी’ म्हणत नाही; अनेक घरांत प्रेमाने ‘महालक्ष्म्या’ म्हणतो. कारण, येणारी एक नाही, दोन आहेत. ‘ज्येष्ठा’ आणि ‘कनिष्ठा’. दोन बहिणी. दोघींनाही आपण सारखेच सजवतो, सारखाच मान देतो, सारख्याच प्रेमाने जेवू घालतो. पण, या दोन बहिणींच्या मागची कथा समजून घेतली की, महाराष्ट्रातील हा तीन दिवसांचा कुलाचार केवळ सुंदर सण राहत नाही; तो मानवी जीवन, संपत्ती, लोभ, सदाचार, समाधान आणि समृद्धी यांचे विलक्षण तत्त्वज्ञान सांगू लागतो.
 
या दोन बहिणींपैकी धाकटी आहे ‘लक्ष्मी’ आणि मोठी आहे ‘ज्येष्ठा’-‘अलक्ष्मी.’ ‘लक्ष्मी’ म्हटली की आपल्या डोळ्यांसमोर सोने, धान्य, कमळ, ऐश्वर्य उभे राहते; ‘अलक्ष्मी’ म्हटली की दारिद्य्र, अभाव, कलह आणि मालिन्य. मग प्रश्न पडतो, लक्ष्मीची पूजा समजू शकतो; पण अलक्ष्मीची पूजा कशासाठी? तिला घरात आणायचेच कशाला? इथेच भारतीय धर्मपरंपरेचे वैशिष्ट्य समजून घ्यावे लागते. आपल्या परंपरेने जगाला फक्त काळ्या आणि पांढर्‍या रंगात रंगवले नाही. मंगल आहे, म्हणून तेच ईश्वराचे आणि अमंगल आहे, म्हणून ते ईश्वराच्या विश्वाबाहेरचे, अशी विभागणी केलेली नाही. विघ्न निर्माण करणार्‍या शक्तीलाच आपण प्रथम नमस्कार करून म्हणतो, ‘माझे कार्य निर्विघ्न कर!’ म्हणून ‘विघ्नांचा अधिपती’ गणेशच ‘विघ्नहर्ता’ होतो. रावण वध्य आहे, पण त्याची शिवभक्ती नाकारली जात नाही. विरोधी शक्तींचा नाश करायचा असला, तरी तिचे अस्तित्व, सामर्थ्य आणि विश्वव्यवस्थेतील स्थान नाकारायचे नाही. अमंगलाला नाकारण्यापेक्षा त्याला ओळखणे, त्याचे नियमन करणे आणि अखेरीस त्यावर मात करणे, ही भारतीय दृष्टी आहे.
 
ज्येष्ठा-अलक्ष्मीची एक विलक्षण कथा पुराणपरंपरेत येते. तिचा विवाह उद्दालक ऋषींशी झाला. पण, ऋषींच्या आश्रमातील वेदघोष, यज्ञ, शूचिता, धर्माचरण तिला रुचले नाही. जिथे कलह आहे, अधर्म आहे, अस्वच्छता आहे, परधनहरण आहे, अनाचार आहे, ते वातावरण तिला अधिक प्रिय. अखेर तिच्या स्वभावाला कंटाळलेले उद्दालक तिला सोडून निघून गेले. ज्येष्ठा एकटी पडली. पण, धाकटी बहीण आपल्या मोठ्या बहिणीला विसरली नाही. महाराष्ट्राच्या लोकमानसाने या कथेला किती हृदयस्पर्शी रूप दिले! वर्षातून एकदा लक्ष्मी आपल्या या ज्येष्ठ बहिणीला सोबत घेऊन आपल्या भक्तांच्या घरी येते. म्हणून आपण फक्त शुभाचे स्वागत करत नाही; अशुभालाही समोर बसवतो. त्याच्याकडे डोळे उघडून पाहतो आणि त्यांच्या येण्याचा दिवसही अर्थपूर्ण आहे. आगमन ‘अनुराधा’ नक्षत्रावर होते. अनुराधेची वैदिक देवता आहे मित्र-संबंध जोडणारी, सौहार्द निर्माण करणारी शक्ती. म्हणून जणू दोन बहिणी आपल्या घराशी नाते जोडायला येतात. दुसर्‍या दिवशी ‘ज्येष्ठा’ नक्षत्रावर त्यांची मुख्य पूजा होते, महानैवेद्य होतो. ज्येष्ठेची देवता इंद्र-ऐश्वर्य, सामर्थ्य, भोग आणि वैभवाचा अधिपती. आणि तिसर्‍या दिवशी मूळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन होते. मूळाची देवता निर्ऋती-विघटन, क्षय, विलयाशी संबंधित शक्ती. किती सुंदर क्रम आहे! ‘अनुराधे’ला संबंध निर्माण होतो, ‘ज्येष्ठे’ला ऐश्वर्याचा उपभोग होतो आणि मूळाला रूप पुन्हा मूळात विलीन होते. आगमन, आस्वाद आणि विसर्जन-संपूर्ण जीवनच जणू या तीन नक्षत्रांत सामावले आहे. पण, या कथेचा सर्वांत विलक्षण अर्थ श्रीसूक्ताची एक ऋचा उलगडते.
 
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्|
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्॥
 
ही ज्येष्ठा कशी आहे? क्षुत्-पिपासामला! ‘क्षुत्’ म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान. वरवर पाहता दारिद्य्रामुळे निर्माण होणारी भूक-तहान. पण, थोडे अंतर्मुख होऊन पाहिले, तर अलक्ष्मीचे अधिक भयंकर रूप दिसते. माणसाकडे दहा लाख असतात, त्याला कोटी हवी असते; कोटी आले की दहा कोटी; दहा कोटी आले की शंभर कोटी. पैसा वाढत जातो, पण ‘पुरे’ हा शब्द आयुष्यात येतच नाही. ज्याची संपत्ती वाढते आणि त्याबरोबर त्याची तृष्णाही वाढते, त्याच्या तिजोरीत लक्ष्मी असेलच असे नाही; कदाचित तिथे अलक्ष्मी बसलेली असते. म्हणून अलक्ष्मी म्हणजे केवळ फाटके कपडे आणि रिकामे घर नव्हे. भ्रष्टाचारातून आलेले कोट्यवधी रुपये, दुसर्‍याचा हक्क हिरावून उभारलेले साम्राज्य, फसवणुकीतून मिळालेले वैभव, त्यासाठी सतत लागणारे खोटे आणि त्या सगळ्यामागची कधीही न भागणारी भूक हीदेखील अलक्ष्मीचीच आधुनिक रूपे मानता येतील. पैसा भरपूर असून घरात समाधान नाही, मुलांच्या आयुष्यात सुख नाही, नात्यांत प्रेम नाही, मनात शांतता नाही आणि प्रत्येक क्षणी कमावलेले टिकवण्याची भीती आहे, तर त्याला ‘श्री’ कसे म्हणायचे? ‘धन असणे’ आणि ‘श्रीमंत असणे’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याच्या उलट श्रीसूक्त अग्नीला विनवते, ‘तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्|’ हे जातवेद, माझ्याकडे अशी लक्ष्मी घेऊन ये, जी मला सोडून जाणार नाही. अनपगामिनी-निघून न जाणारी, टिकणारी श्री. पण, अशी श्री धारण करण्यासाठी माणसाने स्वतःलाही पात्र केले पाहिजे.
 
आता महाराष्ट्रातील महानैवेद्याची परंपरा पाहा. ज्येष्ठा नक्षत्राच्या दिवशी घरातील उत्तमोत्तम पदार्थ केले जातात. कुलाचाराप्रमाणे पदार्थ बदलतील; पण आग्रह एकच, महालक्ष्म्यांना पोटभर जेवू घालायचे!
 
आणि मग मूळ नक्षत्र येते. दोन दिवस ज्या महालक्ष्म्यांना लेकींसारखे नटवले, त्यांची पाठवणी होते. पण, इथेही लोकपरंपरेने किती सुंदर संकेत जपला आहे! विसर्जनाच्या ठिकाणची, देवीच्या स्पर्शाने पावन झालेली थोडी वाळू पुन्हा घरात आणली जाते. देवी गेली; पण तिचे मांगल्य घरातून जाऊ द्यायचे नाही. अलक्ष्मीचे विसर्जन करायचे आणि श्रीचे पुनःस्थापन करायचे. स्थूल रूप पाण्यात विलीन होते; श्रीतत्त्वाचा अंश पुन्हा घरात येतो. म्हणून महाराष्ट्रातील या महालक्ष्म्या मला केवळ तीन दिवसांचा सण वाटत नाहीत. त्या वर्षातून एकदा घरात येऊन एक प्रश्न विचारतात, तुमच्या घरात पैसा आहे; पण ‘श्री’ आहे का? तुमच्याकडे संपत्ती आहे; पण समाधान आहे का? भोजन आहे; पण तृप्ती आहे का? वैभव आहे; पण शुचिता आहे का? कमाई आहे; पण तिच्यामागे धर्म आहे का? आणि कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी दोन बहिणींना एकत्र घरात आणले. एकीला स्वीकारून दुसरीचा अपमान केला नाही. दोघींना नमस्कार केला, दोघींना भोजन दिले; पण निरोप देताना मनात एवढीच प्रार्थना ठेवली, "ज्येष्ठे, आमच्या घरातील क्षुत्-पिपासा, मालिन्य आणि असमृद्धी घेऊन समाधानाने जा; आणि हे कनिष्ठे, तुझी श्री, तुझी पुष्टी, तुझी तृप्ती आणि तुझे मांगल्य मात्र या घरात अनपगामिनी होऊन सदैव नांदो!” यापेक्षा सुंदर संपत्तीशास्त्र आधुनिक अर्थशास्त्रालाही सांगता येणार नाही!
 
-आसावरी पाटणकर




संबंधित मजकूर