मुंबई (Kamathipura Cluster Redevelopment) : मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत (MBRRB) राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी भागीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत कॉन्स्ट्रुकशन & डेव्हलपमेंट एजेन्सी (C&DA) करार करण्यात आला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. (Kamathipura Cluster Redevelopment)
सुमारे ३४ एकर क्षेत्रात, गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये हा समूह पुनर्विकास प्रकल्प प्रस्तावित आहे. यामध्ये सुमारे ४७५ उपकरप्राप्त आणि २५९ बिगर-उपकरप्राप्त इमारतींचा समावेश असून, सुमारे ८,००१ निवासी व व्यावसायिक भाडेकरू आणि रहिवासी तसेच सुमारे ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी संबंधित आहेत.
DCPR-2034 मधील विनियम 33(9) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिका देण्यात येणार असून, व्यावसायिक गाळेधारकांच्या पुनर्वसनाचीही तरतूद आहे. (Kamathipura Cluster Redevelopment)
पुनर्विकासातून म्हाडासाठी सुमारे ४४ हजार चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, त्यातून सुमारे ९०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिका प्रस्तावित आहेत. नव्या विकासात निवासी व व्यावसायिक क्षेत्रांसह सार्वजनिक सुविधा, खुल्या व हिरव्या जागा, अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक नागरी सुविधांचा समावेश असेल. (Kamathipura Cluster Redevelopment)
दरम्यान, पुनर्विकास काळात रहिवाशांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे व पुढील एक वर्षाचे धनादेश देण्यास तसेच स्थलांतरासाठी ₹२५ हजार एकरकमी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. बिगरनिवासी गाळेधारक आणि जमीनमालकांसाठीही स्वतंत्र भाडे तरतुदी करण्यात आल्या आहेत. या करारामुळे कामाठीपुरा पुनर्विकासाने नियोजनातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले असून, ऐतिहासिक परिसराच्या पुनर्विकासाला आता वेग मिळणार आहे.
सी अँड डीए करारामुळे कामाठीपुराच्या पुनर्विकासाने नियोजनाच्या टप्प्यातून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांचे सुरक्षित, सन्मानजनक आणि आधुनिक जीवनमान हे या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असून, कामाठीपुराची ऐतिहासिक ओळख जपत येथे आधुनिक, शाश्वत आणि नागरिककेंद्रित परिसर उभारण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून हा प्रकल्प पुढे नेला जाईल. - संजीव जयस्वाल, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (Kamathipura Cluster Redevelopment)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.