‘मृत्यूचक्र’चे नवे पोस्टर प्रदर्शित...!

    18-Sep-2026
 
 
mrutyu
 
 
मुंबई - Akshaya Gurav जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य मानले जाते. भारतीय तत्त्वज्ञानात मृत्यू हा शेवट नसून एका चक्राचा भाग असल्याची संकल्पना प्राचीन काळापासून मांडली जाते. कर्मानुसार जन्म-मृत्यूची पुनरावृत्ती होत राहते आणि या चक्रातून मुक्ती मिळवणे म्हणजे मोक्ष, अशी धारणा आहे. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक कृतीचा परिणाम त्याच्यावर किंवा त्याच्या पुढील प्रवासावर होत असतो, असेही मानले जाते. ‘मृत्यूचक्र’ या संकल्पनेत त्यामुळे केवळ मृत्यूची भीती नसून कर्म, नियती, पुनर्जन्म, अदृश्य शक्ती आणि मानवी अस्तित्वाचे गूढ असे अनेक पदर दडलेले आहेत. याच गूढ आणि तात्त्विक संकल्पनेला भय, रहस्य आणि मानवी भावविश्वाची जोड देत ‘मृत्यूचक्र’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे.
श्री महादेव फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर निर्मित ‘मृत्यूचक्र’ या आगामी चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. ‘मृत्यूचक्र’चे दिग्दर्शन विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू गंगावणे यांनी केले आहे. पोस्टरची रचना पाहता चित्रपटात भय आणि रहस्याचा गडद पट उलगडणार असल्याचे संकेत मिळतात. पोस्टरच्या मध्यभागी एका प्राचीन चक्रामध्ये लालसर रंगाचा ग्रह अथवा चंद्र दिसतो. या चक्राभोवती विविध व्यक्तिरेखांचे चेहरे दाखवण्यात आले आहेत. प्रत्येक चेहऱ्यामागे वेगळी कथा, वेगळे गूढ आणि कदाचित एखादे न उलगडलेले रहस्य दडलेले असावे, असा अंदाज पोस्टरवरून बांधता येतो. पार्श्वभूमीवर दिसणारी प्राचीन वास्तू, मंदिरासारखी रचना, अंधारलेले वातावरण आणि ‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली...’ ही ओळ चित्रपटातील गूढतेची कल्पना अधिक गडद करते. एका बाजूला रुग्णालयाचे दृश्य तर दुसरीकडे भयावह वातावरण दिसत असल्याने आधुनिक वैद्यकीय जग आणि अज्ञात शक्ती यांच्यातील संघर्षाची किनारही कथानकाला असण्याची शक्यता आहे. मृत्यूच्या घटनांमागे नेमके कोणते रहस्य आहे, या प्रश्नाभोवती चित्रपटाची कथा फिरत असावी, असा संकेत पोस्टर देत आहे.Akshaya Gurav
या चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, संजय शेजवळ, शलाका गाडे, शरा गायकवाड, जितेंद्र पोळ, अनिल रबाळे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. कथा डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद विलास वाघमोडे आणि डॉ सुधीर निकम यांचे आहेत. रोहन शहा या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असून जयेश मिस्त्री यांच्या यूजेएम नेटवर्क्स अँड एंटरटेनमेंट एलएलपीच्या माध्यमातून या चित्रपटाचे वितरण संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहे. डिओपी निशांत भागवत या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर, तर राहुल भातणकर संकलक आहेत. संगीत व पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांनी दिलं असून, गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या गीतरचना सुहास सावंत आणि शमिका भिडे या गायकांनी गायल्या आहेत. मयूर पवार प्रोडक्शन डिझायनर असून कला दिग्दर्शन कुणाल वेदपाठक, वेशभूषा किर्ती जंगम जोशी आणि रंगभूषा संतोष गायके यांनी केली आहे. Akshaya Gurav
 




संबंधित मजकूर