बाष्कळपणा आणि असंबद्धतेने भरलेल्या उद्धव ठाकरेंच्या कालच्या मराठवाडा मुक्तिदिनानिमित्तच्या भाषणात नेहमीप्रमाणे काहीही ठोस मुद्दे नव्हते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याची पाणीटंचाईची समस्या कायमची संपविण्यासाठी सुरू असलेल्या उपायांची माहिती दिली. पण, मराठवाड्यासाठी आणि तेथील शेतकर्यांसाठी आपण केलेले एकही ठोस काम ठाकरे सांगू शकले नाहीतच. शिवाय मराठवाडा मुक्तिदिनाबद्दल बोलताना निजामच्या रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचाराबाबतही ठाकरेंनी सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे मराठवाड्याचा विकास असेल अथवा हिंदुत्वाचा पुरस्कार, ‘तुमसे ना हो पाया, उद्धवजी!’ असेच म्हणावे लागेल.
मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये काल दोन नेत्यांची भाषणे झाली. एक राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पण, या दोन्ही नेत्यांच्या भाषणांच्या विषयात आणि मांडणीत टोकाचा फरक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण हे विषयाला धरून आणि मराठवाड्याच्या समस्यांची जाणीव ठेवणारे होते. इतकेच नव्हे, तर मराठवाड्याच्या समस्यांवर आपले सरकार कोणते उपाय योजत आहे, त्याची त्यांनी सविस्तर माहितीही दिली. मराठवाड्याच्या पाणीटंचाईच्या समस्येवर उल्हास नदीचे पाणी गोदावरी नदीच्या खोर्यात आणून ही टंचाई कायमस्वरूपी संपविण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही त्यांनी सांगितली. याशिवाय, मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरच्या विकासाच्या अनेक योजनांची व तेथे विकसित होणार्या औद्योगिक प्रकल्पांची माहिती फडणवीसांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात दिली. त्यांच्या भाषणात एकही राजकीय विषय आला नाही. उलट, उद्धव ठाकरेंना मराठवाड्यासाठी त्यांच्या सरकारने केलेले एकही काम सांगता आले नाही आणि राजकारण (तेही भंपक व असंबद्ध) सोडून त्यांच्या भाषणात दुसरा मुद्दाच नव्हता. ते अर्थात अपेक्षितही होते म्हणा!
उद्धव ठाकरेंचे भाषण नेहमीसारखेच बाष्कळ, पोकळ आणि विस्कळीत झाले. खरे तर निमित्त होते, मराठवाडा मुक्तिदिनाचे. पण, उद्धव ठाकरे आले त्यांच्या गटाने आयोजित केलेल्या शेतकर्यांच्या एका धरणे आंदोलनासाठी. एरव्ही मराठी मतदारांच्या मतांसाठी मराठी अस्मितेचा विषय उठविणार्या ठाकरे यांच्या या धरणे आंदोलनाचे नावही हिंदीत. आंदोलनाचे नाव काय, तर म्हणे ‘तुमसे ना हो पाएगा!’ खरे म्हणजे, राजकारण हा विषयच उद्धव यांच्यासाठी ‘तुमसे ना हो पाएगा’ गटातील आहे. एरव्हीही भाषण करताना आपल्याला कशासाठी आणि कोणत्या विषयावर बोलायचे आहे, हे त्यांना ठावूकच नसते. मनात त्या क्षणी जो विचार येतो, ते तो व्यक्त करतात. पुढच्या वाक्याचा आणि विषयाचा, बरेचदा तर शाब्दिक कोट्यांचाही आधीच्या वाक्याशी वा विचारांशी कसलाही संबंध नसतो. भाषणाप्रमाणेच त्यांचे राजकारणही असेच अनेक विसंगतींनी भरलेले असते.
मारून मुटकून नेता झालेल्या उद्धव ठाकरेंना इतक्या वर्षांनंतरही कुठे आणि काय व कसे बोलावे, याचा पोच नाही. मराठवाड्यातील शेतकर्याच्या समस्यांचा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा काय संबंध? पण, आज अचानक ठाकरे यांना मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची आठवण झाली. या अपघाती मृत्यूला इतक्या वर्षांनी एकाएकी ‘संशयास्पद’ ठरविण्याचा त्यांनी केलेला उपद्व्याप त्यांच्या मनातील भयगंडाचेच द्योतक म्हणावे लागेल. मुंबईत दिशा सालियन या सेलिब्रिटी व्यवस्थापिकेच्या संशयास्पद मृत्यूशी आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले जात असून, ‘सीबीआय’तर्फे या गोष्टीचा तपास सुरू आहे. या संकटाचे जणू मानसिक दडपण उद्धव ठाकरेंवर आले असावे, असे वाटते. म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचा संशय घेण्यापर्यंत ते घसरले. मात्र, हा संशय कशामुळे येत आहे, त्यावर एक शब्दही ते बोलले नाहीत. हे त्यांच्या नेहमीच्याच ‘टपली मारून पळून जा’ पद्धतीच्या आरोपी राजकारणाशी जुळणारे. पण, भाजपच्या एका नेत्याच्या मृत्यूबाबत मुद्दाम असे संशयाचे मोहोळ उठवून द्यायचे, हाच त्यांचा सुप्त हेतू असावा.
उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठीही सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पण, मुळात मराठा समाजाला फडणवीस सरकारने मिळवून दिलेले आरक्षण मविआ सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकविता आले नव्हते, याबद्दलही उद्धव ठाकरेंनी तितक्याच मनमोकळेपणे जनतेला सांगायला हवे होते. आता ते मनोज जरांगे-पाटील यांना आणि अभिजीत दीपके यांना पाठिंबा जाहीर करीत आहेत. त्यांचा उबाठा गट हा आता एका शहरापुरताही प्रभावी राहिलेला नसल्याने उद्धव ठाकरेंना आता राजकारणात संदर्भहीन न होण्यासाठी इतर पक्षांच्या राजकारणाची शेपटी पकडावी लागते आहे, हेच खरे!
ठाकरेंचा भंपकपणा इतक्यापुरताच मर्यादित नव्हता. ठाकरेंनी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी हैदराबादचा तत्कालीन संस्थानिक निजामाशी झालेल्या सशस्त्र लढ्याचा उल्लेख केला खरा. पण, त्यात त्यांनी निजामाचे पोलीस असलेल्या रझाकारांनी त्या संस्थानातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचा उल्लेख सपशेल टाळला. उद्धव ठाकरे अजूनही स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवून घेतात. पण, हिंदुत्व कशाशी खातात, ते त्यांना ठावूकच नाही. त्यांनी शेतकर्यांच्या आत्महत्यांबाबत सरकारवर टीका करताना विनाकारण हिंदुत्वावर टांगा झाडल्या. म्हणे त्यांचे (म्हणजे भाजप सरकारचे) हिंदुत्व हे पंचांगांचे आहे! सरकारने शेतकर्याच्या आत्महत्यांच्या पंचनाम्यासाठी दि. ५ ऑक्टोबरचा ‘मुहूर्त’ काढला आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांना हिंदुत्वाचा इतकाच अभिमान आहे, तर निजामाच्या रझाकारांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचा आणि निरपराध हिंदूंच्या हत्याकांडांचाही उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात करायला हवा होता. पण, तसा तो करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. कारण, मुस्लीम मतपेढीची लालसा! मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम या रझाकारांच्या अत्याचारांशी घट्टपणे जोडला गेला आहे. त्याशिवाय, मराठवाड्यात उद्धवसेनेच्याच चंद्रकांत खैरे या ज्येष्ठ नेत्याचा पराभव करून ‘एमआयएम’चा उमेदवार इम्तियाज जलील हा खासदारही बनला, याचीही खंत उद्धव ठाकरेंना वाटत नाही. वास्तविक, मुंबई-ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरने कायमच शिवसेनेला साथ दिली आणि त्या पक्षाचे उमेदवारही निवडून दिले. पण, वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही ठाकरेंनी मराठवाड्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णयही त्यांनी आपल्या सरकारचे बहुमत गेल्यावर घेतलेल्या एका बेकायदा कॅबिनेट बैठकीत घेतला होता. पण, त्या विभागाची एकही समस्या ठाकरे यांनी सोडविली नाही. एकूणच काय तर निवडणूक प्रचार वगैरे सोडल्यास ठाकरे फारसे मराठवाड्यात फिरकले नाहीत. म्हणूनच आता जनतेने त्यांना साफ नाकारले आहे. उलट, मराठवाडा आज फडणवीसांच्या, महायुतीच्या मागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या राजकारणाबाबत उद्धव ठाकरेंना इतकेच सांगता येईल की, ‘तुमसे ये ना हो पाया और ना ही हो पाएगा, उद्धवजी!’