
मुंबई - Nikhil Chavanअध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शन यांची अनोखी सांगड घालणारा ‘देवघर ऑन रेंट’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटात रहस्य आणि थरारासोबत भावनिक पदरही पाहायला मिळणार असून, ‘देवघर’ आणि ‘रेंट’ या दोन शब्दांमागे दडलेले गूढ नेमके काय, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची थरारक झलक पाहायला मिळत आहे. ‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे.
आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित ‘देवघर ऑन रेंट’ची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शनाची धुरा स्वरूप सावंत यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची असून कथा-पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. ट्रेलरच्या सुरुवातीपासूनच चित्रपटाच्या गूढ वातावरणाची जाणीव होते. अर्थपूर्ण संवाद उत्सुकता वाढवतात. पोलीस तपास, संशयास्पद घटना, संघर्ष आणि व्यक्तिरेखांमधील तणाव यामुळे कथानक अधिकाधिक उत्कंठावर्धक होत जाते. पोलीस अधिकारी, गुन्हेगारी जगत आणि एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटनांची गुंफण ट्रेलरमध्ये दिसते. ॲक्शन दृश्यांना विशेष महत्त्व देण्यात आले असून, पाठलाग, हाणामारी आणि संघर्षाची झलकही पाहायला मिळते. त्याचवेळी देवघराच्या परिसरातील गूढ वातावरण, आध्यात्मिक संदर्भ आणि अनाकलनीय घटनांमुळे हा केवळ ॲक्शनपट नसून रहस्याच्या वेगळ्या वाटेवर घेऊन जाणारा चित्रपट असल्याचे संकेत मिळतात. नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या कथानकाला ॲक्शनची प्रभावी जोड देण्यात आली असून, दाक्षिणात्य शैलीच्या ॲक्शनमुळे चित्रपटाचा आवाका अधिक भव्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.Nikhil Chavan
या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील यांच्या भूमिका असून 'केजीएफ'फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील अर्थपूर्ण गीतांना सुमधूर स्वरसाज चढवला असून, कोरीओग्राफी किशोर दळवी यांनी केली आहे. डिओपी चैतन्य साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, रोहित नागभीडे यांनी पार्श्वसंगीत केले आहे. चित्रपटातील ॲक्शन सीक्वेन्सची जबाबदारी राकेश पाटील आणि कार्तिक डंगरी यांनी घेतली आहे. कला दिग्दर्शनाचे काम दिलीप कंधारे यांनी पाहिले आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांनी, तर रंगभूषा सुजीत सुरवसे यांनी केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते अनुनेहा घोडके आणि निर्मिती व्यवस्थापक यश सणस आहेत. अक्षय लोणदे यांनी सिंक साऊंड, शर्मा यांच्या टिमने प्रकाश योजना आणि विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे. Nikhil Chavan