
मुंबई - meghana erande Konkanगणपती बाप्पाशी असलेलं नातं हे मेघना एरंडे यांच्या आयुष्याचा लहानपणापासूनच एक सुंदर भाग राहिलं आहे. एरंडे कुटुंबात बालपणी अनुभवलेला गणेशोत्सव, लग्नानंतर जोशी कुटुंबात जपलेल्या परंपरा आणि आता ‘सनई चौघडे’ मालिकेतून परब कुटुंबाचा गणेशोत्सव अनुभवण्याचा मिळालेला योग, असा त्यांच्या गणेशोत्सवाचा सुंदर प्रवास आहे. बाप्पासोबतचं हे नातं त्यांच्यासाठी श्रद्धेपलीकडचं असून एका जिवलग मित्रासारखं आहे. यंदाच्या कोकणातील गणेशोत्सवाच्या चित्रीकरणाने या नात्यात आणखी एका खास आठवणीची भर पडली.
आपल्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि बाप्पासोबतच्या या खास नात्याबद्दल सांगताना मेघना एरंडे-जोशी म्हणाल्या, “यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण आतापर्यंत मी फक्त एरंडे आणि जोशी हे दोनच गणेशोत्सव साजरे करत होते. पण या वर्षीपासून परबांचा गणेशोत्सवही साजरा करणार आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून एरंडे कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जातो. मी घरातली सगळ्यात लहान मुलगी असल्यामुळे गणपती आल्यावर मला प्रसाद वाटपाचं छोटं काम दिलं जायचं. लग्न होऊन जोशी कुटुंबात आल्यानंतर स्वयंपाकापासून गणेशोत्सवातील इतर सगळ्या गोष्टी करायला शिकले. आता मला गणपती स्थापनेची थोडीफार पूजा देखील सांगता येते. गणेशोत्सव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण यावर्षी आम्ही परब कुटुंबीय म्हणून कोकणातला गणेशोत्सव पहिल्यांदा अनुभवला. अर्थात, गणपती बसण्याच्या आधीच आमचं शूटिंग झालं होतं, त्यामुळे मला तो पूर्ण फील अनुभवता आला. याआधी मी कधीच कोकणात गेले नव्हते. ‘सनई चौघडे’मध्ये ज्या प्रकारे हा सगळा गणेशोत्सव पुन्हा उभा केला गेला, ते खूप सुंदर होतं. हरतालिकेपासून गौरीपर्यंत सगळंच त्यात आहे. तुम्ही ते मालिकेत प्रत्यक्ष बघालच. कोकणात झालेल्या गणेशोत्सवाच्या या शूटिंगमुळे माझा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. meghana erande Konkan
माझ्या गणेशोत्सवाच्या खूप छान आठवणी आहेत. वयाच्या सातव्या वर्षी माझा पहिला पब्लिक परफॉर्मन्स गणेश मंडळाच्या स्टेजवर झाला होता. तिथून आज ३८ वर्षांचा माझा प्रवास झाला आहे. यावर्षी मला जोशी गणपती, एरंडे गणपती आणि परब गणपतीची आरती करता आली, याचा मला खूप आनंद आहे. त्याचबरोबर आणखी एक खास गोष्ट म्हणजे ‘झी मराठी’च्या ‘उत्सव गणेशाचा’ या कार्यक्रमाला मी आतापर्यंत व्हॉइस ओव्हर दिला आहे. पण यावर्षी मला निवेदिता सराफ आणि हर्षदा खानविलकर यांच्यासोबत तिथे देवाची आरती करता आली आणि त्यांच्या बरोबर उभं राहण्याचा मान मिळाला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, ज्या ज्या गोष्टींची मी स्वप्नं पाहिली, त्या त्या गोष्टी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझ्यासाठी सत्यात उतरत आहेत. म्हणूनच यावर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास असल्याचं मेघना म्हणाली. meghana erande Konkan