चंदन स्वतः झिजते, पण परिसराला सुगंध देत राहते; काही माणसेही अशीच असतात. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी खर्ची पडलेला असतो. कै. महेश्वर (तात्या) रायकर यांचे जीवन म्हणजे संघसंस्कार, सहकार, समरसता आणि माणुसकीच्या मूल्यांचा असा अखंड प्रवास, ज्याने असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सहजता, तेज आणि आत्मीयता आजही अनेकांच्या स्मृतीत जिवंत आहे.
मराठी रंगभूमीवरील सूर्यकांत यांच्यासारखे देखणे व्यक्तिमत्व लाभलेले तात्या रायकर यांच्या अनंत आठवणी आज आपल्यासोबत आहेत. सर्वगुण संपन्न व्यक्ती कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तात्या रायकर. सगळेजण त्यांना प्रेमाने ‘तात्या’ म्हणत, पण त्यांचे पूर्ण नाव कै. महेश्वर रायकर. सहकार आणि बँकिंग क्षेत्रात असलेले त्यांचे काम आणि त्यासंबंधीच्या विविध विषयांवर त्यांच्या आपल्या परिचितांसोबत नेहमी चर्चा व्हायच्या.
१९५० सालचा त्यांचा जन्म. त्यांच्या पत्नी शिक्षिका होत्या आणि तात्या सहकार खात्यात नोकरीला होते. नियमित व्यायाम, योग्य संतुलित घरचा आहार, आपल्याच विहिरीचं स्फटिकासारखं निर्मळ पाणी आणि बागेतील सुमधुर शहाळी खात जगलेले त्यांचे सहजीवन अत्यंत सुंदर होते. तात्या नियमित योगासने करत. त्यांच्या प्रार्थना आणि ध्यानधारणेच्या वेळेत कोणी भेटायला आले, तर वेटींगसाठी बसून राहावे लागे. तेवढ्या वेळात त्यांच्या टेबलावर असलेले ‘साप्ताहिक विवेक’, ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, ‘विवेकानंद चरित्र’ किंवा संस्कृत पुस्तिका असे बरेच साहित्य वाचायला मिळे.
तात्या बाल स्वंयसेवक असल्यापासून त्यांचा संघाशी परिचय होता. सुरुवातीला माधव ठाकूर यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचे संघकाम सुरूच राहिले. आणीबाणी काळात धरपकड सुरू असताना कधी भूमिगत राहून तर कधी चळवळ घट्ट करत त्यांनी शाखा, संपर्क सुरूच ठेवले. कोकणातून कारसेवेला जाणारी टीम उभी करण्यात तात्या यांचे नाव अग्रस्थानी राहिले. संघस्वयंसेवकांच्या घरी प्रवास करून त्यांच्या संपर्कात राहणे हे तात्यांच्या दिनचर्येतील एक कार्यच होते.
तात्या उत्तम नकलाकारही होते. एखाद्या माणसाची चालण्याची-बोलण्याची लकब ते पटकन टिपत असत. पंचद्रविड बँकेच्या विस्तारामध्ये आणि तिच्या यशात तात्यांचा सिंहाचा वाटा आहे. सौरभ जोशी यांच्या प्रचारक निरोप समारंभ कार्यक्रमात त्यांनी केलेले भाषण अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. "एखाद्या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या माणसाला 'तू दहावी किंवा बारावी पास झालास, तुझे अभिनंदन' असे म्हणायची गरज नसते. 'प्रचारक' हा असा ब्रँड आहे, ज्याला इतर कोणत्याही कुबड्यांची गरज नसते!" इतक्या सुंदर आणि स्पष्ट शब्दांत तात्यांनी आपले मत मांडले होते.
'महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ' यांच्याकडून 'जीवन गौरव' स्वीकारणारे तात्या रायकर आणि काकू रायकर हे एकमेकांना अत्यंत पूरक असे जोडपे होते. त्यांच्या पश्चात, त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या संमेलन मंचाला आणि दालनाला तात्यांचे नाव देण्यात आले. तात्यांच्या दोन्ही कन्याही अतिशय हुशार असून त्या साहित्य, कला, व्यापार आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.
समरसता विषय असलेल्या एका कार्यक्रमात तात्या आणि इतर काही प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. इतर पाहुणे उद्घाटन आणि भाषणे करून निघून गेले, पण तात्यांनी मात्र त्या वाडीत मांडी घालून पंगतीला बसून जेवण केले. त्यांच्या या एका साध्या कृतीने प्रेरित होऊन त्या वाडीतील अनेक माणसे संघ स्वयंसेवक झाली. अजूनही ते संघाशी जोडलेले आहेत.
तात्या रायकरांसारखी माणसे अतिशय दुर्मिळ असतात. अखेरच्या श्वासापर्यंत अशी माणसे चंदनासारखी झिजत राहतात. तात्यांच्या सुगंधी आठवणी संघ वर्तुळात आणि समाजमनात कायम दरवळत राहतील. २०२० मध्ये तात्या देहरूपाने आपल्याला सोडून गेले असले, तरी त्यांनी मायेने दाखवलेल्या वाटेवरच आपण सर्व मार्गक्रमण करत आहोत.