‘गौरव मोरे बौद्ध आहात ना आणि गणपती बसवला असेल, तर कृपया बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात ठेवू नका; आमच्या बाबासाहेबांचा अपमान करू नका!’ सोशल मीडियावर गौरव मोरे या कलाकाराला काही लोकांनी ट्रोल केले. यापूर्वीही भाऊ कदम या कलाकरालाही अशाच प्रकारे घरगुती गणपतीवरुन ट्रोल करण्यात आले होते. ही अशी विधानं करणार्या व्यक्तींची तुलना केवळ आणि केवळ अल्लाला न मानणारे ‘काफीर’ असून ते या जगातून संपवले पाहिजेत, असा विचार असणार्या व्यक्तीसेाबतच होऊ शकते. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे लोक कलंक आहेत. हे लोक दुसर्या धर्माचा दुस्वास करतात; अपमान करतात. द्वेष, तिरस्कार, मत्सर करणार्या या लोकांची तथागत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचीही खरं तर लायकी नाही.
असो. काहीही म्हणा, काही वर्षांपासून अशा विकृतांची संख्या वाढली आहे. बौद्ध समाजाच्या व्यक्तीने श्रद्धा म्हणून गणेशोत्सव साजरा केला की, हे लोक झुंड बनवून त्या व्यक्तीला त्रास देतात. लोकशाहीच्या संविधानयुक्त राज्यात त्या व्यक्तीवर बहिष्कार करण्याची भाषा करतात. का? तर त्या व्यक्तीने कुणाची पूजा करावी किंवा कुणावर श्रद्धा ठेवावी, हा त्याला अधिकार नाही का? हा अधिकार नाकारून ते संविधानाचा आणि प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करतात. हेच लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचाही उल्लेख करतात. पण, या प्रतिज्ञांपैकी किती प्रतिज्ञा हे ट्रोल करणारे लोक पाळत असतील? याचे उत्तर नकारात्मकच. दुसरे असे की, आपण बौद्ध आहोत, म्हणून गणेशपूजन करू नये, असे धमकावणार्यांना माहीत नाही का, की रसिक जनतेने गौरव मोरेला कलाकार म्हणून स्वीकारले आहे, जात-पात पाहून नाही. या पार्श्वभूमीवर देवदेवतांची निंदा, द्वेष करून तथागत किंवा बाबासाहेबांच्या विचारांचे संवर्धन होणार नाही. समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांपैकी मोठा प्रश्न आहे धर्मांतरणाचा. आज वस्तीपातळीवर समाजात धर्मांतरणाचे प्रमाण वाढत आहे. धर्मांतरण करून ख्रिस्ती होणार्या समाजबांधवांना २२ प्रतिज्ञांचा हवाला देऊन, त्यांचे धर्मांतरण रोखण्याचा प्रयत्न केला आहे का? एकूणच काय तर, दुसर्यांचा मत्सर, द्वेष करून धर्म वाढत नसतो. त्यासाठी माणुसकी सांगणारा धर्म जगला पाहिजे!
डेटिंग अॅपचा नंबर कधी?
मुंबईत नुकताच एक गुन्हा दाखल झाला. दोघी बहिणी. त्यातली एक अल्पवयीन. ‘टिंडर’ या डेटिंग अॅपवरून दोघींची ओळख दोन पुरुषांशी झाली. त्यांना भेटण्यासाठी या दोघी नवी मुंबईमध्ये गेल्या. तिथे त्यांना धोक्याने बिअर पाजण्यात आली आणि त्यांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले गेले. मध्यरात्री कशाबशा त्या घरी आल्या आणि त्यानंतर पालकांच्या मदतीने त्यांनी पोलीस तक्रार नोंदवली. हे सगळे अत्यंत संतापजनक होते. मन नेहमीच नियमांच्या चौकटीत जुळत नाही, हे सत्य. पण, आभासी दुनियेत, कल्पनेच्या बाजारात खरे प्रेम आणि निर्मळ नाती शोधणे, गेला बाजार लैंगिक सुखाचा शोध घेणे यापेक्षा दुसरा कोणताही आत्मघातकीपणा नाही. या आभासी खेळात अनेकजणींचा बळी जातो.
वरील घटनेत दोघी सख्ख्या बहिणी. लहान बहीण ही मोठ्या बहिणीचे वागणे पाहून शिकते, असे म्हणतात. इथे मोठी बहीण आणि धाकटी बहीण अशा दोघीजणी मिळून नवी मुंबईत त्यांच्या ‘टिंडर’वर ओळख झालेल्या मित्रांना भेटायला गेल्या होत्या. याचाच अर्थ दोन्ही बहिणींना एकमेकींच्या डेटिंगबद्दल माहीत होते. पण, दोघी बहिणी डेटिंग अॅप वापरत आहेत आणि त्यांना कुणी तरी भुलवतंय, त्या भूलथापांना मुली बळी पडत आहेत, हे पाहणारे त्या कुटुंबात कुणीच नव्हते? आज-काल आईबाबा देाघेही कामाला जातात किंवा मुलांना ‘प्रायव्हसी’ देणे आजकाल सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे मुलंमुली मोबाईलमध्ये नक्की काय करतात, हे त्यांच्या आईबाबांना कळणे कठीणच. पण, असे का? मोबाईल आईबाबांच्या पैशातून, मोबाईल रिचार्ज आईबाबांच्या पैशातून, छानछोकीचे अय्याशी राहणीमान आईबाबांच्या पैशातून; मात्र त्या आईबाबांचा मुलामुलींवर कोणताच हक्क नाही? ‘तुझ्या मोबाईलचा पासवर्ड सांग,’ असं विचारल्यावर आईबाबांना वाट्टेल ते बोलून स्वतःच फुगून बसणारी मुलंमुली चार घरं सोडून आहेतच आहेत. प्रेम, माया याचबरोबर शिस्त आणि मर्यादित स्वातंत्र्याचे संस्कार आईबाबांनीच मुलांना द्यायला हवे. या पार्श्वभूमीवर वाटते की, अनेक अॅप्सवर सरकारद्वारे निर्बंध आणण्यात आले आहेत; मग या अशा डेटिंग अॅपचा नंबर कधी येणार?
९५९४९६९६३८