मुंबई (Aprajita Parang La 2026) : राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (एनसीसी) बालिका कॅडेट्सनी साहसी उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेली ‘अपराजिता – परांग ला २०२६’ ही उच्च हिमालयीन ट्रेक मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. या यशस्वी मोहिमेनंतर लडाखमधील करझोक येथे एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स आणि संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव दीप्ती मोहिल चावला यांनी कॅडेट्सचे स्वागत केले. या मोहिमेत देशभरातून निवडण्यात आलेल्या २० एनसीसी बालिका कॅडेट्सनी हिमाचल प्रदेशातील स्पीती खोरे आणि लडाखच्या चांगथांग प्रदेशाला जोडणारा ५,५७८ मीटर उंचीवरील परांग ला खिंड यशस्वीरीत्या पार केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या पथकाने सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास ३० दिवसांत पूर्ण केला. ग्लेशियर, बर्फाच्छादित मैदाने, नदीखोऱ्या आणि अतिउंच पर्वतीय भागातून मार्गक्रमण करत त्यांनी हिमाचल प्रदेशातील किब्बर ते लडाखमधील करझोक हा अत्यंत आव्हानात्मक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. या मोहिमेत अधिकारी, प्रशिक्षक, वैद्यकीय कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. दि. १८ ऑगस्ट रोजी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. (Aprajita Parang La 2026)
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी मोहिमेच्या यशस्वी समारोपाबद्दल कॅडेट्सचे अभिनंदन केले. अशा साहसी उपक्रमांमुळे युवक-युवतींमध्ये नेतृत्व क्षमता, आत्मविश्वास, संघभावना आणि सहनशक्ती विकसित होण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. या ट्रेकचे आयोजन युवा महिलांना साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना उच्च हिमालयीन आव्हानात्मक परिस्थितीचा अनुभव देणे, या उद्देशाने करण्यात आले होते. तसेच देशाच्या विविध भागांतील कॅडेट्सना एकत्र आणून राष्ट्रीय एकतेची भावना अधिक बळकट करणे हाही या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश होता. (Aprajita Parang La 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक