_202609161036543220_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या इतिहासात पाच सरसंघचालक होऊन गेले. त्यातील पाचवे सरसंघचालक म्हणजे कुप्पहल्ली सीतारामय्या सुदर्शन. दि. १५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानिमित्ताने सुदर्शनजींची शिकवण, त्यांचे कार्यविचार यांचा मागोवा घेऊन, त्यांच्या स्मृतींचे पुण्यस्मरण करणारा हा लेख...
तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आरोग्याच्या कारणास्तव सरसंघचालकपदाचा त्याग करून नवीन प्रथा सुरू केली. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये जबाबदार्या बदलणे, हे इतके सहजपणे आणि कुठलाही अभिनिवेश न ठेवता घडत असते. सुदर्शनजीही त्याला अपवाद राहिले नाहीत. २००० साली तत्कालीन सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह तथा रज्जूभैया यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सुदर्शनजी यांना पाचवे सरसंघचालक म्हणून नियुक्त केले व सहजपणे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये ते काम करायला लागले.
दि. १८ जून १९३१ रोजी सध्याचे राज्य छत्तीसगढ, परंतु त्या काळामध्ये मध्य प्रदेशमधील रायपूरमध्ये त्यांचा जन्म झाला; त्यांचे पूर्ण नाव कुप्पहल्ली सीतारामय्या सुदर्शन. कर्नाटक के. मंड्या जिल्ह्यातील ‘कुप्पीहळी’ हे त्यांचे वडिलोपार्जित गाव. त्यांचे वडील सीतारामय्या वनविभाग कार्यरत होते. नोकरीतील बदलीनिमित्त ते मध्य प्रदेशमध्ये राहिले. रायपूरमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या नवव्या वर्षी ते संघ शाखेत जाऊ लागले. अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच, संघातील विविध जबाबदार्या त्यांनी सांभाळल्या. हिंदू संघटन हे राष्ट्रकार्य आहे, हे त्यांच्या मनाने स्वीकारले आणि त्यात ते रमले. सागर युनिव्हर्सिटी जबलपूरमधून ‘बी.ई’ पदवी संपादन केल्यावर वयाच्या २३व्या वर्षी प्रचारक जीवनाचा त्यांनी स्वीकार केला व पुढील सर्व जीवन या कार्याला समर्पित केले.
१९५४ मध्ये सुदर्शनजींनी संघ प्रचारक म्हणून जीवनाची सुरुवात केली, ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. १९६४ मध्य भारताचे ते प्रांत प्रचारक झाले. स्वतःच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे त्यांनी मध्य प्रदेशमध्ये संघाचे काम वाढवले.
सुदर्शनजींची स्मरणशक्ती ही अफाट होती व एकदा परिचित झालेली व्यक्ती ते कधीही विसरत नसत. अशा प्रकारे सुदर्शनजींनी आत्मीयतेने जोडलेले अनेक स्वयंसेवक आजही त्यांचे आवर्जून स्मरण करतात. पण, केवळ संघातच नव्हे, तर संघाबाहेरील व्यक्तींबरोबर त्यांचे आत्मीयतेचे संबंध होते. त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते श्रीपाद डांगे यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. मुझफ्फर हुसेन हे एका अर्थाने स्वयंसेवक होते; परंतु प्रख्यात लेखक व हिंदुत्वाचा विषय मांडायचे, म्हणून देशभरात त्यांचा प्रवास चालू असे, तरीही अगदी घरगुती संबंध त्यांनी ठेवले होते. याच काळात हिंदू-मुस्लीम संवाद यावर भर दिला; तसेच ‘राष्ट्रीय मुस्लीम मंच’च्या रचनेला चालना मिळाली. याचप्रमाणे ख्रिश्चन समाजामधील सलोखा व संवाद प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावरही त्यांनी भर दिला. एकप्रकारे राष्ट्रीय भान लक्षात ठेवून सुदर्शनजींनी घेतलेली ही भूमिका होती.
‘अजातशत्रू’ म्हणायला हरकत नाही, असे सुदर्शनजी होते. तत्कालीन अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री यांच्याशीही अगदी व्यक्तिगत पातळीवरती ते संपर्क ठेवत असत.
१९७५ साली आणीबाणीच्या काळात ते स्वतः स्थानबद्ध होते. ते स्वतः भाषाप्रभू होते संस्कृत, हिंदी, इंग्रजी, बंगाली, कन्नड, आसामी, पंजाबी आदी भाषांचा पूर्णपणे अभ्यास होता. स्वतः कन्नड भाषिक असले, तरी हिंदी या विषयाचे प्रबळ समर्थक होते व शुद्ध हिंदी बोलण्याचा त्यांचा आग्रह असे. बौद्धिक वर्गही ते हिंदीमधूनच घेत असत. शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे, यासाठीही त्यांचा आग्रह होता.
‘स्वदेशी जागरण मंच’ हा एक संघविचाराचा मंच. त्यातून स्वदेशीचा आग्रह आणि त्यासाठी लघू उद्योगातून, कुटिरोद्योगातून निर्माण झालेल्या वस्तू ही आपल्या जीवनात वापरात आणाव्यात, हा त्यांचा आग्रह होता. त्याचबरोबर सेंद्रीय शेती किंवा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा पुरस्कारही सुदर्शनजींनी केला. इतरांना करायला सांगायचे, ते स्वतः आवर्जून करायला हवे, हा त्यांचा आग्रहाचा विषय होता. स्वच्छता, नेटकेपणा, साधेपणा स्वतःच्या जीवनात त्यांनी तंतोतंत उतरवला होता.
पंजाब हा ८०च्या दशकात राष्ट्रीय विचारापसून दूर जात असताना परकीय शक्तीचा दबाव मोठा होता. त्यात शीख व हिंदू समाजात निर्माण होणारी दुरी लक्षात येताच, संघाच्या रचनेतून हिंदू-शीख संघर्ष होणार नाही, यासाठी सुदर्शनजींची महत्त्वपूर्ण भूमिका होती. तसेच पूर्वांचल भागात बेकायदेशीर घुसखोर आणि हिंदू निर्वासित यांविषयी देखील त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्याचा परिणाम म्हणून आजची सरकारे योग्य ती भूमिका राष्ट्रीय दृष्टिकोनातून घेऊ शकले. ‘प्रज्ञा प्रवाह मंच’च्या माध्यमातून हिंदू संस्कृती, हिंदू विचारांच्या चर्चा व प्रसरालाही त्यांनी गती दिली.
१९९० मध्ये सुदर्शनजी रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह झाले. याच काळात रामजन्मभूमी संघर्ष टिपेला पोहोचला असताना, त्यांनी विविध पद्धतीने त्या चळवळीला स्वयंसेवकांच्या माध्यमातून योजना करून अधिक सक्रिय केले. स्वतः १९९२ मधील रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनात अयोध्येमध्ये उपस्थित होते. एक प्रकारे शांत राहून सर्वांना मार्गदर्शन करत होते.
लेखकाला सुदर्शनजींचा सहवास जवळून लाभला, हे भाग्यच. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभर सेवाकार्यांचा प्रारंभ झालेला होता. किंबहुना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेवाकार्य असावे, असा आग्रह सुदर्शनजींनी केला होता व पनवेलमधील ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ने सुरू केलेल्या पटवर्धन रुग्णालयाचे उद्घाटन करत असताना, त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला. त्यांच्याबरोबर प्रवासात असताना त्यांनी हे रुग्णालय सेवा देत राहील. तसंच सर्व प्रकारच्या ‘पॅथी’ त्यात राहाव्यात, असा आग्रह केला, हे लक्षात घेण्यासारखे होते.
स्वतः सुदर्शनजी ध्यानयोगाचे साधक होते. ज्ञानाच्या बळावर तरुणांबरोबर चर्चा करत, त्यांची मने जिंकून घेत. पुण्यातील एका महाविद्यालयाच्या वर्गामध्ये जागतिक पातळीवर कोणती तत्त्वज्ञाने आर्थिक, राजकीय व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे आव्हान समोर घेऊन येत आहेत, त्यातील विचारसरणीचा सखोल चिंतनात्मक अभ्यास त्यांनी मांडला होता. भांडवलशाही, साम्यवाद, इस्लाम, तसेच ख्रिश्चॅनिटी यांनी जगात कुठेही समाजाला आर्थिक व सामाजिक स्वास्थ्य मिळवून दिलेले नाही; कारण असे तत्त्वज्ञान मुळातले नाही व त्याच्या विचारसरणीची क्षमता नाही. हे सांगत असतानाच, हिंदुत्व, ज्ञानपरंपरा, जीवनपद्धती व ज्या जीवनपद्धतीनुसार भारतामध्ये हजारो वर्षे आर्थिक साम्राज्य राजकीय स्वास्थ्य कसे होते, यांसारख्या अनेक गोष्टी त्यांनी तरुणांसमोर मांडल्या. ‘सुखी-समृद्ध, तसेच शांततामय जीवन हे सामर्थ्य आपल्या देशातच आहे,’ हे त्यांनी समोरच्या तरुणवर्गाला तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करून सोदाहरण समजून सांगितले. स्वाभाविक, याचा परिणाम निश्चितच तरुण मंडळींवर होत असे.
सुदर्शनजी स्वतः उत्कृष्ट वक्ते होते. ते तर्कसंगत विषयमांडणी करीत. त्यांच्या अनेक भाषणांपैकी आपल्या भारताचे भविष्य वर्तवणार्या एका भाषणातील काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. कदाचित, त्यांची ती भविष्यवाणी असू शकते. स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुबंधूंना १८९३, १८९४ आणि १८९५ कालावधीत आपल्या गुरुबंधूंना पत्र लिहून कळवले होते की, १८३६ साली स्वामी रामकृष्णांचा जन्म झाला. त्याचवेळी सुवर्णयुगाचा प्रारंभ झाला. त्याचसंदर्भात पुढील काळात योगी अरविंद म्हणाले की, "युगसंधीचा काळ हा १७५ वर्षांचा असतो. दिवस आणि रात्र यांमध्ये संध्याकाळ असते. रात्र आणि दिवस यांमध्ये उषःकाल होत असतो. त्याला ‘युगसंधीचा काळ’ म्हटले जाते. म्हणजेच, १८३६ अधिक १७५ वर्षे मिळवली, तर २०११ साली भारताचा भाग्यसूर्य संपूर्ण जगावर चमकायला प्रारंभ होईल व भारत संपूर्ण जगाला विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवेल व एका सूत्रामध्ये जगाला एकत्र बांधण्याचा प्रयत्न करेल. परंतु, हे होऊ दिले जाणार नाही, असा असुरी शक्तींचा प्रयत्न राहील. भारताला बदनाम किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही घाबरणारे नाही.” पुढे काव्यपंक्तीत सुदर्शनजी असं म्हणाले,
कभी एक थे हम आज हैं इतने
डरे नही तभी तो भला अब या डरेंगे
विरोधियोंके सागर में चट्टान हैं हम
टकरायेंगे तो मौत अपनी मरेंगे
लिया हात ध्वज में कभी न झुकेगा
कदम बढ रहा हैं कभी ना रुकेगा
सुरज संजोगा ना अंधेरा टिकेगा
निडर हैं तभी अमर हैं तभी हम
सर पे हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता ये भगवा हमारा॥
प्रचंड विश्वासाने मातृभूमीच्या परमश्रद्धेपोटी सुदर्शनजींनी हे म्हटले आहे आणि आज आपण बघतो, एकीकडे भारताचा नवोदय होत असताना समोर विद्ध्वंसक शक्ती आपल्या भोवती कंबर कसून उभ्या आहेत. म्हणजेच, हा काळ आपल्याला आव्हानात्मक आहे आणि त्यावेळी सुदर्शजींचे हे वाक्य आपल्याला एक विश्वास देऊन जाते.
२००५ नंतर सुदर्शनजींच्या तब्येतीचा त्रास सुरू झाला. परंतु, तिथे स्थितप्रज्ञ मानसिकतेत त्यांनी ते सर्व सहन केले. बैठकांच्या, कार्यक्रमांमध्ये त्यांनी याचा कुठेही त्रास होईल, होऊ दिला नाही; सगळं सहन केलं. २००९ साली सरसंघचालक या दायित्वातून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. वास्तविक, ज्ञानयोग व कर्मयोगाच्या बरोबर ते भक्तियोगाचे साधक होते. मातृभूमीसाठी जीवनाचा प्रत्येक कण अन् क्षण त्यांनी समर्पित केला. दि. १५ सप्टेंबर २०१२ सकाळच्या वेळात त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जन्मगावीच त्यांनी महाप्रयाण केले. अशा या महापुरुषास माझी विनम्र आदरांजली!
- प्रदीप पराडकर
(लेखक रा. स्व. जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष आणि विद्याभारती कोंकण मुंबई अध्यक्ष आहेत.)