नामरंगी रंगले...

    16-Sep-2026
 
Shashikantbuwa Utpat
 
कीर्तन भक्तीच्या माध्यमातून जीवनदृष्टी समाजापर्यंत पोहोचवत, धर्मप्रसार आणि समाजप्रबोधनाचे अविरत कार्य करणार्‍या हभप शशिकांतबुवा उत्पात यांच्याविषयी...
 
महाराष्ट्राच्या मातीला शब्दांचे वेड आहे. हा शब्द कधी अभंगातून भेटतो, कधी ओवीतून, कधी भारूडातून, तर कधी कीर्तनातून गावोगावी फिरतो. मग हाच शब्द संस्कार करतो. ज्ञानदेवांनी ‘अवघा रंग एक झाल्या’चे म्हटले, तुकोबांनी रंजल्या-गांजल्यांत देव पाहिला आणि नामदेवांनी देवाला घरच्या माणसासारखीच हाक मारली. संतांनी देव माणसाजवळ आणला. कीर्तन हा याच संतवाणीचा संसार आहे. अभंगाच्या दोन ओळी कधीकधी मोठ्या ग्रंथांपेक्षाही अधिक सांगून जातात. म्हणून, कीर्तन हे एक जुने विद्यापीठच! काळ बदलला, गावांची रूपे बदलली, माणसाच्या चिंता बदलल्या; पण शब्दांतून विवेक जागवण्याची गरज तशीच आहे. कीर्तनाची परंपरा आजही तेच काम करते. या परंपरेच्या वारीतील वारकरी म्हणजे हभप शशिकांतबुवा उत्पात!
 
शशिकांतबुवा मूळचे पंढरपूरचे. पंढरपूरची माती आणि रुमिणीमातेचे मंदिर बालपणापासूनच त्यांच्या आयुष्याचा भाग. दीड वर्षाचे असतानाच मातृसुखाला पारखे झालेल्या बुवांचा सांभाळ त्यांच्या मोठ्या वहिनीने केला. उत्पात परिवाराकडे वंशपरंपरेने पंढरपुरातील रुमिणीमातेच्या पूजेची जबाबदारी असल्याने, बुवांचे वडील पूजेसाठी नेहमीच मंदिरात जात. त्यामुळे धर्माचे संस्कार लहानपणीच बुवांच्या मनावर झाले.
 
मंदिरात होणारे कीर्तन ऐकण्याची त्यांना लहानपणापासूनच आवड. घरचे कधी बुवांना गावभर शोधत असत. शोध घेत घेत मंदिरात पोहोचले, की बुवा कीर्तन ऐकण्यात दंग असलेले दिसत. मंदिरात घरच्यांना बुवा सापडत आणि तर बुवांना त्यांचे कीर्तन! बालपणीची ही सवयच पुढे आयुष्याचीच ओढ झाली. बुवांचे सातवीपर्यंतचे शिक्षण पंढरपुरात झाल्यावर, पुढील शिक्षणासाठी त्यांनी सोलापूर गाठले. तिथेच वाणिज्य शाखेची पदवीही घेतली. शिक्षण झाल्यावर रेल्वेची नोकरीही मिळाली. कॅशियर म्हणून रेल्वेत सेवेची सुरुवात करून, पुढे वरिष्ठ अधिकारिपदावरूनच बुवांनी निवृत्ती घेतली. नोकरीत असताना प्रामाणिकपणा आणि नम्रता हे दोन गुण त्यांनी सोडले नाहीत; त्याचीच ही गोमटी फळे! रेल्वेची नोकरी सुरूच होती; पण मनात कीर्तनही सुरूच होते.
 
निवृत्तीला पाच वर्षे बाकी असताना, दादरच्या ‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’च्या कीर्तन प्रशिक्षण वर्गाची जाहिरात त्यांच्या वाचनात आली. इतकी वर्षे मनात असलेल्या गोष्टीला आता वाट सापडली. बुवांनी घरातील सर्वांनाच प्रवेश घेण्यास सांगितले. यानंतर बुवांचे कामावरूनच थेट कीर्तनकुलात जाणे सुरू झाले. घरचे सगळेच कीर्तन शिकत असल्याने, त्या दिवसांचे वर्णन करायचे, तर ‘कुटुंब रंगलंय कीर्तनात’ एवढेच म्हणावे लागेल! पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून बुवांनी ‘कीर्तनालंकार’ पदवी घेतली. मात्र, ‘कीर्तन’ त्यांच्यासाठी नवा विषय नव्हता. लहानपणी ऐकलेली कीर्तने, वर्षानुवर्षांची श्रवणभक्ती आणि आता मिळालेले शास्त्रशुद्ध शिक्षण, या सगळ्यांची जोड त्यांच्या पाठीशी होती. त्यांनी कीर्तने सुरू केली.
 
‘यश मिळाले, म्हणून थांबायचे नाही आणि अपयश आले, म्हणून खचायचे नाही,’ ही वृत्ती त्यांची कायम राहिली. अल्पसंतुष्टता त्यांच्या स्वभावातच नसल्याने, शिकण्याची भूकही कमी झाली नाही. ‘कीर्तनालंकार’नंतर ‘कीर्तन भास्कर’, ‘कीर्तन चिंतामणी’ आणि ‘कीर्तन कौस्तुभ’ या कीर्तनातील सर्वोच्चपदव्याही त्यांनी संपादित केल्या. बुवा एकीकडे ज्ञान घेत राहिले आणि कीर्तनही सुरू राहिले. भगवंतसेवा आणि समाजप्रबोधन या दोन्ही गोष्टी कीर्तनातून घडत राहिल्या. ज्या ‘अखिल भारतीय कीर्तन संस्थे’त ते शिकले, त्याच संस्थेने पुढे विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. वयाच्या ८०व्या वर्षीही बुवांनी ती आनंदाने स्वीकारली.
 
बुवांची शिकवण्याची पद्धत मात्र वेगळी. समोरच्याला नेमके काय अडत आहे, ते आधी समजून घ्यायचे आणि तो विषय समजेपर्यंत प्रेमाने सांगत राहायचे. यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी तयार झाले. त्यांचे जवळपास १५० पेक्षा अधिक विद्यार्थी आज कीर्तनाच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य करीत आहेत. बुवांनी स्वतः साडेतीन हजारांहून अधिक कीर्तने केली असून, जवळपास १५ हून अधिक आख्याने त्यांनी स्वतः रचली आहेत. वयाच्या ९०व्या वर्षीही त्यांची कीर्तनाची ओढ तशीच आहे.
 
दि. १५ सप्टेंबर रोजी त्यांनी ९० ओलांडून ९१व्या वर्षात प्रवेश केला. तरी आजही ‘कीर्तन’ म्हटले, की बुवा तितक्याच उत्साहाने तयार होतात. या सेवेसाठी बुवांना अनेक पुरस्कार मिळाले. शृंगेरीच्या शंकराचार्यांकडूनही त्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. मात्र, पुरस्कारांपेक्षा त्यांच्या वृत्तीतला स्थिरपणाच मोठा! स्थितप्रज्ञता हा त्यांच्या स्वभावाचा विशेष भाव.
 
कीर्तनावरचे त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध असून, दुसर्‍या पुस्तकाचीही तयारी झाली आहे. ज्या परंपरेत बुवा लहानपणी कान रमले, त्याच परंपरेत पुढे आयुष्य घालवले आणि त्याच परंपरेची शिदोरी आता पुढच्या पिढीकडे देण्याचे कार्य अव्याहतपणे करत आहेत. धर्मप्रसाराबरोबर समाजप्रबोधनाचे कार्य करणार्‍या शशिकांतबुवा उत्पात यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर