'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’: नाशिकमध्ये धडक कारवाई; युएईमार्गे महाराष्ट्रात आणलेला ३.६२ लाख किलो पाकिस्तानी खजूर जप्त

    16-Sep-2026   
 
Operation Deep Manifest
 
नाशिक (Operation Deep Manifest) : भारताच्या व्यापार नियमांना आणि सुरक्षेला बगल देऊन आंतरराष्ट्रीय मार्गाने चालणार्‍या एका मोठ्या तस्करीच्या रॅकेटचा महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने पर्दाफाश केला आहे. ’ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत करण्यात आलेल्या एका अत्यंत गुप्त आणि धाडसी कारवाईत डीआरआयने नाशिकमध्ये तब्बल ३ लाख ६२ हजार किलो (३६२ टन) वजनाचा पाकिस्तानी खजूर जप्त केला आहे. आगामी सणासुदीच्या काळात बाजारपेठेत विक्रीसाठी हा खजूर महाराष्ट्रात आणला गेला होता. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
 
भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे थेट व्यापारी संबंध सध्या स्थगित असल्याने पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवर भारतात कडक निर्बंध आहेत. या निर्बंधांचा गैरफायदा घेण्यासाठी तस्करांनी एक नवीनच शक्कल लढवली होती. हा पाकिस्तानी खजूर थेट भारतात न आणता तो आधी युनायटेड अरब अमिराती येथे नेण्यात आला. तिथे बनावट कागदपत्रे, खोटे बिलिंग आणि बनावट सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन (माल कुठून आला याचे प्रमाणपत्र) तयार करून हा माल युएईचा असल्याचे दाखवण्यात आले. तेथून तो समुद्रमार्गे भारतात आयात करण्यात आला. या संपूर्ण आंतरराष्ट्रीय तसकरीचा छडा लावण्यासाठी डीआरआयने ’ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ ही विशेष मोहीम आखली होती.नडीआरआयच्या मुंबई आणि नाशिक पथकाला गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, ओमान किंवा युएईच्या नावाने एक मोठा संशयास्पद साठा नाशिकमधील कंटेनर डेपो किंवा गोदामांमध्ये आणला गेला आहे. या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकार्‍यांनी नाशिकमध्ये विविध ठिकाणी अचानक छापे टाकले. गोदामांची तपासणी केली असता, तिथल्या कंटेनर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खजुराची पोती आढळली. अधिकार्‍यांनी जेव्हा या मालाच्या कागदपत्रांची आणि पॅकेजिंगची सखोल तपासणी केली, तेव्हा मूळ पॅकेजिंगवर पाकिस्तानचे शिक्के आणि खुणा आढळून आल्या. आयातदारांनी कस्टम ड्युटी (सीमा शुल्क) चुकवण्यासाठी आणि बंदी असलेल्या देशातून माल आणण्यासाठी कागदपत्रांमध्ये मोठी हेराफेरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले. (Operation Deep Manifest)

कस्टम ड्युटीची चोरी आणि सुरक्षेचा प्रश्न
 
पाकिस्तानमधून आयात होणार्‍या वस्तूंवर भारताने २०० टक्के इतके प्रचंड सीमा शुल्क लावले आहे, जेणेकरून देशांतर्गत बाजारपेठेचे रक्षण व्हावे. युएईमार्गे माल आणल्यामुळे तस्करांनी हा २०० टक्के कर तर चुकवलाच, शिवाय भारताच्या आर्थिक कायद्यांचे उघड उल्लंघन केले. जप्त करण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार किलो खजुराची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे. सणासुदीच्या काळात हा खजूर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील इतर बाजारपेठांमध्ये किरकोळ विक्रीसाठी पाठवला जाणार होता.भारतात हा माल कोणाच्या सांगण्यावरून मागवला गेला आणि यामागे कोणती मोठी आर्थिक साखळी सक्रिय आहे, याचा शोध यंत्रणा घेत आहेत. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, सीमा शुल्क कायदा १९६२ च्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Operation Deep Manifest)





योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर