मुंबई (Nitesh Rane UCC Owaisi) : समान नागरी कायदा (UCC) हा संविधानातच नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणाऱ्या नागरिकांना युसीसीमुळे अडचण असण्याचे कोणतेही कारण नाही, असे मत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“समान नागरी कायद्याचे प्रावधान संविधानात दिलेले आहे. जे नागरिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानतात, त्यांना युसीसीमुळे अडचण असण्याचे काहीच कारण नाही. ही आमच्या एनडीए सरकारने जनतेला दिलेले वचन आहे. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या संकल्पपत्रातील प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो, त्याचप्रमाणे हीदेखील पूर्ण करणार आहोत. ही देशाची मागणी आहे,” असे राणे म्हणाले. (Nitesh Rane UCC Owaisi)
युसीसीच्या मुद्द्यावरून त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही टीका केली. “युसीसीवर जर ओवेसींना आक्षेप आहे, तर आम्ही हे समजायचे का की तुम्हाला बाबासाहेबांचे संविधान मान्य नाही? तुम्हाला आपल्या देशात शरिया कायदा लागू करायचा आहे, असे मानायचे का आम्ही?” असा सवाल त्यांनी केला. संविधानातील तरतुदींना विरोध करणाऱ्यांवर टीका करताना राणे म्हणाले, “ज्यांना संविधान मान्य नाही, त्यातील प्रावधानाला विरोध करायचा आहे, ते देशद्रोही आहेत.” (Nitesh Rane UCC Owaisi)
दिशा सालियन प्रकरणाच्या तपासावर भाष्य करताना नितेश राणे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाचा (CBI) तपास सुरू असून, सीबीआय आपले काम चोखपणे करत असल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. “ही मंडळी केससंदर्भात दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडितांवर दबाव आणण्याचे यांचे प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोप राणे यांनी केला.
सुषमा अंधारे या निलेश ओझा यांना, जे या प्रकरणातील पीडितांचे वकील आहेत, धमकी देत असल्याचा आरोपही राणे यांनी केला. “या प्रकरणातील पीडित आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याचे काम हे नेते करत आहेत. असे धमकावल्याने उद्या कोणीही आदित्य ठाकरेंच्या विरोधात बोलणार नाही. त्यामुळे अशा धमकावणाऱ्यांना अटक करून त्यांची चौकशी केल्याशिवाय कोणताच पर्याय उरणार नाही,” अशी मागणी त्यांनी केली. (Nitesh Rane UCC Owaisi)
युसीसीवर ओवेसींचा आक्षेप; मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा भाजपवर आरोप
दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी (१४ सप्टेंबर) सत्ताधारी पक्षावर मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा आरोप केला होता. भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संविधानाच्या अनुच्छेद २५ आणि अनुच्छेद १४ चे उल्लंघन करून समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हैदराबादमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ओवेसी म्हणाले, “भाजप समानतेसाठी समान नागरी कायदा लागू करत नाही. मुस्लिमांना लक्ष्य करणे हाच त्यामागचा उद्देश आहे.” (Nitesh Rane UCC Owaisi)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.