कुप्रचारावर संस्कृतीचा विजय

    16-Sep-2026   
Indo-French Cultural Open Day

अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा आणि धार्मिक मूल्यांना चुकीच्या पद्धतीने सादर करून ‘हिंदूफोबिया’ पसरवण्याचे प्रयत्न वाढताना दिसतात. पॅरिसच्या आयफेल टॉवर परिसरात ‘बॅप्स’ प्रतिनिधी मंडळाच्या भेटीदरम्यान एका धार्मिक परंपरेला ‘लिंगभेद’ आणि ‘असमानता’ यांसारख्या शब्दांचे लेबल लावून जागतिक स्तरावर बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार केवळ एका संस्थेविरुद्ध नव्हता, तर हिंदू संस्कृती आणि परंपरांबद्दल समाजात पूर्वग्रह निर्माण करण्याच्या कुटिल कटाचा भाग होता.
 
मात्र, याच फ्रान्समधील बुसी-सेंट-जॉर्जेस येथे नुकत्याच उभारलेल्या नव्याने ‘बॅप्स’ स्वामीनारायण हिंदू मंदिरात दि. १० सप्टेंबर रोजी पार पडलेला ‘इंडो-फ्रेंच कल्चरल ओपन डे’ हा अशा अजेंडा रेटणार्‍यांसाठी एक अत्यंत सणसणीत आणि सकारात्मक उत्तर ठरला आहे. ‘युनेस्को’मधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात युरोप, आफ्रिका, आशिया, अरब देश, अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशातील तब्बल ४३ देशांचे राजदूत, मुत्सद्दी आणि प्रतिनिधी एकत्र आले. ज्या परंपरेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले, त्याच परंपरेच्या मंदिरात विविध संस्कृती आणि धर्मांचे जागतिक जागतिक प्रतिनिधी एकत्र आले. या कार्यक्रमाने हे सिद्ध केले की, हिंदू संस्कृती ही कोणालाही वेगळे पाडणारी नसून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्त्वावर आधारलेली आहे.
 
यापूर्वीही अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि युरोपमधील विविध देशांमध्ये हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले, सणांवर होणारी टीका आणि धार्मिक नियमांचा विपर्यास करून केला जाणारा दुष्प्रचार या घटनांमधून ‘हिंदूफोबिया’चे विदारक स्वरूप समोर आले आहे. निष्पाप परंपरांना जाणीवपूर्वक वादाच्या भोवर्‍यात ढकलणे, भारतीय मूल्यांना मागासलेले ठरवणे आणि सामाजिक माध्यमांवर हिंदू धर्माविरोधात द्वेष पसरवणे, हे या अजेंड्याचे प्रमुख हत्यार राहिले आहे.
 
हिंदू धर्माची सर्वांत मोठी ताकद म्हणजे, त्याचा संयम आणि सर्वसमावेशकता. वादाला वादाने उत्तर न देता, आपल्या कृतीतून आणि सेवेच्या माध्यमातून संस्कृतीचे श्रेष्ठत्व दाखवून देणे, हाच या ‘फोबिया’वर उत्तम उपाय आहे. बुसी-सेंट-जॉर्जेस येथील मंदिराने जगाला हे दाखवून दिले की, कुप्रचाराला उत्तर देण्यासाठी जागतिक व्यासपीठांवर सांस्कृतिक देवाणघेवाण आणि संवाद अत्यंत आवश्यक आहे. हिंदू मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून ती शांतता, एकता आणि मानवी मूल्यांचे केंद्र आहेत.
 
आयफेल टॉवरच्या छायेत झालेला दुष्प्रचार एका बाजूला आणि ४३ देशांच्या जागतिक प्रतिनिधींनी स्वामीनारायण मंदिरात दिलेली एकत्र हजेरी दुसर्‍या बाजूला या घटनेने हे स्पष्ट केले आहे की, कुटिल हेतूने पसरवलेला हिंदूद्वेष तात्पुरता भ्रम निर्माण करू शकतो; परंतु हिंदू संस्कृतीची सर्वसमावेशक आणि वैश्विक सत्यता शेवटी जिंकते.
 
जेव्हा काही ठरावीक विचारसरणीचे लोक हिंदू धर्मातील विविध परंपरांचा विपर्यास करून त्याला संकुचित, भेदभाव करणारा आणि लिंगभेदावर आधारित ठरवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा असा दुष्प्रचार फार काळ टिकत नाही. कोणत्याही द्वेषाला वा वादाला सामोरे न जाता, प्रेम, सेवा आणि वैश्विक बंधुत्वाच्या बळावर दिलेले हे प्रत्युत्तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या मूल्याची खरी ताकद दर्शवते. जागतिक स्तरावर अजेंडा चालवून हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलीन करू पाहणार्‍यांसाठी ही एक वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवरील सणसणीत चपराक आहे.
 
शेवटी, हे स्पष्ट होते की सत्याचा मार्ग आणि संस्कृतीची खरी शक्ती ही कोणत्याही दुष्प्रचारापेक्षा कितीतरी पटींनी मोठी असते. फ्रान्समधील या घटनेने जागतिक पटलावर हे सिद्ध केले आहे की, हिंदू संस्कृतीविरुद्ध रचलेले वैचारिक कट आणि पसरवलेला ‘हिंदूफोबिया’ हा एका सकारात्मक, सेवाभावी आणि उदार दृष्टिकोनासमोर निरर्थक ठरतो. पॅरिसच्या भूमीवरून दिलेला हा संदेश केवळ एका मंदिराचा किंवा एका कार्यक्रमाचा विजय नाही, तर तो भारत आणि त्याच्या हजारो वर्षांच्या उदात्त परंपरेचा विजय आहे. आज जगाला अशाच सर्वसमावेशक विचारांची गरज आहे आणि हेच मूल्य जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत कोणताही कुप्रचार किंवा अपप्रचार या वैश्विक परंपरेला बाधा आणू शकणार नाही.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर