संघकार्याची वाट निवडणारे अनेक स्वयंसेवक होते; पण सुखसोयींचे शहर मागे सोडून विचाराच्या प्रसारासाठी दुर्गम भागात आयुष्य वाहणारे कार्यकर्ते मोजकेच. सावंतवाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा उभारून संपूर्ण कोकणात संघकार्याची पायाभरणी करणारे कै. श्रीपाद हरी वाळके (गुरुजी) हे अशाच थोर कार्यकर्त्यांपैकी एक. त्यांनी केवळ शाखा सुरू केली नाही, तर आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास राष्ट्रकार्याला अर्पण केला.
कै. श्रीपाद हरी वाळके यांचा दि. ८ ऑगस्ट १९०८ रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. वडील कस्टम्स विभागात अधिकारी असल्याने त्यांची नियुक्ती मुंबई, ठाणे आणि कुलाबा जिल्ह्यांच्या सागरी किनाऱ्यावर विविध ठिकाणी होत असे. त्यामुळे वाळके गुरुजींचे बालपण आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबई-ठाणे परिसरातच झाले. लहानपणापासूनच त्यांना कसरत, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीची विलक्षण आवड होती. मजबूत, पिळदार शरीरयष्टी लाभलेल्या वाळके गुरुजींना स्वातंत्र्य चळवळीशी निगडित समाजकार्यातही रस होता. त्यांच्या मनात जाज्वल्य राष्ट्राभिमान होता. देश आणि समाज सशक्त व्हावा, यासाठी स्वतःचे जीवन वाहावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा बालपणातच आकार घेऊ लागली होती.
१९३०-३१ च्या सुमारास त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. त्यांचे आतेभाऊ वैद्य हे दादर परिसरातील सक्रिय स्वयंसेवक होते. त्यांनीच प्रथम वाळके गुरुजींना संघशाखेवर नेले. सुरुवातीला शाखेतील शारीरिक कार्यक्रमांनी त्यांना आकर्षित केले. मात्र डॉ. हेडगेवार आणि अन्य ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भाषणे, त्यांचे राष्ट्रविषयक विचार आणि संघाची कार्यपद्धती यांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. शारीरिक आकर्षणाने सुरू झालेला प्रवास हळूहळू आयुष्यभराच्या संघनिष्ठेत परिवर्तित झाला. त्या काळी संघाचे कार्य मोठ्या शहरांपुरते मर्यादित होते. दुर्गम गावे आणि छोट्या शहरांमध्ये संघकार्याचा प्रसार झालेला नव्हता. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून वाळके गुरुजींनी एक मोठा निर्णय घेतला—मुंबईतील स्थिर आयुष्य सोडून कोकणात जाऊन संघकार्य उभारण्याचा.
ते सावंतवाडीत आले आणि तेथील समवयस्क युवकांपासून समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींशी संपर्क वाढवू लागले. संघ म्हणजे काय, शाखा म्हणजे काय, राष्ट्रकार्याची आवश्यकता काय—हे ते संयमाने समजावून सांगत. सन १९३३ मध्ये त्यांनी सावंतवाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा सुरू केली. त्या शाखेचे ते पहिले स्वयंसेवक ठरले. पुढे व्यायामाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी छोटेखानी व्यायामशाळाही सुरू केली. उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान थाटले; परंतु व्यापारापेक्षा त्यांचे तन, मन आणि धन संघकार्य आणि व्यायामप्रसारातच अधिक गुंतलेले असे. वाळके गुरुजींसाठी शाखा हा कार्यक्रम नव्हता; ती जीवनपद्धती होती.
प्रभात आणि सायं शाखेत संख्या वाढावी म्हणून ते रोज घराघरांत जाऊन स्वयंसेवकांना बोलावत. अनेकदा पहाटे स्वतः उठून इतरांना जागे करत. वर्षातील एकही दिवस शाखा चुकू नये, हा त्यांचा नियम होता. शाखेत खेळ, स्पर्धा, उत्सव, बौद्धिक कार्यक्रम, बाहेरून आलेल्या प्रचारकांचे संवाद—या प्रत्येक उपक्रमात ते आघाडीवर असत. मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा शहरांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा स्थानिक समाजाशी परिचय करून देत संघविचारांचा प्रसार करण्यात ते सदैव तत्पर असत.
सावंतवाडीपुरते मर्यादित न राहता त्यांनी संपूर्ण कोकणात संघकार्य नेले. त्या काळी काँग्रेस आणि समाजवादी विचारांचा प्रभाव असल्याने अनेक ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. तथाकथित स्थानिक पुढाऱ्यांकडून अडथळे आले, अवहेलना झाली; तरी त्यांनी चिकाटी सोडली नाही. संपूर्ण कोकण, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईपर्यंतचा प्रवास ते अनेकदा सायकलवरून करत. त्या प्रवासात संघविस्तार, संपर्क, शाखा आणि स्वयंसेवकांची बांधणी हेच त्यांचे ध्येय असे.
संघाच्या शिबिरांत अधिकाधिक स्वयंसेवक सहभागी व्हावेत, यासाठी ते काही महिने आधीपासूनच काम सुरू करत. विशेषतः बाल स्वयंसेवकांच्या पालकांना वारंवार भेटून मुलांना शिबिराला पाठविण्यास प्रवृत्त करत. त्यांच्या या सातत्यामुळे शिबिरे ही केवळ संघाची नव्हे, तर कुटुंबांच्या सहभागाची परंपरा बनत गेली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली आणि स्वयंसेवकांवर कठीण काळ ओढवला. कोकणात झालेल्या ऐतिहासिक सत्याग्रहात वाळके गुरुजी अग्रभागी होते. त्यांना सहा महिन्यांचा कारावास झाला आणि हिंडलगा (बेळगाव) कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. त्या वेळी त्यांची पत्नी गर्भवती होती; मात्र तिला भेटण्याची परवानगीही प्रशासनाने नाकारली.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांचे घर जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. डॉ. लेले यांच्या वाड्यात संघकार्यालय असल्याने त्या ठिकाणालाही धमक्या दिल्या गेल्या. परंतु वाळके गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा संपूर्ण काळ धैर्याने पेलला. त्यांच्यासाठी संघकार्य हे परिस्थितीवर अवलंबून नव्हते; ते जीवनव्रत होते. १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा संघविरोधी वातावरण निर्माण झाले. अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली. पोलीस दररोज वाळके गुरुजींच्या घरी चौकशीसाठी येत असत. वय आणि आजारपणामुळे त्यांना अटक झाली नाही; पण त्यांचा निर्धार मात्र अखेरपर्यंत तसाच राहिला. वय वाढले, शरीर वृद्ध झाले; तरी त्यांनी शाखा सोडली नाही. शेवटच्या काळापर्यंत ते शाखेत जात राहिले.
दि. ५ नोव्हेंबर १९७९ रोजी वाळके गुरुजींना देवाज्ञा झाली. त्यांनी सावंतवाडी आणि कोकणात संघकार्याची जी भक्कम पायाभरणी केली, ती आजही अनेक स्वयंसेवकांच्या कार्यातून जिवंत आहे. मुंबईतील स्थिर आयुष्याचा त्याग करून दुर्गम कोकणात राष्ट्रकार्याची ज्योत प्रज्वलित करणारे श्रीपाद हरी वाळके (गुरुजी) हे केवळ सावंतवाडीचे पहिले स्वयंसेवक नव्हते; ते संघाच्या प्रारंभीच्या त्या पिढीचे प्रतिनिधी होते, ज्यांनी शाखा उभारण्यापूर्वी माणसे जोडली, विचार रुजवले आणि आपल्या जीवनातून राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला.