मुंबई (Mohan Bhagwat LKSEC Gotan) : शिक्षणाचा खरा उद्देश केवळ पोट भरणे किंवा उपजीविका मिळवणे नसून, श्रेष्ठ, समर्थ आणि संवेदनशील माणूस घडवणे हा आहे. व्यक्तीचे जीवन केवळ वैयक्तिक यशापुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाज आणि सृष्टीच्या पोषणासाठी असावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. एल. के. सिंघानिया एज्युकेशन सेंटर (एलकेएसईसी), गोटन येथे आयोजित ३७ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ‘स्वराज’ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. (Mohan Bhagwat LKSEC Gotan)
औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातील फरक स्पष्ट करताना सरसंघचालक म्हणाले, शालेय शिक्षणाबरोबरच कुटुंब, परिसर आणि समाजातून मिळणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या प्रवृत्ती पशूंमध्येही असतात; मात्र विवेक आणि विचार करण्याची क्षमता निसर्गाने केवळ माणसाला दिली आहे. याच विचारशक्तीच्या बळावर माणूस ‘नरातून नारायण’ होऊ शकतो. सद्विचारांनी प्रेरित कर्म माणसाला देवत्वाकडे घेऊन जातात; अन्यथा अधःपतनाचा मार्ग खुला होतो. त्यामुळे मानवी जीवनाचा प्रवास मानवत्वातून अतिमानवत्वाकडे आणि पुढे देवत्वाकडे व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat LKSEC Gotan)
सत्य आणि सामर्थ्य यांचा परस्परसंबंध अधोरेखित करताना ते म्हणाले की, शक्तीशिवाय सत्यही पांगळे ठरते. व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत शरीर, मन, बुद्धी आणि ज्ञान यांचे बळ आवश्यक आहे. आज भारत आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या अधिक सक्षम झाला असल्याने जग भारताचे विचार आणि ज्ञान गांभीर्याने ऐकत आहे आणि स्वीकारत आहे, असे त्यांनी नमूद केले. (Mohan Bhagwat LKSEC Gotan)
जीवनाच्या ध्येयाविषयी बोलताना डॉ. भागवत म्हणाले, केवळ यशस्वी होणे पुरेसे नाही; जीवन सार्थक होणे अधिक महत्त्वाचे आहे. यश-अपयश हे प्रयत्नांबरोबरच प्रारब्धावरही अवलंबून असते; मात्र परमार्थभावाने केलेले कर्म माणसाला अमरत्व प्राप्त करून देते. इतिहासात दानवीर भामाशाह, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, स्वामी विवेकानंद आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत प्राणार्पण करणाऱ्या बलिदानींचे स्मरण याच कारणासाठी केले जाते, असे त्यांनी सांगितले. (Mohan Bhagwat LKSEC Gotan)
कला, क्रीडा आणि योगही शिक्षणाचे अविभाज्य घटक
शिक्षण केवळ बौद्धिक किंवा वैज्ञानिक विषयांपुरते मर्यादित न राहता सर्वांगीण असावे, असे सांगताना त्यांनी कला, संगीत, क्रीडा आणि योग यांनाही शिक्षणाचे तितकेच महत्त्वाचे घटक म्हटले. कबड्डीसारखे खेळ पराभवानंतर पुन्हा उभे राहण्याची जिद्द शिकवतात, तर वाद्यवृंद आणि संगीत मन, बुद्धी आणि शरीर यांचा सुंदर समन्वय घडवून सामूहिक चेतना जागवतात, असे ते म्हणाले. (Mohan Bhagwat LKSEC Gotan)
मनुष्यनिर्मितीची तीर्थस्थाने बनावीत शिक्षणसंस्था
शेवटी त्यांनी आवाहन केले की, शिक्षणसंस्था या केवळ पदवी वाटपाची केंद्रे न राहता मनुष्यनिर्मितीची तीर्थस्थाने बनली पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्य आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवणारे वातावरण निर्माण करणे ही शिक्षणसंस्थांची खरी जबाबदारी आहे. स्वतःसाठी सर्वजण जगतात; मात्र समाज आणि राष्ट्रासाठी जगणाऱ्याचेच जीवन खऱ्या अर्थाने सार्थक ठरते, असे ते म्हणाले. (Mohan Bhagwat LKSEC Gotan)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक