माहिमच्या संघकार्यातील एक अविस्मरणीय पर्व...

    15-Sep-2026   
 
Jayant Khanapurkar
 
कै. जयंत कृष्णराव खानापुरकर यांचा जीवनप्रवास हा एका स्वयंसेवकाने आपल्या कर्तव्यभावनेतून, प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने केलेल्या संघकार्याचा प्रेरणादायी आलेख आहे. शाखेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास माहिमच्या सामाजिक जीवनात संघकार्याची पाळेमुळे रुजवण्यापर्यंत पोहोचला. त्यांच्या कार्याचा ठसा त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि त्यांनी जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या स्मरणात कायम राहील.
 
मूळचे कर्नाटकातील असलेले जयंत कृष्णराव खानापुरकर यांचे बालपण आणि शिक्षण धारवाड येथे झाले. त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नेले आणि तेथून त्यांच्या संघप्रवासाला सुरुवात झाली. पुढे शिक्षण, नोकरी आणि मुंबईतील वास्तव्य या सर्व टप्प्यांत त्यांच्या जीवनात संघकार्याचा धागा अखंड राहिला. धारवाड येथे त्यांचे सर्व शिक्षण झाले. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेत इंजिनिअर म्हणून नोकरी स्वीकारली. साधारण १९७४ च्या सुमारास ते माहिम येथे राहायला आले. माहिममध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक आणि संघकार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळाले.
 
संघावर बंदी आलेल्या काळात त्यांच्या घराचा उपयोग भूमिगत प्रचारकांच्या कामासाठी होत असे. ज्येष्ठ प्रचारक शिवराय तेलंग यांचा त्या काळात त्यांच्या घरी मुक्काम असायचा. ते वेश बदलून राहत असल्यामुळे परिसरातील लोकांच्या फारसे लक्षातही येत नसत. प्रतिकूल परिस्थितीतही संघकार्य सुरू ठेवण्यासाठी खानापुरकर यांच्या घराने अशा प्रकारे महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे माहिम नगरात त्यांच्या येथे राहणारे पंडित देवधर नावाचे कार्यकर्ते यांनी जयंतरावांना माहिमच्या संघकार्यात सक्रियपणे आणले. त्यांच्यावर माहिम नगर कार्यवाह म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत मनापासून स्वीकारली.
 
त्या काळात माहिममधील मच्छीमार नगर परिसरात संघाची शाखा सुरू करण्याचे आव्हान होते. जयंतरावांनी या परिसरात सातत्याने संपर्क ठेवून नवीन शाखा सुरू केली. या सायंशाखेला काही काळ जवळपास पन्नास स्वयंसेवकांची उपस्थिती असायची. या शाखेच्या माध्यमातून अनेक तरुण कार्यकर्ते संघाशी जोडले गेले. सुरेश भोईर, प्रकाश राऊळ यांसारखी अनेक नावे या कार्यकर्त्यांच्या फळीतील घेता येतील.
 
जयंतरावांचे कार्य हे केवळ शाखेपुरते मर्यादित नव्हते. ते आपल्या फटफटीवरून परिसरात सतत प्रवास करीत. स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग सुरुवातीला काहीसा कमी होता; मात्र सातत्यपूर्ण संपर्क आणि प्रयत्नांमुळे कालांतराने शाखेला संख्याबळ मिळत गेले. परिसरातील विविध घटकांशी निर्माण झालेला संपर्क हा त्यांच्या कार्याची मोठी जमेची बाजू होती. १९९२ च्या दंगलीच्या काळात परिसरात काही दुर्घटना घडल्या. त्याचा परिणाम शाखेच्या संख्येवरही झाला. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही माहिम परिसरातील संघाचा संपर्क टिकून राहिला. जयंतरावांनी उभे केलेले कार्य आणि कार्यकर्त्यांशी निर्माण केलेले संबंध यामुळे या परिसरात संघाचे काम पुढे सुरू राहिले.
 
जयंतरावांच्या कौटुंबिक जीवनाचाही त्यांच्या संघप्रवासाला आधार होता. त्यांच्या पत्नी गोरेगावच्या गंडभीर हायस्कुलमध्ये शिक्षिका होत्या. अमोल, दुर्गेश आणि किशोरी ही त्यांची मुले. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी संघकार्याला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले.
 
जयंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे त्यांची उत्तम गायकी. मूळचे धारवाडचे असल्यामुळे संगीताची त्यांना विशेष जाण होती. संघातील बौद्धिक आणि गीतांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याच्या कार्यातही त्यांच्या या गुणाचा उपयोग झाला. त्या काळात रंगा हरीजी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख असताना नवीन संघगीते तयार होत असत. त्या गीतांना चाल लावण्याचे कार्य रंगा हरीजींनी जयंतरावांकडे सोपवले होते. संघगीतांच्या माध्यमातूनही त्यांनी संघकार्याला आपला कलात्मक स्पर्श दिला. विशेष म्हणजे अनेक कलावंत जयंतरावांच्या माध्यमातून संस्कार भारतीशी जोडले गेले.
 
इंजिनिअर म्हणून व्यावसायिक जीवन जगताना, कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आणि प्रतिकूल परिस्थितीत संघकार्य करताना जयंत कृष्णराव खानापुरकर यांनी आपल्या परीने कार्यकर्त्यांची एक पिढी घडवण्याचे काम केले. त्यांचा संघप्रवास हा प्रसिद्धीपेक्षा सातत्य, संपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याचा प्रवास होता. रक्तदाब आणि मधुमेह या आजारांनी त्रस्त असतानाच त्यांचे निधन झाले. मात्र त्यांनी माहिम परिसरात उभे केलेले संघकार्य, जोडलेले कार्यकर्ते आणि निर्माण केलेला संपर्क यामुळे त्यांची कार्यस्मृती दीर्घकाळ जिवंत राहिली.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर