_202609151137520634_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
डॉक्टर म्हणून कै. डॉ. शांताराम हरी केतकर यांनी हजारो गरिबांच्या चेहऱ्यावर दिलासा फुलवला, तर स्वयंसेवक म्हणून 'इदं न मम' हे पू. श्रीगुरुजींचे वाक्य आपल्या प्रत्येक कृतीतून जगले. प्रचारकाचे त्यागमय जीवन, हातखंब्यातील निस्वार्थ वैद्यकीय सेवा, आणीबाणीतील संघर्ष, श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील सहभाग आणि देशभरातील सेवाकार्याचे दस्तावेजीकरण या सर्व प्रवासात प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी कर्मयोगाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या संघप्रवासाचा हा प्रेरणादायी आलेख म्हणजे सेवेला साधना मानणाऱ्या एका स्वयंसेवकाची जिवंत गाथाच आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू.श्रीगुरुजी यांचे 'इदं न मम' हे वाक्य अनेक स्वयंसेवक आपल्या आचरणातून जगत आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा येथील गरीबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे कै. डॉ. शांताराम हरी केतकर अर्थात बापूराव केतकर हे त्या वाक्याचे मूर्तिमंत उदाहरण होते. वैद्यकीय व्यवसायातून हजारो रुग्णांना जीवनदान देतानाच संघकार्य, राष्ट्रकार्य आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम त्यांनी आपल्या आयुष्यात घडवून आणला. दि. २९ ऑगस्ट १९३० रोजी चिपळूण तालुक्यातील भिले या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. साधेपणा, कष्ट आणि समाजाविषयीची संवेदना हे संस्कार बालपणापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजले. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला; मात्र सेवेचा त्यांनी लावलेला वसा आजही अनेकांना प्रेरणा देतो.
त्यांचे शालेय शिक्षण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये मॅट्रिकपर्यंत झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ते नागपूरला गेले. त्या काळात नागपूर हे संघकार्याचे प्रमुख केंद्र होते. शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडला. शाखेतील संस्कार, राष्ट्रसेवेची प्रेरणा आणि स्वयंसेवकाचे जीवनमूल्य त्यांनी तेथे आत्मसात केले. याच काळात त्यांनी आपल्या आयुष्याचा मार्ग निश्चित केला. डॉक्टर होणे हे त्यांचे व्यावसायिक ध्येय होते; पण समाजासाठी जगणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५२ ते १९५५ या तीन वर्षांच्या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले. प्रचारकाचे जीवन म्हणजे त्याग, भ्रमंती, संघटन आणि व्यक्तिनिर्माण. या काळात त्यांनी असंख्य स्वयंसेवकांशी संपर्क साधला आणि समाजजीवन जवळून अनुभवले. याच अनुभवाने पुढील आयुष्यभर त्यांच्या प्रत्येक निर्णयाला दिशा दिली.
१९५६ मध्ये त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि १९५९ मध्ये रत्नागिरीजवळील हातखंबा येथे स्थायिक झाले. पुढील तब्बल २६ वर्षे म्हणजेच १९५९ ते १९८५ हातखंबा आणि परिसरातील जनतेसाठी ते केवळ डॉक्टर नव्हते, तर कुटुंबातील आधारवड बनले. त्यांचा पेहराव कायम एकच असायचा; पांढरा शर्ट आणि पांढरी पँट. साधेपणातच त्यांचे मोठेपण दिसून येत असे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांकडे उपचारासाठी पैसे नसत. पण बापूरावांसाठी रुग्णाची आर्थिक परिस्थिती कधीच अडसर ठरली नाही. गरजूंवर उपचार करणे हेच त्यांचे समाधान होते. त्यामुळे परिसरात ते 'गरीबांचे डॉक्टर' म्हणून प्रसिद्ध झाले.
१९५९ मध्येच ते विवाहबद्ध झाले. त्यांना डॉ. संजय हे एकुलते एक अपत्य. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतानाही समाजसेवेचा धागा त्यांनी कधी सुटू दिला नाही. अनेक डॉक्टर आयुष्यभर व्यवसाय करतात; पण बापूरावांनी वेगळा निर्णय घेतला. आपल्या जीवनाचे पूर्वनियोजित ध्येय म्हणून १९८५ मध्ये त्यांनी पूर्णपणे वैद्यकीय व्यवसाय थांबवला आणि निवृत्ती स्वीकारली. निवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हे, तर संघकार्यासाठी दुसरी इनिंग असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.
१९८५ पासून त्यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात स्वतःला झोकून दिले. शरीर साथ देईपर्यंत, म्हणजे जवळपास २०१६ अखेरपर्यंत, त्यांनी अखंड संघकार्य केले. गावोगावी संपर्क, स्वयंसेवकांशी संवाद, समाजप्रबोधन आणि संघटन उभारणी यात ते सातत्याने सक्रिय राहिले. त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि संयमी नेतृत्वामुळे अनेक कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शक मानत. १९६५ ते १९९० या काळात त्यांनी भारतीय जनसंघ आणि पुढे भारतीय जनता पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. मात्र त्यांची ओळख कधीही केवळ राजकीय कार्यकर्त्याची नव्हती; संघसंस्कारातून समाजकार्य करणारा स्वयंसेवक हीच त्यांची खरी ओळख राहिली. १९७२ मध्ये पाली गणातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.
१९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादल्यानंतर संघ आणि जनसंघाच्या असंख्य कार्यकर्त्यांप्रमाणे बापूरावांनाही संघर्ष करावा लागला. ऑक्टोबर १९७५ ते मार्च १९७७ या काळात त्यांना मीसा कायद्याखाली अटक झाली आणि येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. हा काळ त्यांच्या वैचारिक निष्ठेची कठोर परीक्षा होता; पण त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून त्यांनी श्रीराम जन्मभूमी आंदोलनातही सक्रिय भूमिका बजावली. आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते बाबरी ढाचा पाडला जाईपर्यंत त्यांनी विविध स्तरांवर सहभाग नोंदवला. त्यांच्या दृष्टीने हे केवळ आंदोलन नव्हते; तर सांस्कृतिक स्वाभिमानाच्या जागृतीचा प्रवास होता.
निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचा नवा अध्याय सुरू केला. संघ परिवाराद्वारे देशभर चालणारे सुमारे अडीच हजार सेवा प्रकल्प त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्या प्रवासातून निवडक अडीचशे प्रकल्पांची माहिती संकलित करून त्यांनी 'सेवासरितांचा अमृतकुंभ' हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिले. सेवाकार्याच्या असंख्य अनामिक प्रवाहांना त्यांनी या पुस्तकातून शब्दबद्ध केले.
बापूरावांच्या आयुष्याचा सारांश एका वाक्यात मांडायचा तर तो असा; डॉक्टरकी ही उपजीविका होती; स्वयंसेवकत्व ही त्यांची जीवनपद्धती होती. म्हणूनच रत्नागिरीच्या संघपरिवारात, हातखंब्याच्या जनमानसात आणि असंख्य स्वयंसेवकांच्या स्मरणात डॉ. शांताराम हरी (बापूराव) केतकर आजही सेवाभावी, त्यागी आणि प्रसिद्धीपराङ्मुख स्वयंसेवक म्हणून आदराने स्मरले जातात.