नमोऽस्तु ते वराहाय

    13-Sep-2026
 
Varaha Jayanti
 
धर्मरक्षणासाठी जन्म घेण्याचे ब्रीद पाळणार्‍या भगवान विष्णू यांचा वराह अवतारही प्रसिद्धच आहे. कालौघात या वराह अवताराची विविध रुपे, स्थापत्य कलेतून पुढे आलेली आपल्याला दिसतात. इतिहासात नेटाने हिंदूंचे साम्राज्य साकारणार्‍या विजयनगरच्या साम्राज्याचे प्रतीक म्हणून ‘यज्ञवराह’ समोर आल्याचे इतिहास सांगतो. आजच्या वराह जयंतीच्या निमित्ताने भारतीय इतिहासातील वराहमहिमेचा घेतलेला मागोवा...
 
सर्वत्र पाणीच पाणी आहे, पृथ्वीच जणू आपल्या जागेवरून नाहीशी झाली आहे. हिरण्याक्षाने तिला रसातळाला नेले असून, सर्वच देव हतबल झाले आहेत. त्यामुळे सृष्टीची व्यवस्थाच कोलमडली. अशा वेळी भगवान विष्णू एक विलक्षण रूप धारण करतात, ते म्हणजे वराहाचे! वराहाच्या रूपातच ते त्या अथांग सागरात उतरून हिरण्याक्षाशी घनघोर युद्ध करतात. त्या युद्धात त्याचा वध करतात आणि आपल्या प्रचंड दंष्ट्रांवर पृथ्वीला अलगद उचलून, पुन्हा तिच्या मूळ जागी स्थापित करतात. वराहावताराची ही कथा आपण लहानपणापासून ऐकली असेल. पण, ही केवळ एका राक्षसाच्या वधाची कथा नाही. त्यातून भारतीय संस्कृती आपल्याला एक अत्यंत चिरंतन जीवनमूल्य प्रदान करते. जेव्हा भूमी रसातळाला जाते, जेव्हा व्यवस्था कोसळते. जेव्हा धर्माचा आधारच डळमळतो, तेव्हा तिचे पुनरुत्थान करण्यासाठी ईश्वर ‘वराह’ या एका अत्यंत वेगळ्या अवताराच्या रूपाने प्रकट होतो.
 
वराहाचे हेच रूप पुढे भारतीय तत्त्वज्ञानात आणखी विकसित झाले. यातूनच एक विलक्षण संकल्पना समोर आली, ती म्हणजे यज्ञवराह! भारतातील प्राचीन यज्ञवराह मूर्ती पाहिल्यास, त्या अक्षरशः थक्क करतात. एखाद्या प्रचंड वराहाच्या शरीरावर देवता, ऋषी आणि संपूर्ण दैवी विश्व कोरल्याचे चित्र आपल्याला त्यात दिसते. वराहाचे शरीर हे जणू विश्व असून, त्याचे वेगवेगळे अवयव यज्ञाच्या वेगवेगळ्या अंगांशी जोडल्याचे दिसते. कारण, भारतीय चिंतनात ‘यज्ञ’ म्हणजे केवळ अग्निकुंडात आहुती देणे नव्हे. व्यक्ती, समाज, निसर्ग आणि विश्व यांच्यातील विस्कटलेला समतोल पुन्हा प्रस्थापित करणे, ही यज्ञाची व्यापक कल्पना आहे. म्हणूनच, पृथ्वीला रसातळातून बाहेर काढणाराच वराह, पुढे विश्वव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करणारा यज्ञवराह झाला. शतकांमागून शतके गेली, पुराणातील कथा भारतीयांच्या स्मृतीत राहिली. वराहाच्या मूर्ती मंदिरांमध्ये उभ्या राहिल्या. राजांच्या मुद्रा आणि राजचिन्हांवरही वराह दिसू लागला. चालुयांसारख्या दक्षिणेतील प्रबळ राजघराण्यांनी वराहाला राजचिन्ह म्हणून स्वीकारले. वराह आता भूमीचे रक्षण करणार्‍या राजसत्तेचे प्रतीकही झाला.
 
चौदाव्या शतकात दक्षिण भारतात प्रचंड राजकीय उलथापालथ सुरू होती. उत्तरेकडून दिल्लीच्या सुलतानाची सत्ता दक्षिणेकडे विस्तारण्याचा तो काळ! जुन्या राजसत्ता कोसळत होत्या, युद्धे सुरू होती. याच काळात इतिहासात दोन भावांचे उदाहरण प्रसिद्ध आहे, ते म्हणजे हरिहर आणि बुक्क. भारतीय इतिहासानुसार युद्धाच्या धामधुमीत हे दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानाच्या हाती लागले. त्यानंतर त्यांना दिल्लीला नेऊन तिथे त्यांचे धर्मांतरण करण्यात आले. कालांतराने त्यांनी सुलतानाचा विश्वास संपादन केला. पण, इकडे दक्षिणेत असंतोष धुमसतच होता. विद्यारण्य स्वामींच्या प्रभावाखाली प्रतिकाराची प्रचंड शक्ती उभी राहत होती. ती मोडून काढण्यासाठी दिल्लीच्या सुलतानाने अखेर हरिहर आणि बुक्क या दोघांनाच दक्षिणेकडे पाठवले. ज्या सत्तेने या दोघांना आपल्या बाजूला वळवले, त्याच सत्तेने त्यांना पुन्हा त्यांच्या मातृभूमीत पाठवले. तिथेच त्यांची भेट झाली विद्यारण्य स्वामींशी!
 
विद्यारण्य स्वामींची परंपरा ‘वेद-वेदान्ता’ची होती; ‘शृंगेरीपीठा’चा प्रभाव त्यांच्यामागे होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, अस्थिर काळात हिंदू समाजाला पुन्हा उभे करण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. परंपरेनुसार हरिहर आणि बुक्क विद्यारण्यांना शरण गेले. स्वामींनी त्यांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. पण, केवळ धर्मात परत आणून विद्यारण्य थांबले नाहीत. आता प्रश्न दोन व्यक्तींचा नव्हता, प्रश्न होता या भूमीचे काय?
 
इथेच पुराणातील वराहकथा आणि इतिहासातील विजयनगराची कथा विलक्षण रीतीने एकमेकींसमोर येऊन उभ्या राहतात. एकीकडे रसातळाला गेलेली पृथ्वी, दुसरीकडे राजकीय अस्थिरतेत सापडलेली दक्षिण भारताची भूमी. तिकडे पृथ्वीच्या उद्धारासाठी वराह उभा राहतो. इकडे हरिहर-बुक्क दिल्लीच्या सुलतानाचे अधिपत्य झुगारून स्वतंत्र सत्ता उभी करण्याचा निर्धार करतात. एक प्रचंड मोठा लढा उभारला जातो आणि अखेर तुंगभद्रेच्या तीरावर एका नव्या साम्राज्याचा उदय होतो, ज्याचे नाव विजयनगर!
 
साधारण इ.स. १३३६ हे त्याच्या स्थापनेचे वर्ष मानले जाते. पुढे संगम, साळुव, तुळुव आणि अरविदू अशा राजघराण्यांच्या हातून हे साम्राज्य विस्तारत गेले. काही पिढ्यांनंतर कृष्णदेवरायाच्या काळात तर विजयनगर वैभवाच्या शिखरावरच पोहोचले. हम्पीची बाजारपेठ, मंदिरे, विशाल गोपुरे, साहित्य, संगीत, शिल्पकला, व्यापार आणि प्रचंड आर्थिक समृद्धी पाहून परदेशी प्रवासी चकित झाले. या साम्राज्याचे राजचिन्ह वराह होते. वराहासोबतच सूर्य, चंद्र आणि खङ्ग. सूर्य-चंद्र असेपर्यंत ही सत्ता टिकावी, खङ्गाने तिचे रक्षण व्हावे आणि मध्यभागी भूमीचा उद्धार करणारा वराह!
 
विद्यारण्य स्वामींनी या तरुणांना केवळ एक साम्राज्य स्थापन करण्यासाठी प्रेरित न करता, प्राचीन वैदिक परंपरेचे आणि प्रतीकांचे पुनरुज्जीवन घडवत या साम्राज्याला धार्मिक आणि आध्यात्मिक चेतना दिली. विद्यारण्यांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या या साम्राज्याने प्राचीन भारतीय वराह परंपरेला जाणीवपूर्वक पुनरुज्जीवित केले. पुराणातील वराह रसातळातून भूमी वर काढतो आणि इतिहासात आजूबाजूच्या राजवटी इस्लामी अंमलाला शरण जात असताना, विजयनगरचे साम्राज्य मात्र ठामपणाने पाय रोवून उभे राहते. इतकेच नव्हे, तर आपल्या संस्कृतीलाही पुन्हा आत्मविश्वासाने उभे करते, हे मांडणारे यापेक्षा उत्तम प्रतीक असूच शकत नाही!
 
भारतीय ज्ञानपरंपरेत यज्ञाचा अर्थ, ‘यजन करून समाज, लोक आणि प्रकृतीच्या कल्याणार्थ कार्यप्रवण होणे.’ अशी सर्वार्थाने लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे आणि सातत्याने यजन करत तिचे पालनपोषण करणे, म्हणजेच यज्ञ! या परंपरेत राजा हा भूमीचा मालक नसून, तिचा पालक असतो. समस्त चर-अचरांचे पालन आणि योगक्षेम विष्णुरूपाने सांभाळणे, हा राजधर्म आहे. याच परंपरेत वराह हा त्या राजधर्माची आठवण करून देणारे आणि सातत्याने राजधर्माचे पालन करण्यास प्रेरित करणारे प्रतीक आहे.
 
वास्तवात विजयनगरचे राजे हे परंपरेने शैव होते. तरीही, त्यांनी हे प्रतीक स्वीकारले. कारण, भूमी अस्तित्वात नसतानाही कृतांतकाळाशी लढून आपली भूमी परत मिळवणारा आणि धर्म व संस्कृतीची पुनर्स्थापना करणारा वराह भविष्यातील राजवटींना प्रेरित करण्याचे काम करेल, अशी त्यांची धारणा होती. तसेच सनातन धर्माच्या वैदिक संस्कृतीशी जुळलेली नाळही यातून कायम राहते. विजयनगरच्या वराहाकडे पाहताना, त्यामागे हजारो वर्षांची भारतीय स्मृती ही दिसते. पृथ्वी कितीही खोल रसातळाला गेली, तरी तिचा उद्धार होऊ शकतो. व्यवस्था कितीही विस्कटली, तरी ती पुन्हा उभी राहू शकते. समाज कितीही पराभूत वाटला, तरी त्याच्यातून पुनरुत्थानाची शक्ती जन्म घेऊ शकते, असा संदेशच वराह देत असतो
 
हरिहर-बुक्काची कथा तर त्या संदेशाला आणखीच विलक्षण करते. शत्रूच्या ताब्यात गेलेले, धर्मांतरित झालेले आणि त्याच सत्तेचे प्रतिनिधी म्हणून परत आलेले दोन पुरुष; पुढे त्याच मातीत स्वतंत्र साम्राज्याची पायाभरणी करतात, यापेक्षा पुनरुत्थानाचे अधिक नाट्यमय प्रतीक कोणते? ‘वराह जयंती’ ही केवळ भगवान विष्णूच्या एका अवताराची जयंती म्हणून पाहणे अपुरे आहे. ती भारतीय संस्कृतीच्या एका विलक्षण आशावादाची आठवण आहे. भारतीय मन पराभवाला अंतिम सत्य मानत नाही. पुराणात पृथ्वी रसातळाला जाते; पण कायमची नाही. तिच्यासाठी ‘वराह’ अवतार होतो. इतिहासात साम्राज्ये कोसळतात; पण त्यातूनच विजयनगरही उभे राहते. काळ बदलतो, रसातळ बदलतात, संकटांची नावे बदलतात; पण संदेश तोच राहतो. भूमी बुडू शकते, संस्कृती डळमळू शकते, समाज पराभूत होऊ शकतो; पण त्यातून पुन्हा वर येण्याची जिद्द जिवंत असेल, तर प्रत्येक युग आपला वराह जन्माला घालू शकते. म्हणूनच, ‘यज्ञवराह’ भारतीय पुनरुत्थानाचा चिरंतन मंत्र आहे.

- गीता गोखले




संबंधित मजकूर