उलगडा दहशतवादामागील आर्थिक साखळीचा...

    13-Sep-2026






 
 Terror Funding in India
दहशतवाद हा जगासमोरील सर्वांत मोठा शत्रू असून, अनेक देश त्याने त्रस्त आहेत. आजवर दहशतवादाला हरवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या, तरीही सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादातील उंदीर-मांजराचा खेळ आजही सुरूच आहे. या शत्रूचा पुरता बिमोड करण्यासाठी, जगातील सुरक्षा यंत्रणांनी आर्थिक नाड्या आवळण्याचे हत्यार उचलले आहे. अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दहशतवाद आणि त्यातील आर्थिक साखळीचा मागोवा घेणारा लेख...
 
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे दि. ९ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला करणारे ‘अल कायदा’चे अनेक महत्त्वाचे म्होरके जसे ओसामा बिन लादेन, जवाहिरी वगैरे मारले गेले असले, तरी या गटाचे दहशतवादी आता सोमालिया व पश्चिम आफ्रिकेतील साहेल प्रांतातूनही सक्रिय आहेत. शिवाय, ‘इसिस’ही अनेक भागांतून हल्ले करत आहे. भारतात वरील दहशतवादी गटांबरोबरच, ‘लष्कर-ए-तोयबा’ही गेली अनेक दशके दहशतवादी हल्ले करत आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यातही हजारो लोकांचा नाहक बळी गेला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची परिस्थिती व त्यापूर्वीची भारतातील परिस्थिती यामध्ये जमीन-आसमानाचा फरक पडल्याचे दिसते.
 
२०१४ पूर्वी दिल्ली, जयपूर, मुंबई, नागपूर, पुणे बंगळुरू, हैद्राबाद, कोईम्बतूर अशी भारतातील मोठी शहरे अनेकवेळा दहशतवाद्यांचे लक्ष्य झाली. २०१४ नंतर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले झाले. परंतु, २०१९ मध्ये ‘कलम ३७०अ’ रद्द केल्यावर या हल्ल्यांचे प्रमाणही कमी झाल्याचे चित्र आहे. २०२५ मध्ये लाल किल्ल्याजवळ एका दहशतवाद्याने केलेल्या स्फोटात १४ जणांचा बळी गेला. बाकीच्या दहशतवाद्यांनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला; परंतु तत्पूर्वीच त्यांना पकडण्यात आल्याने त्यांना यश मिळाले नाही. सध्या दहशतवादी प्रयत्न करण्याच्या आधीच, जागरूक सुरक्षा यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करत असल्याचे चित्र दिसते आहे.

जागतिक स्तरावर ‘इंटरपोल’, तसेच विविध मित्रराष्ट्रांमधला समन्वय व संयुक्त राष्ट्रेदेखील दहशतवादाविरुद्ध काम करत आहेत. भारतात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात, ‘एनआयए’ आणि सर्व राज्यांतील ‘एटीएस’ एकमेकांशी समन्वय ठेवून, दहशतवादविरोधी कारवाया करत असतात. याशिवाय, ‘एनसीबी’ ही संस्थाही अमली पदार्थांविरोधी कारवाई करते. महाराष्ट्रात ‘सीआयडी’मध्येही अमली पदार्थविरुद्ध ‘टास्क फोर्स’ची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून मिळालेल्या पैशातून अवैध शस्त्रे, दारुगोळा दहशतवाद्यांना पुरवणे, हे नेहमीचेच. आर्थिक दहशतवादाविरुद्ध ‘ईडी’ ही संस्था कारवाई करते. सायबर गुन्ह्यांविरुद्ध केंद्र व राज्य पातळीवर विशेष यंत्रणेचीही निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व सुरक्षा यंत्रणांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालय व त्याअंतर्गत काम करणार्‍या सुरक्षा यंत्रणा सतत जागरूक राहून माहितीचे आदान-प्रदान करून समन्वय राखत असतात.
 
भारताबाहेरील दहशतवादी नवनवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहेत. यावर उपाय करण्यासाठी भारतातील पोलीस यंत्रणाही नवीन प्रशिक्षण व पायाभूत सुविधांचा सक्षमतेने वापर करत आहेत. परंतु, ही न संपणारी प्रक्रिया आहे. दहशतवादामुळे बळी ठरलेल्या अनेक देशांनी जसे- इस्रायल, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, भारत, रशिया हे देश एकत्र येऊन दहशतवादाच्या नवीन गुन्हेगारीविरुद्ध एकत्रितपणे प्रतिकार करीत आहेत.
 
दहशतवादाचा सामना करणे, ही सर्व लोकशाहीप्रेमी राष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा, तसेच जबाबदार नागरिकांची संयुक्त जबाबदारी आहे. दहशतवादाविरोधी आधुनिक तंत्रज्ञान, तसेच व्यक्तिकेंद्रित माहिती अचूकपणे मिळवणे आवश्यक आहे. अलीकडे ‘एआय’च्या मदतीने अचूक माहिती मिळविणे शय आहे. तसेच मोबाईलमुळेही दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण समजण्यास मदत होते. परंतु, तरीही दहशतवाद्यांची अचूक माहिती मिळविण्यासाठी ‘पोलीसमित्रां’ची आवश्यकताही मोठीच आहे. सुरक्षा यंत्रणा व सामान्य माणसातील दूरी कमी करण्याचे काम पोलीसमित्र करतात. आजूबाजूला घडणार्‍या संशयास्पद हालचालींची माहिती, हे पोलीसमित्र सुरक्षा यंत्रणांना त्वरित देतात.
 
दहशतवादामध्ये देशांतर्गत दहशतवादी कारवाई करणारे व देशाबाहेरील दहशतवादाला प्रोत्साहन देणारे, असे दोन मुख्य गट आहेत. देशामध्ये होणार्‍या दहशतवादी कारवाया रोखण्यात, आपला देश मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे. परंतु, भारताचे शत्रू भारतीय जनतेत धर्म, प्रांत, लिंग, भाषा, जात अशा विविध मार्गांनी असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी तुमच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांना भासवून, त्याचा प्रतिकार करण्यासाठी प्रशिक्षण, शस्त्रे, अमली पदार्थ, दळणवळणाची साधने अशी मदत करत आहेत. शिवाय, जनतेचा बुद्धिभेद करून भारतातील सुरक्षा यंत्रणांविरुद्ध सतत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचाही प्रयत्न करत आहेत. त्यातच ‘पेड न्यूज’, ‘फेक न्यूज’, ‘फेक व्हिडिओज’ पसरविण्याचे तंत्रही मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आले आहे.
 
दहशतवादी देशातील लोकांकडूनच दहशतवादासाठी निधी मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे, हवाला, भारतातील व बाहेरील लोकांकडून देणग्या, खंडणी, शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे खोटे आमिष, अमली पदार्थांच्या विक्रीसारखे मार्ग स्वीकारतात. सायबर गुन्ह्यात लुबाडलेले कोट्यवधी रुपये, पाकिस्तानात दहशतवाद्यांना पोहोचत असल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय अहे. अनेक बँकेचे अधिकारी, ‘सीए’, खोटे खातेधारक हे यांना सहकार्य करत आहेत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात, ‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेवर तर सरकारने बंदी घातली असून, त्यानंतर ‘ईडी’ने केलेला तपास अभ्यासणे महत्त्वाचे आहे.
 
आर्थिक गुन्हे व दहशतवाद : ‘ईडी’ने केलेल्या तपासात गेल्या काही वर्षांत ‘पीएफआय’च्या खात्यात १२० कोटी रुपये जमा झाले. हे पैसे भारतातून, तसेच परदेशातून आले असून, त्यांचा उपयोग गैरकायदेशीर कृत्यांसाठी केला गेल्याचे उघड झाले आहे. त्यांचा उपयोग करूनच २०२० मध्ये दिल्लीत दंगे घडवण्यात आले, तसेच ‘पीएफआय’चा सदस्य आणि ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा राष्ट्रीय सचिव असलेल्या के. ए. रौफ शरिफने परदेशातून १.३६ कोटी जमा करून हे पैसे निर्यातीसाठी असल्याचेही त्याने दाखवले. त्याने उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दंगल घडवण्यासाठीही चार लोक पाठवल्याचे समोर आले आहे. याच आरोपाखाली त्याला फेब्रुवारी २०२१ मध्ये अटक करण्यात आली.
 
‘ईडी’च्या तपासाप्रमाणे, केरळम्च्या ‘मुन्नर व्हिला विस्टा’ या गृहप्रकल्पात मिळवलेले पैसे तिकडे वळवायचे होते. ‘पीएफआय’चा कोषाध्यक्ष पी. कोया याने ‘ईडी’समोर परदेशी निधी मिळवल्याचे अमान्य केले. पण, ‘ईडी’च्या तपासाप्रमाणे हे पैसे ‘हवाला’मार्गे ‘पीएफआय’च्या सदस्यांच्या खात्यात आल्याचे समोर आले आहे. १२० कोटी रुपयांचा तपास यंत्रणा करीत आहे. मल्लपुरम् व कोझिकोडे या जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक यांनी ‘पीएफआय’च्या खात्यात पैसे पाठवल्याचे आढळले आाहे. मल्लपुरम् येथे राहणार्‍या अबू बकर पझेदाथ याच्या निवासस्थान व कार्यालयातून सोने व मोठी रोकड रक्कम ‘ईडी’ने नुकतीच जप्त केली. राजनैतिक अधिकार्‍यांना असलेल्या सवलतींचा गैरफायदा घेऊनच हे सोने भारतात आणल्याचा संशय यंत्रणांना आहे. या व्यक्तीचा ‘पीएफआय’शी थेट संबंध नसला, तरी बंदी घालण्यात आलेल्या या संघटनेच्या खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचा संशय त्याच्यावर आहे. अबू बकरशी संबंधित असलेल्या अन्य काही उद्योजकांच्या कागदपत्रांचीही तपासणी केल्यावर काहींनी आपल्याकडील काळा पैसा ‘पीएफआय’ला देणगी दिल्याचे वृत्त आहे. कोट्टाकल, चनकुवेट्टी, इदरीकोड, रानदधानी आणि पोनमला या मल्लपुरम् जिल्ह्या फर्निचरचे व्यापारी, दागिन्यांचे दुकानदार, पर्यटन व्यावसायिक यांच्या कार्यालयांची झडती घेऊन काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ‘पीएफआय’चा नेता मोहम्मद शेफिकने दिलेल्या माहितीनुसार, आता तपास होत आहे. हेच पैसे २०२० सालच्या दिल्ली दंगलीत खर्च झाल्याचाही आरोप आहे.
 

दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ईडी’ने ५६.५६ कोटी रुपयांच्या ३५ स्थावर मालमत्ता जप्त केल्याचे जाहीर केले. या सगळ्या मालमत्ता-मिळकती ‘पीएफआय’ नियंत्रित करीत होती आणि त्याचा फायदा त्यांनाच मिळत होता. तपासात हेदेखील निष्पन्न झाले की, ‘पीएफआय’चे आखाती देश असलेल्या कुवेत, ओमान, कतार, सौदी अरब, यूएई आणि सिंगापूरमध्ये १३ हजार सक्रिय सदस्य आहेत. भारताबाहेरील या लोकांची ‘डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह कमिटी’ स्थापन करून, त्यांना निधी गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. हा निधी ‘हवाला’, तसेच संशयित बँक माध्यमातून ‘पीएफआय’च्या दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाई. पैसे देणार्‍याचे नाव कळणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जात असे. ‘पीएफआय’च्या घटनेतील समाजसेवेच्या उद्दिष्टांसाठी हा पैसा वापरला जाई. अर्थात, याचा वापर भारतात ‘जिहाद’मार्गे इस्लामिक चळवळ वाढवण्यासाठीच होत असे. त्याचा उपयोग करून समाजात विद्वेष पसरवणे, अशांतता निर्माण करणे, भारताच्या सार्वभौमत्वाला हानी पोहोचवणे, गृहयुद्धाची तयारी करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी शारीरिक शिक्षणाच्या नावाखाली ठोसे, लाथा मारणे, लाठी चालवणे, सुरा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन गृहयुद्धाची तयारी करून घेतली जाई. यामध्ये समाजात संघर्ष निर्माण करून गृहयुद्धाची तयारी करण्याच्या पायर्‍या निश्चित करण्यात आल्या होत्या; ज्यात अहिंसक हवाईहल्ले, गनिमी युद्ध आणि पर्यायी संवाद-प्रणाली इत्यादींचा समावेश होतो. क्रूरता आणि दडपशाहीच्या पद्धतींमध्ये अधिकार्‍यांना त्रास देणे, अधिकार्‍यांची टिंगल करणे, बंदी करण्याचा समावेश होता. भारताच्या सार्वभौमत्व आणि नागरिकांमधील एकीला क्षतिग्रस्त करण्यासाठी कायदे भंग करणे, दुहेरी सार्वभौमत्वाचा प्रसार करणे, समांतर सरकार चालवणे, गुप्तहेरांची माहिती उघड करण्याचा प्रकारही समाविष्ट करण्यात आले होते. हे सर्व प्रशिक्षणवर्ग बनावट नावाने चालवले जात. ‘पीएफआय’च्या नावे एकही जागा नव्हती. अशाच एका वर्गात २०१३च्या शस्त्र प्रशिक्षणाचा समावेश होता. यात दारुगोळा व शस्त्रांच्या आधारे दोन धर्मांत तेढ निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांना तयार केले जात होते.
 
यामुळे सामान्य व्यक्तींनीही जागरूक राहून कळत-नकळत आपण दहशतवादी कृत्यांना मदत करत नाही ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही लढाई आपण सर्व मिळूनच जिंकायची आहे व आपले स्वातंत्र्य अबाधित राखायचे आहे.
 

प्रवीण दीक्षित
(लेखक महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक आहेत.)




संबंधित मजकूर