दि. ११ सप्टेंबर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा जन्मदिवस. ‘सब समाज को साथ लिए’सोबतच ‘न हिंदू पतितो भवेत|’, ‘जो जे वांछील तो ते लाहो’ अशा विचारांनी, सज्जनशक्तीला प्रेरणा देणारे सरसंघचालक. अनेकदा त्यांना भेटण्याचा योग आला. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून आयुष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आणि दिशा मिळाली. त्यांच्याकडून मिळालेल्या अनमोल दिशेचा आढावा घेणारा लेख...
आम्ही महिलांचा उद्धार करू किंवा त्यांना सक्षम करू,” हा पुरुषांचा अहंकार चुकीचा आहे. महिला स्वतः प्रगती करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. पुरुषांनी फक्त त्यांच्या मार्गातील जुनाट रूढी-परंपरांचे अडथळे दूर करून, त्यांना समान संधी आणि पाठबळ दिले पाहिजे. महिलांच्या सहभागाशिवाय देशाचा विकास होऊच शकत नाही. भारतात स्त्रियांना केवळ मानवी पातळीवर समान मानले गेले नाही, तर त्यांना ‘शक्तिस्वरूप’ आणि ‘मातृस्वरूप’ मानून पूजनीय स्थान दिले आहे. स्त्रियांमध्ये कुटुंबासोबतच संपूर्ण समाजाचा उद्धार करण्याची नैसर्गिक क्षमता असते.” सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले आणि त्यानंतर तथाकथित पुरोगामी आणि खोट्या मुक्ततेच्या वल्गना करणार्या काही लोकांनी अकलेचे तारे तोडले की, ’सार्वजनिक ठिकाणी भागवत असे बोलतात. प्रत्यक्षात, ते स्त्री आणि पुरुष समानता मानत नसतील’ पण, या लोकांचे म्हणणे अजिबात खरे नाही. कारण, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत स्त्री-पुरुष समानताच नव्हे, तर सर्व भेदाभेद टाळून, माणूस एकच असल्याचे मानणारे आहेत. याच विचाराप्रमाणे विचारवर्तन करणारे असल्याचे मी स्वतः अनुभवले होते.
त्याचे झाले असे की, बडोदा येथे समरसतेसंदर्भातले शिबीर (अभ्यासवर्ग) एका देवस्थानात होते. नेहमीप्रमाणेच तिथे महिला आणि पुरुषांची निवास व्यवस्था वेगवेगळी आणि एकमेकांपासून दूर होती. मात्र, अभ्यासवर्गाच्या सभागृहाची व्यवस्था अशी होती की, पुरुष कार्यकर्ता सर्वत्र जाऊ शकत होते. मात्र, महिलांना सर्वत्र जाण्यासाठी मर्यादा होत्या नव्हे, महिलांना जाण्याची मुभाच नव्हती. स्त्री म्हणून दुय्यम वागणुकीचा अनुभवच होता तो. महिला तिथून का जाऊ शकत नाही, विचारल्यावर तिथल्या प्रमुखाचे म्हणणे होते की, ’इथे अमूक एक महाराजांचे निवासस्थान होते आणि त्यांना स्त्रियांची सावलीही चालत नाही.’ हे ऐकून, समरसतेच्या अभ्यासवर्गासाठी आलेल्या आम्हां सर्व महिला कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले आणि संतापही आला.
या भेदभावाला विरोध करायचा आणि तिथून निघायचे, असे आम्ही ठरवले. काही वेळाने सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आले. त्यांचे कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन होणार होते. आम्ही महिला दुसर्या भागात दूर बसलो होतो. सरसंघचालकांना भेटून याबद्दल सांगायचे असे आम्ही ठरवले. आम्ही त्यांना भेटल्यावर, त्यांनी सगळ्यांचीच विचारपूस केली. ते म्हणाले, ”तुम्ही सर्वजणी समरसतेच्या प्रवाहात प्रमुख आहात. तुमचे अनुभव ऐकायचे आहेत.” यावर आम्ही म्हणालो, ”इथे आम्हाला महिला म्हणून भेदभाव अनुभवण्यास मिळाला. आम्हाला त्या प्रमुख सभागृहामध्ये बसून संवाद साधता येणार नाही; कारण तिथपर्यंत जाण्यासाठीचा जो मार्ग आहे, तिथे महिलांचा प्रवेश निषिद्ध आहे.” हे ऐकताच डॉ. मोहनजी भागवत यांनी, तिथल्या तिथे वास्तूच्या विश्वस्तांना पाचारण केले आणि म्हणाले, ”मातृशक्तीची सावली वर्ज्य आहे? कशी काय? या देवस्थानातला देव सर्वांचा असून, आपल्या सर्वांठायीच तो आहे. देवाला मातृशक्तीची सावली काय, पूजा-अर्चाही चालते. आपल्या परंपरेत तर देवानेही मातृशक्तीच्या पोटी जन्म घेतला. मातृशक्तीबाबत असे वर्तन होणार असेल, तर इथे समरसतेचा अभ्यासवर्ग घेणे अजिबात योग्य नाही, असे मला वाटते.” भागवतजी बोलत होते आणि त्या विश्वस्तांना काय बोलावे, सुचत नव्हते. शेवटी ते म्हणाले, ”मलाही व्यक्तिशः हे पटत नव्हते; पण पूर्वीची प्रथा कशी तोडायची, असा मनात विचार यायचा. तुम्ही यावर विचार व्यक्त केले आणि मला पाठबळ मिळाले. आजपासून हा भेदभाव इथे होणार नाही. मातृशक्तीचा अपमान झाला, त्याबद्दल मी क्षमा मागतो. ” त्यांच्या डोळ्यांत पाणी होते. अत्यंत आदराने ते विश्वस्त आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हा सर्व भगिनींना मुख्य सभागृहामध्ये आणले. इतकेच नाही, तर जेवणाच्या पंक्तीतही ते आमच्याच सोबत होते. त्यावेळी मी पाहिलेले सरसंघचालक हे सर्व भेदभावांच्या पलीकडे गेलेले, मानवतेच्या समानतेचे, समरसतेचे उद्घोषकर्ते होते. तिथे कोणतेही माध्यम नव्हते की, त्यांचे हे वागणे सगळीकडे समाज माध्यमांवर प्रसारित होईल. त्यांचे ते वागणे अंतरात्म्यातून आलेले सहज सत्य होते.
दुसरी घटनाही अशाच एका कार्यक्रमातील. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले की, समाजाच्या एकतेसाठी समरसतेसाठी आपण आपल्या स्तरावर काय करत आहोत? जातिभेद मिटवत आपण सगळे एक आहोत, भारतीय आहोत, हा समरस भाव निर्माण व्हावा, यासाठी आपण काय करता? या प्रश्नावर देशभरातल्या स्वयंसेवकांनी आपले मत मांडण्यास सुरुवात केली. त्यातल्या अनेकांची मनोगते अशी होती की, आम्ही त्यांच्या घरी जातो आणि त्यांच्या झोपडीत त्यांच्यासोबत त्यांच्या घरी जी रोटी-चटणी असेल ती खातो. काहींनी सांगितले, आम्ही आमच्या घरी पूजा ठेवतो आणि त्यांना पूजेला बोलावतो. काहींनी सांगितले की, आम्ही त्यांना वेळोवेळी भेटून, त्यांची विचारपूस करतो. आमच्या घरात ते आणि त्यांच्या घरात आम्ही बंधुभावाच्या नात्याने वावरतो. हे सगळे ऐकून सरसंघचालक म्हणाले, ”हे सगळे ठीकच आहे, पण गावातल्या प्रमुख मंदिरात सगळ्याच बांधवांना प्रवेश आहे का? गावातल्या एका पाणवठ्याचा, म्हणजे, नदी-तलाव वगैरे जलस्रोत्रांचा वापर सगळ्याच समाजाचे बांधव करू शकतात का? बरं, गावात सगळ्यांसाठी एकच स्मशानभूमी आहे का? जोवर गावात सर्वच गावकर्यांसाठी मंदिर प्रवेश, जलाशय आणि एक स्मशान असे वास्तव निर्माण होत नाही, तोपर्यंत आपल्या समाजात समरसतापूर्ण वातावरण आहे, असे म्हणू शकत नाही. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया की, भारतभूच्या दहा दिशांमध्ये, समरसतेचे गीत असावे. एकच मंदिर, एक जलाशय, एकच स्मशान असावे.” सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे हे विधान ऐकून, उपस्थित आम्हा सर्वांच्या विचारांना दिशा मिळाली. सरसंघचालकांनी हिंदू समाजाच्या समरसतेसाठी केलेले ‘एक मंदिर-एक जलाशय-एक स्मशान’ हे सूत्र समरसतेचा मार्ग दाखवणारे होते.
त्यामुळेच समरसतेच्या तत्त्वप्रणालीवर विश्वास असणार्या सरसंघचालकांचे विचार, संकुचित विचारांच्या लोकांना पचायला जड जातात. मागे संत रविदासांच्या जयंतीनिमित्त त्यांनी मांडलेले विचारही, सर्वार्थाने समरस समाजाच्या जगण्याचा मार्ग सांगणारेच होते. संत रविदासांनी गौरवान्वित केलेली श्रमप्रतिष्ठा, गोरगरिबांच्या न्यायासाठीचा आवाज हे सगळे आजच्या काळाशी कसे सुसंगत आहे, कसे गरजेचे आहे, हे सरसंघचालकांनी अत्यंत प्रखरपणे मांडले. जातिभेदावर प्रहार केला मात्र, यावरही काही लोकांना पोटशूळ उठला. कारण रा. स्व. संघाचे सरसंघचालक भागवत हे चर्मकार समाजाच्या मेळाव्याला जातात; मग संघ उच्च वर्णीयांचा आहे, ब्राह्मणधार्जिणा आहे, मागासवर्गीय समाजाच्या विरोधात आहे, असे धादांत खोटे नॅरेटिव्ह समाजात पोहोचवू शकत नाही. म्हणूनच काही विघातक वृत्तींची तडपड झाली, आणि तेव्हा त्यांनी ‘पंडित’ वगैरे शब्दांवरून शक्तिहीन वादळ उठवण्याचा प्रयत्न केला. पण, समाजाला सत्य माहीत होते. तसेच, सरसंघचालक हे नुकतेच परदेशातही गेले होते. तिथेही त्यांनी लोकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ’मुस्लिमांना भारतातून हाकलवून द्या, म्हणणारे हिंदू असूच शकत नाही.’ त्यांच्या म्हणण्यावर वादळ उठले. जणू काही रा. स्व. संघाचा जन्म हा मुस्लिमांचा पृथ्वीतलावावरून नाश करण्यासाठीच झाला होता की नाही! याच आविभार्वात काँग्रेस, मुस्लिमांचा नवीन नवीन कैवार झालेला उबाठा पक्ष आणि त्यांचे समविचारी अगदी सैरभैर झाले. रा. स्व. संघाचे सरसंघचालक हिंदूंना दुय्यम लेखून, मुस्लिमांचे समर्थन करतात, असे बिनबुडाच्या चर्चा ते करू लागले. याच विषयावर एका चॅनेलच्या कार्यक्रमात यावर चर्चा करण्यासाठी मलाही बोलावले होते. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आणि उबाठाच्या प्रवक्त्यांनी संघ कसा जातिवादी असून, सरसंघचालक आताच का मुस्लिमांची बाजू घेतात, असे आरोप करण्यास सुरुवात केली. पण सरसंघचालक काय आताच असे म्हणाले होते का? २०१८ सालीही ते म्हणालेच होते की, ’भारतीय मुस्लिमांचा आणि आपला डीएनए एक आहे.’ ते अशी भूमिका मांडतात, कारण तेच खरे आहे. भारतातले कोट्यावधी मुस्लीम काय अरेबिक देशातून आलेले किंवा औरंग्याच्या उझबेकिस्तान की मंगोलच्या चंगेझखानचे वंशज आहेत का? तर नाही, हजार वर्षे अनन्वित अत्याचार करून, जीवे मारण्याची धमकी देऊन किंवा आमिष देऊन तत्कालीन हिंदूंचे धर्मांतरण केले गेले आणि मुस्लीम जनसंख्या वाढवली गेली, हा इतिहास आहे. आजच्या मुस्लिमांच्या चार-पाच पिढ्या मागे गेल्यास वंशावळीमध्ये समजते की, त्यांचे पूर्वज हिंदूच होते! हेच सत्य सरसंघचालकांनी मांडले. पण, हे सत्य विघातक शक्तींना कसे पचणार?
असो! सत्य आणि न्याय विचारांवर आधारित असलेले सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विचार, नेहमी मार्गदर्शन करतात. दोन वर्षापूर्वी सरसंघचालकांची सामाजिक कार्यकर्ता आणि विचारवंतांसमवेत बैठक होती. त्यावेळी कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी सरसंघचालकांना सांगितले की, "योगिता ‘लव्ह जिहाद’विरोधात जागृती सभा घेते. शेकडो सभा झाल्या आणि अनेक घटना उघडकीस येऊन त्यांवर कारवाईही झाली.” त्यावेळी सरसंघचालकांच्या आजूबाजूला अनेक महनीय व्यक्तींचा गराडाच होता. त्या सगळ्यांना सरसंघचालकांशी महत्त्वाचेच बोलायचे होते. पण, कांबळे सरांचे म्हणणे ऐकल्यानंतर सरसंघचालक स्वतः माझ्याकडे आले आणि म्हणाले, "या कामासाठी धाडस लागते. खरंच हे काम गरजेचे आहे, तुला अनेक आशीर्वाद!" प्रत्यक्ष सरसंघचालकांनी ‘लव्ह जिहाद’विरोधी कार्याची दखल घेतल्यामुळे, त्यानंतर अर्थातच ‘लव्ह जिहाद’विरोधी कार्याला शतपटींनी गती मिळाली, हे काय सांगायला हवे! तसेच मी पत्रकारितेकडे वळण्याचे एक मोठे कारण हेसुद्धा आहे की, सरसंघचालकांनी अशाच एका कार्यशाळेत १४ वर्षांपूर्वी आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, ”आजच्या मीडियामध्ये कुणाला प्रसिद्धी मिळते? नेता, अभिनेता, गुन्हेगार किंवा तत्सम लोकांना? पण समाजात, वस्तीपातळीवर गावखेड्यात शहराच्या गल्लोगल्ली सामान्य माणसाचा जो संघर्ष आहे, त्यातून तो जो मार्ग काढतो, ते यश नाही का? समाजाच्या प्रत्येक स्तरावर समाज आणि देशाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी योगदान देणारे लोक आहेत. आपल्याला आता अशा पत्रकारांची, साहित्यिकांची, लेखकांची, कलाकारांची गरज आहे, जे सामान्य लोकांना जगाच्या पटलावर आणतील, सामान्यांचे प्रश्न आणि यशासाठी काम करतील.” तो दिवस आणि आजचा दिवस आहे, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या आवाहनामुळे प्रेरणा घेऊन, सामान्यांच्या प्रश्नासांठी त्यांच्या न्यायासाठी लिहिणारे, काम करणारे अनेक साहित्यिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले. त्या कार्यशाळेत मीसुद्धा होते आणि आज जे काही ’दै मुंबई तरूण भारत’या माध्यमातून सामाजिक न्यायासंदर्भात लिहीत आहे, त्यात सरसंघचालकांच्या आवाहनाची प्रेरणा आहे, हे नक्की! सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विचारकार्य करोडो भारतीयांनाच नव्हे, तर जगभरातल्या सज्जनशक्तींसाठी प्रेरणादायी आहे.
योगिता साळवी
९५९४९६९६३८