जगाच्या तत्त्वज्ञानाला गवसणी घालणार्या श्रीज्ञानेश्वरीचा प्रारंभ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गणेशस्तवनाने केला आहे. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची अलौकिक दिव्य ऋतंभरा प्रज्ञा साक्षात श्रीज्ञानेश्वरीच्याच रूपाने साकारली असल्याने, ती नित्यनूतनच भावदर्शन करणारी आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ ज्या गणेशवंदनेने केला, ती वंदना वाचत असता, माऊलींच्या शब्दस्पर्शाचे वेगळेपण सहज मनात भरते. ॐ हे गणेशाचे प्रतीक आहे. वरील ओवीत वर्णन केलेले ॐकारस्वरूपी परब्रह्म म्हणजेच सकलांच्या बुद्धीचा दाता अर्थात श्रीगणेश. श्रीगणराजांना प्रत्येक पूजेत अग्रपूजेचा मान असल्याने, माऊलीसुद्धा मंगलाचरणात गणपतीसच वंदन करतात. संत वाङ्मयातील गणेशाच्या मंगलाचरणावर स्वतंत्र लेखन होईल, इतया प्रासादिक ओव्या आपल्याला दिसतात. माऊली लिहितात,
ॐ नमोजी आद्या| वेदप्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा॥
श्रीगणेश हे आत्मरूप असून, ते आत्मरूप स्वसंवेद्य आहे. म्हणजेच ते कुणीही घडवलेले नाही. जे घडवले जाते, ते सामान्यांचे रूप. जे विशेष रूप असते, ते घडले जाते, म्हणजेच ते स्वयंभू असते.
देवा तूंचि गणेश|सकळार्थमतिप्रकाश॥
म्हणे निवृत्तिदास| अवधारिजो जी॥
देवा, तूच शब्दसृष्टी आहेस. कल्पना करा की सृष्टीतून शब्दच मावळल्यास काय होईल, व्यवहारच संपेल की नाही. त्या भगवतीने देवाच्या शक्तीने, देवांच्या कृपेने सृष्टी निर्माण केली. नंतर तिचे पालन करण्यासाठी, तिने लोकपालही निर्माण केले. या लोकपालांचे अधिपतीच गणराज आहेत. गणांचे अधिपती म्हणून मंगलमूर्तीला अग्रपूजेचा मान दिला आहे. ओवी क्रमांक २ ते ओवी क्रमांक २० पर्यंत, या शब्दब्रह्म रूपी श्रीगणेशांचे वर्णन आहे. तेथे श्रीगणेशांना ‘हे शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ति सुवेष|’ अर्थात अशेष शब्दब्रह्म अथवा अर्थज्ञानाचे स्फुरण हीच सुमंगल मूर्ती आहे, असेही म्हटले आहे. वैदिक वाङ्मयाच्या समस्त विस्ताराला; म्हणजेच वेद, शास्त्र, स्मृति, पुराणे, काव्य, नाटक, यांना शब्दब्रह्म, वाग्ब्रह्म म्हटले जाते.
माऊलींनी येथे वर्णिलेल्या शब्दब्रह्मरूपी श्रीगणेशांना सहा हात आहेत. या सहाही हातांचे व त्यांतील आयुधांचे क्रमशः विवरण, माऊलींनी प्रथम अध्यायातील नमनाच्या ओवी क्रमांक १० ते १५ अशा केवळ सहाच ओव्यांमधून अत्यंत मार्मिकतेने केले आहे. त्या रूपवर्णनपर सहा ओव्या पुढीलप्रमाणे;
देखा षड्दर्शनें ह्मणिपती|
तेचि भुजांची आकृती|
ह्यणऊनि विसंवाद धरिती|
आयुधें हातीं॥१०॥
तरी तर्कु तोचि फरशु|
नीतिभेदु अंकुशु|
वेदान्त तो महारसु|
मोदक मिरवे॥११॥
एके हातीं दंत| जो स्वभावता खंडित|
तो बौद्धमतसंकेत| वार्तिकाचा॥१२॥
मग सहजें सत्कारवाद|
तो पद्मकर वरद|
धर्मप्रतिष्ठा तो सिद्ध| अभयहस्त॥१३॥
देखा विवेक तंव सुविमळ|
तोचि शुंडादंड सरळ|
जेथ परमानंद केवळ| महासुखाचा॥१४॥
तरी संवाद तोचि दशन|
जो समताशुभ्रवर्ण|
देव उन्मेषसूक्ष्मेक्षण| विघ्नराज॥१५॥
माऊलींच्या सांगण्याप्रमाणे सहा वैदिक दर्शने, हेच श्रीगणेशांचे सहा हात आहेत. यात दोन-दोन हातांच्या तीन जोड्या आहेत. त्या हातांमध्ये श्रीगणेशांनी काही आयुधे धरली असून, त्या हातांच्या रूपातील दर्शनशास्त्रांचे प्रतिपाद्य विषय हीच ती आयुधे होत. शिवाय, श्रीगणेशांचा ‘शुंडादंड’ सरळ आहे. येथे माऊलींनी वर्णन केलेल्या गणेशांची सोंड सरळ आहे, डावीकडे-उजवीकडे वळलेली नाही. श्रीगणेशांचा पूर्ण असलेला एक दंत शुभ्र आहे. गणेशाच्या याच सर्वांगसुंदर ध्यानाला, माऊलींनी शेवटी विघ्नराज असे संबोधले आहे.
आता ‘विघ्नराज’ या विशेषणाचा माऊलींना अभिप्रेत असलेला अर्थ काय, हेही येथे बघितले पाहिजे. ‘विघ्न निर्माण करणारा’ असा त्याचा अर्थ नव्हे; तर ‘विघ्नहर्ता’, विघ्नगणांचे राजे; ‘सर्व विघ्ने ज्यांच्या आज्ञेत आहेत, चरणांशी आहेत, सेवेत आहेत, असे ते गणनायक’ हेच येथे ‘विघ्नराज’ या शब्दाचे माऊलींना अभिप्रेत असलेले अर्थ आहेत. माऊलींनी श्रीगणेशांच्या सहा हातांत, सहा दर्शनशास्त्ररुपी आयुधे आहेत. श्रीगणेशांच्या हातात ‘परशू आणि अंकुश’, ‘मोदक आणि खंडित दंत’, ‘वरद पद्मकर आणि धर्मप्रतिष्ठा करवणारा अभयहस्त’ अशी सहा दर्शनांच्या विषयांना अनुकूल असलेली पाच आयुधे व एक मुद्रा शोभत आहे. या गणेशांच्या सहा हातांतली सहा आयुधे, सातवी त्यांची शुंडा, आठवा त्यांचा सरळ असलेला शुभ्र दंत आणि नववे त्यांचे ‘विघ्नराज’ हे विशेषण, हे या ‘अनुग्रह-गणेशा’च्या भक्तप्रतिपालन कार्याचे शोभायमान नवरत्नमंडलच आहे. यांतूनच माऊलींनी श्रीसद्गुरूंकरवी होणार्या अनुग्रहाची, नऊ प्रमुख वैशिष्ट्येही येथे सांगितलेली आहेत. ‘वेदान्त तो महारसु| मोदक मिरवे॥ मोदक म्हणजे मोद करविणारा-देणारा, अर्थात आनंद देणारा, परमानंद देणारा! तो ‘मोदक’ हे येथे वेदान्तरूपी हातातील ब्रह्मानंद देणारे, परमानंद देणारे आहे.
श्रीगणेश-रूपवर्णनात माऊलींनी यानंतर श्रीगणेशांचे पुढचे दोन हात वाखाणलेले आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘वरदपद्मकर.’ ‘तो पद्मकर वरद|’ हा हातच ‘सांख्यदर्शन’ आहे. या दर्शनालाच ‘सत्कार्यवाद’ असेही म्हटले जाते. श्रीगणेशांचा हा पाचवा हात भक्तांना, साधकांना वर देणारा ‘पद्मकर’ आहे. ‘पद्मकर’ म्हणजेच ज्या हाताने पद्म, कमळ धरलेले आहे असा हात. सर्व मानवांना बुद्धीची विशेष देणगी मिळाली आहे. या बुद्धीचा दाता तो श्रीगणेश असल्याचे संबोधून, स्वतःला श्रीनिवृत्तीदास म्हणवून माऊली गणेशवंदनेस प्रारंभ करत असले, तरी आपल्या नजरेसमोरचे गणेशाचे ध्यानच माऊलींसमोरही आहे. फरक एवढाच की, माऊलींची असामान्य प्रतिभा लक्षात घेता, ते एका वेगळ्याच उंचीवरून गणेशाचे वर्णन करतात. त्यांना त्या मूर्तीत सगळे शब्दब्रह्म साकारल्याचे वाटू लागते. आपल्याला जी सोंड दिसते, तेथे त्यांना निर्मळ विवेक दिसतो. दोन्ही कानांच्या ठिकाणी दोन मीमांसा दिसतात, तर गंडस्थळाच्या ठिकाणी द्वैत-अद्वैत. अर्थात असे हे जे विलक्षण दर्शन माऊलींना घडले, ते मुळातूनच अद्भुत आणि अवर्णनीय आहे.
शिरीष कवडे यांच्या ‘अभ्यासयोगातील मर्मस्थळे खंड पहिला’ यात, याविषयी अधिक वाचायला मिळते. खरं तर श्री गणेशाचे रूप म्हणजे, केवळ मूर्तिमंत वेद! यात अतिशय निर्दोष असे वर्ण हेच जणू त्याचे शरीर, निरनिराळ्या स्मृती हे त्याचे विविध अवयव, या स्मृतीतील अर्थसौंदर्य हे जणू या गणेशाचे शरीर लावण्यच आहे. श्रीगणेशाचे चरण युगुल हे ॐकारातील ‘अ’कार, तर त्याचे विशाल पोट हे ‘उ’कार आणि मस्तक हे ‘म’कार. ॐकाराच्या या तीन मात्रा जिथे एकवटल्या आहेत, तिथेच हे शब्दब्रह्म साठवले गेले आहे. त्या मूळ बीजभूत गणेशास मी श्रीगुरूंच्या कृपेने वंदन करीत आहे, हा माऊलींचा भावच मनाला स्पर्शून जातो.
माऊलींनी श्रीज्ञानेश्वरीतील सुरुवातीच्या ओव्यांमध्ये, श्रीगणेशाचे वाङ्मयीन रूप दाखवले असले, तरी त्यात हिंदू तत्त्वज्ञानातील वेद, पुराणे, सहा दर्शने, वेदांत यांबरोबरच काव्य-नाटक इ.चेही महत्त्व विशद केले आहे. माऊलींची तत्कालीन संस्कृतोद्भव अशी प्रासादिक भाषा, त्यांनी दिलेल्या विविध सुंदर सुंदर उपमांमुळे, हे सारेच श्रीगणेशवर्णन आणि श्रीगणेशवंदन अतिशय उत्तुंग आहे. अशा श्रीगणेशाचे स्मरण करताना, येणार्या भाद्रपद गणेशोत्सवात आपणही त्या मूळ अविनाशी अर्थात निराकाराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. माऊलींचे शब्दसामर्थ्य विलक्षण आणि अनाकलनीयच आहे. सारस्वताच्या अभिनव शब्दप्रवाहातील हे अमृतसिंचन सतत नवनवीन अर्थात उमगत राहावे, हीच कैवल्यसाम्राज्य माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. मंगलमूर्ती मोरया!
सर्वेश फडणवीस
८६६८५४११८१