गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे, या लेखात आपण संवादकौशल्याबाबत चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता, कौशल्य ही गोष्ट अशी आहे की, ती वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकता येते. त्यासाठी जन्मापासूनच एखादे कौशल्य असण्याची गरज नाही. पण, महत्त्वाची बाब म्हणजे, संवाद म्हणजे काय आणि तो साधायचा कसा? अनेकांना संवाद साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तो कसा साधायचा, याची माहिती नसते; त्याचा अभ्यास नसतो. आपल्याला प्रत्येक नात्यामध्ये संवादाचे महत्त्व मोठे आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने संवाद साधता आला, तर ती नाती आपल्याला चांगल्या पद्धतीने जोपासता येतात आणि आपला मनुष्यसंचयही वाढतो. आयुष्य जगताना पैसा असण्याबरोबरच मनुष्यसंपत्ती ज्याच्याकडे असते, त्याला त्याचा मोठा आधार वाटतो. यामुळे आयुष्य जगणे सुलभ होते.
हा संवाद म्हणजे नेमके काय? तर, ज्या अर्थाने आणि भावनेने समोरची व्यक्ती माझ्याशी बोललेली आहे, तोच अर्थ आणि तीच भावना मला समजते का? आणि समोरचा बोलत असताना योग्य पद्धतीने त्याला प्रतिसाद देता येतो का? अर्थातच, मला संवाद साधता येतो आणि मी तो साधते का, इथे या संवादाचे चक्र पूर्ण होते. संवादामध्ये ऐकण्याचे महत्त्व फार मोठे आहे. आपण कशा पद्धतीने संवाद ऐकतो, यावरच आपण संवाद कसा साधणार, हे अवलंबून असते. इंग्रजीमध्ये ऐकण्याला ‘हिअरिंग’ आणि ‘लिसनिंग’ असे दोन शब्द येतात. आता ‘हिअरिंग’मध्ये शब्द फक्त कानावर पडतात आणि ‘लिसनिंग’मध्ये ते आत झिरपतात. संवाद आत झिरपल्यावर त्याला आपण देत असलेला प्रतिसाद, हाच ‘लिसनिंग’चा खरा अपेक्षित अर्थ आहे.
या ठिकाणी एका गोष्टीच्या माध्यमातून हे उदाहरण अधिक समजून घेऊ. एक लहान मुलगा अंगणात खेळत असतो. त्यावेळी खेळताना तो खार बघतो आणि धावत धावत घरात येतो. त्यावेळी त्याचे वडील क्रिकेटचा सामना पाहत असतात. हा मुलगा टीव्ही आणि वडिलांच्या मधेच जाऊन उभा राहतो. टीव्हीवर क्रिकेटचा सामना रंगात आलेला असतो. हा मुलगा वडिलांना सांगतो, "बाबा, मी आता अंगणात खार बघितली.”अर्थात, वडिलांचे लक्ष त्या मुलाच्या बोलण्याकडे नसतेच. ते क्रिकेटच्या सामन्यामध्ये तल्लीन झालेले असतात. ते त्याला हाताने बाजूला करतात आणि सांगतात, "थांब रे जरा, मला क्रिकेटचा सामना बघू दे.” वडिलांच्या अशा वागण्याने तो मुलगा हिरमुसतो आणि स्वयंपाकघरात जातो.
त्यावेळी आई स्वयंपाक करण्यात व्यस्त असते. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच की, जेव्हा फोडणी करत असतो, तेव्हा फोडणी करपू नये म्हणून लगेचच त्यावर भाजी अथवा आमटी टाकली जाते. नेमया अशाच क्षणी हा मुलगा आईला हाक मारून खार बघितल्याचे सांगतो. हे ऐकून आई पटकन गॅस बंद करून खाली बसते आणि त्याला म्हणते, "हो? कुठून येत होती ती खार? झाडावर होती का? काय करत होती?” मुलगा आईला सांगतो, "आई, ती खार झाडावरून उतरत होती. तिची शेपटीही मस्त फुलवली होती.” असे सगळे वर्णन तो आईला सांगतो आणि पुन्हा खेळायला निघून जातो. आता या कथेचा विचार केल्यास, त्या घरात दोघेही उपस्थित होते. पण, यापुढे जेव्हा शाळेतील गमतीजमती, मित्र-मैत्रिणींचे किस्से सांगायचे असतील; त्यावेळी हे सगळे सांगण्यासाठी तो मुलगा यापुढे आईची निवड करेल. कारण, आईने त्या मुलाचे ऐकून घेतले आणि नुसतेच ऐकले नाही, तर तो संवादही तिने पुढे नेला. त्यामुळे संवाद पुढे नेणे हीदेखील एक महत्त्वाची पायरी असते.
संवादामध्ये चार प्रकारचे संवाद असतात. पहिला म्हणजे ‘पॅसिव्ह’ संवाद. या प्रकारच्या संवादात आपण काहीच करत नसतो. दुसरा संवाद म्हणजे ‘सब्मॅसिव्ह’. या प्रकारच्या संवादात आपण आपले मत मांडत नाही, तर समोरच्याचे नुसते ऐकून घेतो. या प्रकारच्या संवादात आपण स्वतःला कमी लेखून समोरच्या व्यक्तीला महत्त्व देतो. तिसरा प्रकार म्हणजे ‘अॅग्रेसिव्ह’ संवाद. या प्रकारच्या संवादात आपण फक्त स्वतःलाच महत्त्व देतो, स्वतःच्या मतालाच किंमत देतो. यामध्ये आपण समोरच्याचे ऐकूनच घेत नाही. संवादाचा चौथा प्रकार म्हणजे ‘असेर्टिव्ह’. या प्रकारच्या संवादामध्ये आपण आपले मत ठामपणे, योग्य शब्दांत आणि योग्य टोनमध्ये मांडतो. तसेच समोरच्याचे म्हणणेही आपण ऐकून घेतो. असा संवादच जास्त परिणामकारक असतो.
आपण सगळेजण या चार प्रकारच्या संवादात अधूनमधून वावरत असतो. त्याचा चांगला-वाईट परिणामही आपल्याला माहीत असतो. मला नेहमीच असे वाटते की, एखाद्या व्यक्तीशी नाते जोडण्यासाठी संवाद महत्त्वाचा असतो. योग्यपद्धतीने असा संवाद साधत असताना, समोरच्या माणसाची नेमकी मनःस्थिती कशी आहे, याचा विचार करणेही आवश्यक असते. उदाहरणार्थ, समजा मुलाच्या न पटलेल्या वागण्याबद्दल आईने मुलगा चिडलेला असतानाच सुरुवात केली, तर आईचे बोलणे मुलाच्या आत झिरपणारच नाही. त्यामुळे आईचा उद्देशही साध्य होणार नाही. यासाठी समोरच्याची मनःस्थिती ओळखणेही आवश्यक असते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संवादात ‘आय स्टेटमेंट’ला महत्त्व आहे. ‘आय स्टेटमेंट’ म्हणजे ‘मला असे वाटते’, ‘तू या पद्धतीने करशील का?’, ‘हे माझे मत आहे’, अशा पद्धतीने आपण बोलत राहिल्यास समोरच्यावर आरोप होत नाहीत. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे, नेमया प्रसंगापुरताच आपल्याला संवाद साधता येतो का? म्हणजे, ‘तू कायमच आळशीसारखा वागतोस’ अथवा ‘तू नेहमीच कॉलेज बुडवतोस’ असे म्हणण्यापेक्षा, ‘तू हे बोललीस ते मला आवडले नाही; यात तू बदल केल्यास आपल्यातले नाते अधिक चांगले होईल’, असा संवाद आपल्याला साधता आल्यास तो अधिक परिणामकारक होतो. या तीन-चार गोष्टी संवाद साधत असताना, फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे संवाद साधताना त्या लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरते.
- गौरी कानिटकर