केपटाऊन येथे ६९ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद; भारतातील पीठासीन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जाणार

    13-Sep-2026   
 
Commonwealth Parliamentary Conference 2026
 
मुंबई (Commonwealth Parliamentary Conference 2026) : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरात ६९ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद दि. १३ ते १९ सप्टेंबर, २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून लोकसभा, राज्यसभा आणि भारतातील सर्व राज्य विधानमंडळांचे पीठासीन अधिकारी यांचे उच्चस्तरिय शिष्टमंडळ या परिषदेत सहभागी होणार आहे.
 
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उप सभापती सचिन अहिर, विधानसभा सदस्या नमिता मुंदडा हे महाराष्ट्र विधानमंडळाच्या 'राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे' प्रतिनिधित्व या आंतरराष्ट्रीय परिषदेत करणार आहेत. (Commonwealth Parliamentary Conference 2026)
 
दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये संसदीय लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांमध्ये वैचारिक आदानप्रदान, परस्पर सहकार्य, संसदीय व्यवस्था दृढ करणे यादृष्टीने विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद आयोजित केले जातात. ६९ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत १० वी कॉमनवेल्थ वुमन पार्लमेंटॅरिअन कॉन्फरन्स, युथ राऊंडटेबल कॉन्फरन्स देखील होणार आहे. (Commonwealth Parliamentary Conference 2026)
 
कोणते विषय चर्चिले जाणार?
 
"बदलत्या जागतिक व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय कायदा आणि संसदीय लोकशाहीचे सक्षमीकरण : राष्ट्रकुलाचे नेतृत्व" ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना असून विविध देशांमधील अर्थव्यवस्थांमध्ये न्याय्य व सर्वसमावेशी व्यापारपध्दतीच्या निर्मितीसाठी आंतरसंसदीय संवाद, सर्वांसाठी सुलभ संसद – दिव्यांग व्यक्तींच्या सहभागासाठी संसदीय व्यवस्था अधिक सुलभ करणे, हवामान बदलाशी जुळवून घेणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी करण्याची उपाययोजना यासंदर्भात संसदीय नेतृत्वाची भूमिका, संसदेमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा (AI) वापर, कायदा मंजूरोत्तर छाननी, संसद आणि जनतेमध्ये प्रभावी संवाद, मानवी हक्कांचे संरक्षण आणि शांततेला प्रोत्साहन याबाबत संसदेची भूमिका, या महत्वपूर्ण विषयांवर या परिषदेमध्ये विचारमंथन होईल. (Commonwealth Parliamentary Conference 2026)







अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर