मुंबई (Amit Shah Asiatic Society) : 'एशियाटिक सोसायटीमध्ये येणारा मी पहिला गृहमंत्री आहे, पण मी येथे गृहमंत्री म्हणून आलेलो नाही, तर भारतीय ज्ञान परंपरा हजारो वर्षे पुढे नेणाऱ्या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून आलो आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, मुंबईची एशियाटिक सोसायटी भारतीय ज्ञान परंपरेची वाहक बनून ती देशभरात पोहोचवण्याचे काम करेल', असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. याच बरोबर राज्य सरकार प्रमाणे केंद्राचाही आता एशियाटिकला पाठिंबा असेल याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमधील ‘गणेश ज्ञानार्थी’ विशेष हस्तलिखित प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजी अमित शाह यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. (Amit Shah Asiatic Society)
उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, भारताला कोणीही गुलाम बनवू शकत नाही. जो देश आपली स्मृती, इतिहास, परंपरा, संस्कार, अभिलेख, भाषा, व्याकरणाचे रक्षण करतो, तो कितीही वर्षे गुलाम राहिला तरी त्याला कोणीही गुलाम बनवू शकत नाही. भारत याचे उत्तम उदाहरण आहे. अनेकांनी प्रयत्न केले. येथे संपूर्ण जगाचे मार्गदर्शन करणारे प्रखर ज्ञान निर्माण झाले होते, ते संपवण्याचा प्रयत्न झाला पण ते करू शकले नाहीत. नालंदाचे पुस्तकालय ते जाळू शकतात, महिनोन्महिने तिथून धूर निघेल एवढ्या तीव्रतेने ते जाळू शकतात. मात्र स्मृती आणि श्रुतीद्वारे लोकांच्या मनात कायमस्वरूपी बसलेले ते ज्ञान कोणीही संपवू शकत नाही." (Amit Shah Asiatic Society)
पुढे ते म्हणाले, हा सर्वज्ञात इतिहास आहे. जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा संयम बाळगून पुढे जाणे आणि जेव्हा आपण विजयी होतो तेव्हा ज्यांच्यावर विजय मिळवला आहे, त्यांच्या स्मृती नष्ट न करता आपल्या परंपरेत त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करणे, हा आपल्या देशाचा संस्कार आहे."
एशियाटिक सोसायटीबाबत बोलताना ते म्हणाले, एशियाटिक सोसायटीमध्ये जो बदल घडवून आणायचा आहे, तो आणला पाहिजे. यासाठी मी नक्कीच काही गोष्टी बोलू इच्छितो. खरे ज्ञान कधीही विचारसरणीचे गुलाम नसते. ज्ञान स्वतःच एक विचारसरणी आहे. जर तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारे बांधून ठेवले, तर ज्ञानाचा अर्थच बदलून जातो. ज्ञान मुक्त असले पाहिजे. एशियाटिक सोसायटीच्या संपूर्ण ज्ञानाचा विस्तार तीन दृष्टिकोनातून झाला पाहिजे. ज्ञानाचा विस्तार करणाऱ्या विद्वानांना येथे आणले पाहिजे, इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे देशभरातील ग्रंथालये एकमेकांशी जोडली पाहिजेत आणि महाराष्ट्रातील गावागावांत असलेली हस्तलिखिते (पांडुलिपि) जतन करून, त्यांचे संशोधन व ज्ञान 'भारतम हस्तलिखित' (भारतम पांडुलिपि) च्या माध्यमातून समोर आणण्यात योगदान दिले पाहिजे.' (Amit Shah Asiatic Society)
डी-कोलोनायझेशनची प्रक्रिया म्हणजे इतिहास पुसून टाकणे नव्हे
अमित शाह यावेळी म्हणाले, अनेक वेळा देशात अशी चर्चा होते की आपण इतिहास पुसून टाकत आहोत. मी यांच्याशी आणि विद्वानांच्या या मताशी सहमत नाही. डी-कोलोनायझेशनची प्रक्रिया म्हणजे इतिहास पुसून टाकणे नाही. याचा अर्थ इतिहास पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि भारतीय दृष्टिकोनातून पुन्हा लोकांसमोर मांडणे हा आहे. हेच डी-कोलोनायझेशन आहे आणि ते झालेच पाहिजे. कदाचित यासाठी अनेकजण उघडपणे बोलत नसतील. डी-कोलोनायझेशनचा अर्थ पुसून टाकणे असा नाही. आपल्या दृष्टिकोनातून सत्य जगासमोर, जगाच्या कल्याणासाठी मांडणे म्हणजेच डी-कोलोनायझेशन होय. कारण त्यांनी इतिहास, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीला आपली सत्ता टिकवून ठेवण्याचे साधन बनवले होते. आज आपण त्यापासून ज्ञान मुक्त करण्यासाठी डी-कोलोनायझेशनच्या दिशेने पुढे आलो आहोत. येथे अनेक गोष्टी पडून आहेत. महाभारताची सचित्र प्रत, जैन कल्पसूत्र, बौद्ध धर्माचे ग्रंथ क्वचितच कुठे उपलब्ध असतील. अशा प्रकारचे ग्रंथ येथे आहेत आणि असे बरेच ज्ञान येथे उपलब्ध आहे, जे कदाचित खूप आधीच बाहेर आले पाहिजे होते. (Amit Shah Asiatic Society)
एशियाटिक सोसायटी समजून घेण्यासाठी 'इंडोलॉजी' शब्द समजून घेणेही गरजेचे!
एशियाटिक सोसायटी समजून घेण्यासाठी 'इंडोलॉजी' शब्द समजून घेणेही गरजेचे आहे. न्यूमिजमॅटिक्स (नाणकशास्त्र), एपिग्राफी (शिलालेखशास्त्र/अभिलेखशास्त्र), अँथ्रोपोलॉजी (मानववंशशास्त्र), इतिहास, पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, धर्मशास्त्र आणि व्याकरण - या सर्वांचा मिळून 'इंडोलॉजी' हा विषय बनला आहे. तथापि, मी आज हे स्पष्ट करू इच्छितो की, त्या काळी याचा उद्देश जग किंवा विश्वाचे कल्याण करणे हा नव्हता, जो भारतीय ज्ञान परंपरेत ज्ञानाचा मूळ हेतू असतो. तर, येथील व्यवस्था समजून घेणे आणि दीर्घकाळ लोकांवर राज्य करणे हा यामागचा उद्देश होता.' (Amit Shah Asiatic Society)
वास्तूच्या संवर्धनात कोणतीही कमतरता भासणार नाही
संस्कृती, परंपरा आणि जुने दस्तऐवज या एशियाटिक सोसायटीच्या वास्तूमध्ये जतन केलेले आहेत; त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची टीम या संदर्भात अतिशय उत्तम कार्य करत आहे. अमित शाह देशासाठी काय काय करू शकतात, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. प्राचीन इतिहास जतन झाला पाहिजे याकडेही त्यांचे विशेष लक्ष असते. आज त्यांच्या उपस्थितीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, या वास्तूच्या संवर्धनात कोणतीही कमतरता भासणार नाही." - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (Amit Shah Asiatic Society)
नवीन समितीच्या कार्यकाळात संस्था नव्याने आणि जोमाने भरारी घेईल
पूर्वी या ठिकाणी केवळ ब्रिटिशांनाच प्रवेश दिला जात असे. त्यानंतर, हळूहळू भारतीयांनाही येथे प्रवेश मिळू लागला. भारतीय विद्वानांनी लिहिलेली पुस्तके आणि विविध ऐतिहासिक दस्तऐवज 'एशियाटिक सोसायटी'मध्ये जमा होऊ लागले. २०१७ मध्ये जेव्हा मी येथे आलो, तेव्हा मला हे वेगवेगळे ऐतिहासिक दस्तऐवज जवळून पाहण्याची संधी मिळाली.भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक असते. नालंदा विद्यापीठातील ग्रंथालय जेव्हा जाळण्यात आले, तेव्हा मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदेची हानी झाली होती; तशीच अत्यंत मौल्यवान आणि समृद्ध ग्रंथसंपदा आज आपल्या एशियाटिक सोसायटीमध्ये सुरक्षित आहे. मध्यंतरीच्या काळात काही कारणांमुळे एशियाटिकचा श्वास कोंडत होता. परंतु, आता नवीन समितीच्या कार्यकाळात ही संस्था नव्याने आणि जोमाने नक्कीच भरारी घेईल, यात शंका नाही. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (Amit Shah Asiatic Society)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक